Sunday, August 16, 2026

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, वीज, पाणी, मलनिस्सारण आणि घनकचरा व्यवस्थापनासह पायाभूत सुविधांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले. पावसाळ्यात रस्ते दुरुस्ती करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, खड्डे बुजवण्यासाठी प्री-कास्ट आणि जिओ पॉलिमर टेक्नो पॅचसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. (Chakan-Talegaon Industrial Belt)

पायाभूत सुविधांसाठी १४ विभाग एकत्र काम करणार :

चाकण-तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली १४ विभागांच्या अधिकाऱ्यांची समन्वय समिती स्थापन करून तातडीने कृती आराखडा राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दर शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक घेऊन प्रलंबित कामांना गती द्यावी, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Chakan-Talegaon Industrial Belt)

खड्ड्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर :

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसाळ्यात पारंपरिक पद्धतीने रस्ते दुरुस्त करताना कामाची गुणवत्ता आणि टिकाऊपणासंदर्भात अडचणी येतात. त्यामुळे ठाणे-नाशिक मार्ग किंवा कशेडी बोगद्याच्या परिसरात वापरण्यात आलेल्या प्री-कास्ट रस्त्यांच्या पद्धतीचा तसेच जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. (Chakan-Talegaon Industrial Belt)

दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई :

चाकण औद्योगिक क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते विकासकामांचा तातडीने आढावा घेऊन कामांना गती देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. कामात टाळाटाळ किंवा अनावश्यक दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले. चाकण शहरातील रस्त्यांच्या कडेला पडणारे खड्डे बुजवण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी नवीन अंतर्गत रस्ते, पर्यायी मार्ग आणि उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. (Chakan-Talegaon Industrial Belt)

चाकणच्या विकास आराखड्याला लवकरच मंजुरी :

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चाकण शहराच्या विकास आराखड्याला तातडीने मंजुरी देण्यात येईल, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. याशिवाय औद्योगिक क्षेत्रातील मलनिस्सारण, पाणीपुरवठा, वीज, रस्ते आणि घनकचरा व्यवस्थापन या परस्परांशी संबंधित सुविधांसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. (Chakan-Talegaon Industrial Belt)

वीज आणि इतर सुविधांसाठीही मोठे निर्णय :

वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महापारेषणकडून ३१ ऑगस्टपर्यंत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नवीन विद्युत उपकेंद्रासाठी एमआयडीसीकडून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्र आणि रुग्णालयांसाठीही एमआयडीसीकडून आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. (Chakan-Talegaon Industrial Belt)

नवीन महामार्ग आणि फ्रेट कॉरिडॉरमुळे विकासाला चालना :

छत्रपती संभाजीनगर, रांजणगाव आणि चाकण एमआयडीसीला जोडणारा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, तसेच उरण-कर्जत-राजगुरुनगर-शिरूर-पुणे या नवीन महामार्गामुळे चाकण परिसरातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या प्रकल्पांमुळे मालवाहतुकीला वेग मिळण्यासोबतच चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. (Chakan-Talegaon Industrial Belt)

‘महाराष्ट्राच्या औद्योगिक ताकदीला दर्जेदार पायाभूत सुविधांची गरज’ :

महाराष्ट्र हे देशातील प्रमुख औद्योगिक राज्य असून राज्याची ही आघाडी कायम ठेवण्यासाठी उद्योगांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही सरकार आणि प्रशासनाची सामूहिक जबाबदारी असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. चाकण-तळेगाव हा महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील महत्त्वाचा पट्टा असल्याने येथील उद्योग, उद्योजक आणि स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडी, खड्डे आणि इतर पायाभूत सुविधांच्या समस्यांपासून दिलासा देण्यासाठी तातडीचे, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उपाय राबवण्यावर भर देण्यात येणार आहे. (Chakan-Talegaon Industrial Belt)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >