डोंबिवली : गुन्हेगारीच्या सत्य घटनांवर आधारित प्रसिद्ध टीव्ही मालिका 'क्राइम पेट्रोल'च्या (Crime Patrol) माध्यमातून प्रेक्षकांना सावध आणि सतर्क राहण्याचा संदेश दिला जातो. मात्र, याच मालिकेत अनेकदा पोलिसाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेता सतीश नायकोडे स्वतः एका मोठ्या फसवणुकीचे शिकार झाले आहेत. पश्चिम उपनगरात हक्काचे घर घेण्याच्या स्वप्नातून त्यांची तब्बल साडेचोवीस लाख (२४.५ लाख) रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. पडद्यावर गुन्हेगारांचे ट्रॅप उघडकीस आणणारा अभिनेता प्रत्यक्ष आयुष्यात मात्र भामट्यांच्या जाळ्यात अडकला आहे.
डोंबिवली ते मुंबईचा रोजचा प्रवास अन् शूटिंगची तारेवरची कसरत
आपल्यासोबत घडलेल्या या घटनेबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना सतीश नायकोडे (Satish Naykode) यांनी अत्यंत भावुक होत आपली व्यथा मांडली. ते म्हणाले, "गरजवंताला अक्कल नसते असे म्हणतात, ते अगदी खरे आहे. मी मूळचा डोंबिवलीचा रहिवासी असून डोंबिवली हे खूप छान शहर आहे. परंतु, अभिनय क्षेत्रात काम करताना तिथून दररोज मुंबईतील मढ आयलंड, गोरेगाव किंवा बोरीवली भागात शूटिंगसाठी वेळेत पोहोचणे ही मोठी तारेवरची कसरत असायची. पहाटे साडेचारची लोकल पकडणे आणि रात्री पॅकअप झाल्यावर उशिरा घरी परतणे यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा यायचा. यामुळेच मुंबईच्या पश्चिम उपनगरात स्थलांतरित होण्याचा विचार मनात आला."
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले अंतिम दर्शन कोल्हापूर : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील ...
काम मिळण्यात अडचणी अन् हक्काच्या घराचे स्वप्न
डोंबिवलीत राहत असल्यामुळे अनेक नवीन प्रोजेक्ट्स हातातून निसटत असल्याचे नायकोडे यांनी सांगितले. अनेक प्रॉडक्शन हाऊस त्यांना स्पष्ट सांगायचे की, "तुम्ही वेस्टर्न लाईनला (पश्चिम उपनगरात) शिफ्ट झालात तरच नवीन प्रोजेक्टमध्ये काम देऊ शकू. कारण लांबच्या प्रवासामुळे तुम्ही शूटिंगला पुरेसा वेळ देऊ शकाल का, याची शाश्वती वाटत नाही." या कारणामुळे कामे कमी मिळू लागली. प्रत्येक प्रामाणिक माणसाप्रमाणेच, 'मुंबईत एवढी वर्षे मेहनत करून स्वतःच्या कमाईचे हक्काचे घर असावे' असे साधे स्वप्न नायकोडे यांनी पाहिले होते. डोंबिवलीत वडिलोपार्जित घर असले तरी स्वतःच्या कष्टाने मुंबईत घर घेण्याच्या तीव्र इच्छेने त्यांनी पश्चिम उपनगरात घराचा शोध सुरू केला.
सच्चिदानंद भामरेची एन्ट्री अन् २५ लाखांचा ट्रॅप
पश्चिम उपनगरात बजेटनुसार घर शोधत असताना सतीश नायकोडे यांची भेट सच्चिदानंद भामरे नावाच्या व्यक्तीशी झाली. त्याने त्यांना चाळीतील एक बैठे घर दाखवले. तिथली लोकॅलिटी, आजूबाजूला असलेली मराठी माणसे आणि घराची किंमत बजेटमध्ये वाटल्याने नायकोडे यांचा त्यावर विश्वास बसला. भामरेने दाखवलेली सर्व कागदपत्रे आणि ओळख करून दिलेली माणसे कायदेशीर व योग्य वाटल्यामुळे, मागील १२-१३ वर्षांपासून घर शोधणाऱ्या नायकोडे यांनी कोणताही संशय न घेता व्यवहारासाठी होकार दिला आणि संबंधित व्यक्तीला पैसे हस्तांतरित केले.
साडेआठ वर्षांत ४५ लाख भरूनही ३० लाखांचे कर्ज शिल्लक
घराच्या व्यवहारासाठी नायकोडे यांनी २०१८ मध्ये डोंबिवलीतील आपली वडिलोपार्जित मालमत्ता एका खाजगी फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवून कर्ज घेतले. त्यातील २४.५ लाख रुपये भामरे व त्याच्या साथीदारांना देण्यात आले. हा संपूर्ण व्यवहार अधिकृत कागदपत्रांच्या आधारे झाला असून त्याचे सर्व पुरावे नायकोडे यांच्याकडे उपलब्ध आहेत. मात्र, पैसे देऊनही त्यांना घराचा ताबा मिळाला नाही आणि त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. या निर्णयामुळे त्यांच्यावर अफाट आर्थिक ताण आला आहे. सुरुवातीला दरमहा ४५ हजार रुपये आणि सध्या ४२,७०० रुपयांचा EMI ते भरत आहेत. गेल्या साडेआठ वर्षांत त्यांनी बँकेला जवळपास ४५ लाख रुपये व्याज व हप्त्यांच्या स्वरूपात भरले आहेत, तरीही हे कर्ज पूर्ण फेडण्यासाठी आणखी ३० लाख रुपये भरणे बाकी आहे. एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब आर्थिक अडचणीत सापडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.






