- विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील
शिवम व त्याचे सोबती हे आपसात माहितीची द्यदेवाणघेवाण करत होते ‘डोंगर-दऱ्या कशा निर्माण झाल्यात?’ त्या यात्रेकरूनेच विचारले. शिवम म्हणाला, “ही पृथ्वी थंड होत असताना तिचा काही भाग सारख्या प्रमाणात व सामान कालावधीत थंड होत गेला, तर काही भाग कमी तर काही भाग जास्त थंड होत गेला, काही आधी तर काही नंतर असा मागे-पुढे गोठत गेला. त्यामुळे तिच्या पृष्ठभागावर काही ठिकाणी सुरकुत्या म्हणजे वळ्या पडल्या, तर काही भाग सपाट झाला. सुरकुत्यांमधील काही उंचवटे गोठण प्रक्रिया सुरू असतानाच खूप उंच गेलेत व त्यांचे गोठल्यानंतर उंच व मोठमोठे डोंगर बनलेत.
त्याचवेळी त्याच वळ्यांमधील काही उंचवट्यांच्या बाजूचे खोलवटे अतिशय खोल खोल गेलेत व गोठत गोठत त्यांच्या अति खोल दऱ्या तयार झाल्यात. म्हणजेच पृथ्वीवरील सपाट पृष्ठभागापेक्षा उंच शिखर असलेल्या मोठ्या उंचवट्यास डोंगर म्हणतात. दोन डोंगरांमधील उतरंडीच्या खोल भागास दरी म्हणतात. तसेच पृथ्वी थंडावताना होत गेलेल्या भूकंपांनीही काही भागांचा उंच उभार झाला, तर काही भाग अति खोल गेला. थंडावण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यांतर ते सारे कडक बनलेत. अशारीतीने पृथ्वीवर डोंगर-दऱ्या निर्माण झाल्यात.”
“मग डोंगर व पर्वतामध्ये काय फरक आहे?” कपीलने प्रश्न केला. “सभोवतीच्या सपाट भूमीपेक्षा उंच असलेल्या व छोटेसे शिखर असलेल्या लहानशा खडक-मातीच्या उंचवट्यास टेकडी म्हणतात. सामान्य टेकडीपेक्षा उंच, मोठ्या नि तीव्र उताराच्या व शिखर असलेल्या अनेक मोठमोठ्या टेकड्यांच्या लांबच लांब रांगांना डोंगर म्हणतात, तर ६०० मीटरपेक्षा उंच असलेल्या म्हणजे गगनचुंबी, विशाल व अफाट डोंगरांना पर्वत म्हणतात. लांबलचक पर्वतांना पर्वतरांग किंवा पर्वतराजी म्हणतात. पर्वतराजीच्या रांगांना पर्वतराजीचे क्षेत्र असे म्हणतात. डोंगरातील वा पर्वतातील उंच पण सपाट अशा विस्तीर्ण भूभागास पठार म्हणतात. पर्वताबाहेरील मोठ्या सपाट भूपृष्ठाला मैदान किंवा शिवार अथवा जमीन म्हणतात,” शिवमने सांगितले. “डोंगरांमध्ये गुहा कशा निर्माण झाल्यात?” कुणालने प्रश्न केला.
“समुद्राकाठच्या डोंगरांमध्ये एखाद्या ठिसूळ दगडावर पाण्याच्या लाटा आपटून आपटून काही ठिकाणी खोल गुहा निर्माण झाल्यात. काही ठिकाणी भूमिगत जलप्रवाहांमुळे ठिसूळ खडक फुटून त्या ठिकाणी गुहा तयार झाल्यात. काही ठिकाणी भूकंपामुळे किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे त्या डोंगरातील भूरचनेत बदल घडल्यामुळे गुंफा बनल्यात. काही ठिकाणी दगडावरील छिद्रातून पाणी सतत ठिबकते. काही काळाने ह्या ठिबकणाऱ्या पाण्याने तेथील चुनखडी विरघळते व बाहेरील कठीण भाग तसाच राहतो नि गुहा तयार होते.”
शिवमने सांगितले. “जंगल म्हणजे काय असते रे?” मंगलने प्रश्न टाकला. यात्रेकरू म्हणाला, “अरे बाळा तुला एवढेही माहीत नाही. अरे, अतिशय मोठमोठी विशाल वृक्ष, झाडेझुडपे जेथे घनदाट असतात अशा डोंगराला वा पडीक माळरानाला जंगल अथवा अरण्य म्हणतात.”
“जंगलात वणवा कसा पेटतो? सांगा बरे काका?” मंगलने यात्रेकरूला प्रश्न विचारला. शिवम् बोलला, “पूर्णपणे वाळलेली कोणतेही दोन लाकडे बराच वेळ एकमेकांवर घासली गेली तर प्रथम बरीच उष्णता निर्माण होते. ती तशीच आणखी थोडा वेळ परस्परांवर घासतच राहली, तर थोड्याच वेळात ती उष्णता खूप वाढते आणि ती उष्णता अति तीव्र झाली की तेथे अग्नी निर्माण होऊन आगीच्या ठिणग्या पडतात. ह्याच जंगलातील वाळलेला पालापाचोळा व सुकलेले गवत पेटते नि घनदाट अरण्यात आपोआप वणवा पेटतो. जंगलातील वाऱ्याने व सभोवतीच्या वाळलेल्या पालापाचोळ्याने व सुकलेल्या गवताने तो चोहीकडे पसरतो व जंगलाचे खूप नुकसान करतो. त्यात वृक्ष, झाडे-झुडपे तर जळतातच पण बरेच वन्य प्राणीही जळून खाक होतात. ज्यावेळी वारा थांबतो व त्याला पसरण्यास पालापाचोळा नि गवत मिळत नाही त्यावेळी तो आपोआप विझतो.”






