Saturday, May 16, 2026

Old Birth and Death records : जन्म-मृत्यू नोंदी, विवाह नोंदी यांसारखे जुने अभिलेख अवघ्या काही सेकंदात उपलब्ध होणार

Old Birth and Death records : जन्म-मृत्यू नोंदी, विवाह नोंदी यांसारखे जुने अभिलेख अवघ्या काही सेकंदात उपलब्ध होणार

महानगरपालिका अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांचा पुढाकार

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्‍या ई प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) जतन करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण नागरी दस्तऐवजांचे आता अत्याधुनिक ‘व्हिजन एआय वॉल्ट’ प्रणालीअंतर्गत डिजिटल जतन करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे जन्म - मृत्यू नोंदी, विवाह नोंदी यांसारख्‍या जुन्या अभिलेखांचे सुरक्षित संवर्धन होण्यास मदत होणार आहे. तसेच, नागरिकांना आवश्यक कागदपत्रे अधिक जलद, अचूक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय ) आधारित तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दस्तऐवजांचे वर्गीकरण, स्कॅनिंग आणि डिजिटल संग्रहण करण्यात येणार आहे. त्‍यामुळे प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता व कार्यक्षमता वाढण्यासही हातभार लागणार आहे. तसेच बोगस प्रमाणपत्रांना आळा बसेल. या सुविधेचा वापर करणारी मुंबई महानगरपालिका ही भारतातील पहिलीच महानगरपालिका ठरणार असल्याचे अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले.

महानगरपालिका आयुक्‍त आश्विनी भिडे यांनी महानगरपालिकेच्‍या विविध 'डेटाबेस'मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय ) तंत्रज्ञानाचा समावेश करावा. डेटा - आधारित, पारदर्शक आणि नागरिक केंद्रित प्रशासकीय व्यवस्था उभारण्याच्या दिशेने महानगरपालिकेने वाटचाल सुरू करावी, असे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी पुढाकार घेऊन ई - वॉर्डातील नागरी दस्तऐवजांचे कृत्रिम बुद्धिमत्ता तिजोरी (व्हिजन एआय वॉल्ट) अंतर्गत जतन करण्‍याचा पथदर्शी प्रकल्‍प हाती घेण्‍याचे निश्चित केले आहे.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले की, ई प्रशासकीय विभागाकडे अनेक वर्षांपासूनचे अमूल्य नागरी दस्तऐवज जतन करण्यात आले आहेत. जन्म - मृत्यू नोंदी, विवाह नोंदी यांसारखे महत्त्वपूर्ण अभिलेख पावसाळा, दमट हवामान आणि काळाच्या कठोर परीक्षेलाही तोंड देत आजवर टिकून राहिले. मात्र, केवळ अस्तित्व टिकवून ठेवणे आता पुरेसे राहिले नव्हते. कालांतराने नोंदींवरील शाई फिकी पडू लागली, दस्तऐवजांची पाने ठिसूळ झाली आणि अनेक दस्तऐवज धूळ व जुन्या कापडात गुरफटून पडले. एका प्रमाणपत्रासाठी नागरिकांना आठवडे, तर कधी महिने प्रतीक्षा करावी लागत होती. ई वार्डचा हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्‍याचे आव्‍हान प्रशासनासमोर होते, असे त्या म्हणाल्या.

डॉ. अश्विनी जोशी यांनी पुढे नमूद केले की, जुन्या अभिलेखांच्‍या सुरक्षित संवर्धनासाठी महानगरपालिकेने ‘व्हिजन एआय प्रोजेक्ट’ राबविण्‍याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम म्हणजे भविष्याच्या दिशेने टाकलेले महत्‍त्‍वपूर्ण पाऊल आहे. या प्रकल्प अंतर्गत अनेक वर्षांपासूनच्या लाखांहून अधिक हस्तलिखित नागरी नोंदींचे जतन करण्यासाठी अत्याधुनिक एआय-आधारित डिजिटल तिजोरी (व्हिजन एआय वॉल्ट) उभारण्यात येणार आहे. हे साधे स्कॅनिंग किंवा पारंपरिक, कालबाह्य ऑप्टीकल कॅरेक्टर रिकग्निशन' तंत्रज्ञान पुरते मर्यादित नसून, दस्तऐवजांना नवसंजीवनी दिली जाणार आहे. ही प्रणाली वळणदार इंग्रजी, मराठी आणि हिंदी हस्तलिखित लिपी अचूकपणे वाचू शकते; काळाच्या ओघात पुसट झालेल्या अक्षरांना पुन्हा स्पष्ट करू शकते; शाईच्या उमटलेल्या डागांमुळे निर्माण झालेला गोंधळ दूर करू शकते; तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातील नाजूक आणि जीर्ण पानांनाही नव्याने स्पष्टता व ओळख प्राप्त करून देऊ शकते.

ज्या प्रक्रियेसाठी पूर्वी किमान ३० दिवस, तर काही प्रकरणांमध्ये तब्बल एक ते दीड वर्ष प्रतीक्षा करावी लागत होती, ती सेवा आता अवघ्या काही सेकंदात उपलब्ध होणार आहे. नाजूक आणि जीर्ण नोंदवह्यांमधील किचकट हाताने शोध, नागरिकांच्या लांबच लांब रांगा आणि अनिश्चिततेने भरलेली प्रतीक्षा याला आता पूर्णविराम मिळणार असून, नागरिकांना अधिक जलद, अचूक आणि सुलभ सेवा अनुभवता येणार आहे. एआय आधारित प्रणालीमुळे आता प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि वेगवान होणार आहे.

एआय काम कसे करणार !

नागरिकाने केवळ एक नाव टाइप करताच, एआय संबंधित नोंद काही क्षणांत शोधून काढेल. त्यानंतर मूळ अभिलेखाचे पान तत्काळ स्क्रीनवर उपलब्ध होईल आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणपत्र क्षणार्धात तयार केले जाईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऐतिहासिक वारसा सुरक्षित ठेवत नागरिकांना तत्पर सेवा देण्याची नवी व्यवस्था उभी राहणार आहे. उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘ई’ विभागाचे सहायक आयुक्‍त आनंद कंकाळ यांच्‍या नेतृत्‍वाखाली हा प्रकल्‍प राबविला जाणार असल्‍याचे अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी स्‍पष्‍ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >