Sunday, August 16, 2026

Kiren Rijiju : "विरोधी नेत्यांना 'दिमागी नक्षलवादी' म्हटले नाही"

Kiren Rijiju :

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातील 'दिमागी नक्षलवादी' (वैचारिक नक्षलवादी) या उल्लेखावरून निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय संसदीय बाबी मंत्री किरण रिजिजू यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधानांनी कोणत्याही विरोधी नेत्यांना 'नक्षलवादी मानसिकतेचे' म्हटले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी 'दिमागी नक्षलवादी' नेमके कोण आहेत हे स्पष्ट करताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत तीन प्रमुख मुद्दे मांडले आहेत; त्यानुसार, जे नक्षलवाद्यांचे समर्थन करतात आणि भारतीय संविधानाचा स्वीकार करत नाहीत, जे फुटीरतावाद्यांच्या बाजूने उभे राहतात आणि कलम ३७० चे समर्थन करतात, तसेच जे भारताच्या उत्तर-पूर्वेकडील राज्यांना देशापासून वेगळे करण्यासाठी 'चिकन नेक' कॉरिडोअर तोडण्याची भाषा करतात, तेच 'दिमागी नक्षलवादी' आहेत.

शनिवारी ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी देशातून सशस्त्र नक्षलवादाचे यशस्वीपणे उच्चाटन केल्याबद्दल देशवासीयांचे अभिनंदन केले होते आणि सुरक्षा दलांच्या बलिदानाचे स्मरण केले होते. पंतप्रधान म्हणाले होते की, "जंगलात शस्त्र हातात घेणाऱ्या नक्षलवाद्यांचा बिमोड झाला असला, तरी सार्वजनिक जीवनात आणि विविध शासकीय समित्यांमध्ये अजूनही 'दिमागी नक्षलवादी' (नक्षलवादी विचारसरणीचे लोक) सक्रिय आहेत. देशाच्या प्रगतीसाठी अशा लोकांना ओळखणे आणि त्यांना वेगळे करणे आवश्यक आहे."

पंतप्रधानांच्या या भाषणानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर जोरदार टीका केली. जयराम रमेश यांनी आरोप केला की, दोन-तीन वर्षांपूर्वी राजकीय विरोधकांसाठी 'अर्बन नक्षल' शब्द वापरण्यात आला होता, ज्यावर संसदेत विचारले असता गृह मंत्रालयाने असा कोणताही कायदेशीर शब्द वा व्याख्या अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले होते. आता पुन्हा विरोधकांसाठी अशा शब्दांचा वापर केला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >