Thursday, May 7, 2026

Chandrakant Patil : पदे बोगस, पदव्याही बोगस; वांद्रेतील 'हिरे' महाविद्यालयात १३२ विद्यार्थ्यांना गंडा, मंत्री चंद्रकांत पाटलांचे फौजदारी कारवाईचे आदेश

Chandrakant Patil : पदे बोगस, पदव्याही बोगस; वांद्रेतील 'हिरे' महाविद्यालयात १३२ विद्यार्थ्यांना गंडा, मंत्री चंद्रकांत पाटलांचे फौजदारी कारवाईचे आदेश

मुंबई : वांद्रे येथील डॉ. बळीराम हिरे महाविद्यालयात १३२ हून अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या देऊन फसविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दोषी संस्थांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे कठोर निर्देश प्रशासनाला दिले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मुळीच खपवून घेतले जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वास्तुशास्त्र (आर्किटेक्ट) या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाच्या संस्थेत चक्क विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC ) मान्यता नसलेला बोगस अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी गुरुवारी आयोजित बैठकीत मंत्री पाटील यांनी विद्यापीठ कायद्यातील तरतुदींनुसार संस्थेची मान्यता रद्द करण्याबाबतही विचार करण्याच्या सूचना दिल्या.

महाराष्ट्र राज्य कृषी, पशु व मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च, तंत्र व व्यवसाय शिक्षण यांमधील 'अनधिकृत संस्था व अनधिकृत अभ्यास पाठ्यक्रम (प्रतिबंध) अधिनियम २०१३' मधील तरतुदींनुसार या महाविद्यालयावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने एक विशेष कार्यप्रणाली (एसओपी) तयार करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही

- फसवणूक झालेल्या १३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी नवीन शैक्षणिक धोरण २०२० मधील 'रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग' या तरतुदीचा आधार घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद या विद्यार्थ्यांच्या हिताचा अभ्यास करून पुढील कार्यवाही करणार आहे.

- मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, कोणत्याही संस्थेत प्रवेश घेताना त्या संस्थेची आणि अभ्यासक्रमाची मान्यता उच्च शिक्षण किंवा तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर तपासून पाहावी. अनधिकृत संस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा