Sunday, August 16, 2026

Amit Shah : ' तुमचे हे पाप देशातील जनता कधीच माफ करणार नाही'

Amit Shah : ' तुमचे हे पाप देशातील जनता कधीच माफ करणार नाही'

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात (इंदिरा भवन) स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत/गीत ‘वंदे मातरम्’ च्या गायनावरून देशाच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम्’चे गायन मध्येच थांबवण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोनिया गांधींवर अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली आहे. याप्रकरणी आता कर्नाटकात भाजपने अधिकृत पोलीस तक्रारही दाखल केली आहे.

राजस्थानमधील चित्तौडगड येथे एका जाहीर सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस पक्षावर आणि सोनिया गांधींवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. अमित शहा म्हणाले की, "मतपेढीच्या राजकारणाच्या लालसेपोटी काँग्रेसने नेहमीच ‘वंदे मातरम्’ला विसरण्याचे काम केले आहे. ८० वर्षांनंतर बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांच्या या अमर गीताला पुन्हा सन्मान मिळत आहे, हेही सोनिया गांधींना सहन होत नाही. काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' सुरू असताना सोनिया गांधींनी काँग्रेस अध्यक्षांना ते गाणे थांबवण्यास सांगितले. सोनिया जी, १४० कोटी जनता हे पाहत आहे. तुम्ही केलेले हे पाप देश कधीही माफ करणार नाही."

'वंदे मातरम्' हे गीत अर्धवट सोडण्याचा विचार कोणी स्वप्नातही कसा करू शकतो, असा सवाल करत शाह म्हणाले की, काँग्रेस नेत्यांना लाज वाटली पाहिजे. थोडी जरी लाज शिल्लक असेल, तर त्यांनी दोन्ही हात जोडून बंकिम बाबूंच्या अमर आत्म्याची आणि देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे. याच कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून 'वंदे मातरम्'ला पुन्हा एक नवे आयुष्य दिल्याचे कौतुक केले.

अटलजींच्या पुतळ्याचे अनावरण : याच दौऱ्यादरम्यान, रविवारी गृहमंत्री अमित शाह यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासह पूर्व पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सांगितले की, अटलजींच्या कुशल नेतृत्वाखाली १९९९ मध्ये पोखरण येथे ऐतिहासिक अणुचाचणी झाली आणि त्याच वर्षी भारताने कारगिल युद्ध जिंकले. हेच कार्य पुढे नेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला जागतिक पातळीवर एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून प्रस्थापित केले आहे.

उच्च न्यायालयात दाद मागणार : या वादावर केवळ राजकीय टीकाच नव्हे, तर आता कायदेशीर पावलेही उचलली जाऊ लागली आहेत. कर्नाटकातील मंगळुरू येथे भाजप नेते विकास पुत्तूर यांनी सोनिया गांधींविरोधात येथील उरवा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. सोनिया गांधींनी ‘वंदे मातरम्’चे गायन थांबवण्यास सांगून राष्ट्रगीत व गीताचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजप कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या पुत्तूर यांनी तातडीने एफआयआर दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर कर्नाटक सरकार आणि पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली नाही, तर आपण कर्नाटक उच्च न्यायालयात दाद मागू, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

काँग्रेस पक्षाचे स्पष्टीकरण : भाजपने केलेल्या या आरोपांना काँग्रेस पक्षाने तीव्र शब्दांत फेटाळून लावले असून, हे विरोधकांचे राजकीय षड्यंत्र आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, इंदिरा भवनमधील कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’चे संपूर्ण व्हर्जन गाण्यात आले होते आणि ते थांबवण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आला नव्हता. त्यामुळे या वादाला काहीही अर्थ नाही. काँग्रेस अध्यक्षांना गाणे थांबवण्यास सांगण्याच्या दाव्यावर स्पष्टीकरण देताना जयराम रमेश यांनी स्पष्ट केले की, "काँग्रेस अध्यक्ष बऱ्याच वेळ उभे असल्याने, सोनिया गांधी केवळ त्यांच्यासाठी खुर्ची आणण्यास सांगत होत्या." या साध्या प्रसंगाचा भाजपने राजकीय स्वार्थासाठी विपर्यास केला आहे, असा पलटवार काँग्रेसने केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >