पुस्तके ही मानवी संस्कृतीचा जिवंत वारसा आहेत. 'वाचाल तर वाचाल' हे सूत्र आजही कालातीत आहे; परंतु आजच्या धावपळीच्या युगात आपण केवळ माहितीचे संकलन करत आहोत की ज्ञानाची प्राप्ती? हा खरा प्रश्न आहे.
वाचनं ज्ञानदं बाल्ये, तारुण्ये शीलरक्षकम् । वार्धक्ये दुःखहारकं, हितं सद्ग्रन्थवाचनम् ॥
बालपणात ज्ञान देणारे, तारुण्यात चारित्र्याचे रक्षण करणारे आणि वार्धक्यामध्ये दुःखाचे हरण करणारे असे हे 'सद्ग्रन्थ वाचन' मानवी जीवनासाठी सर्वार्थाने हितकारक आहे. दरवर्षी २३ एप्रिल हा दिवस 'जागतिक पुस्तक दिवस' म्हणून साजरा केला जातो. लोकांना वाचनाची गोडी लागावी, दर्जेदार साहित्य प्रकाशित व्हावे आणि वाचन संस्कृतीबद्दल समाजात जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने भारतासह जगभरात विविध उपक्रम राबवले जातात.
केवळ अक्षरांवरून डोळे फिरवणे म्हणजे वाचन नव्हे; तर 'आकलनासह केलेले ध्वनीउच्चारण' म्हणजे वाचन. वाचनामुळे आपल्या जाणिवा समृद्ध होतात, आकलनशक्ती सखोल होते आणि अनुभवांचे विश्व व्यापक होते. पुस्तक ही एक अशी अनमोल भेट आहे, जी तुम्ही आयुष्यात पुन्हा पुन्हा उघडून त्याचा आनंद घेऊ शकता. प्रतिभावान लेखकांच्या सकस साहित्यामुळे आपल्या जगण्याला खऱ्या अर्थाने नवा अर्थ प्राप्त होतो.
हो, नक्कीच होतो! पण त्यासाठी वाचलेलं शब्दशः अर्थासहित मनापर्यंत आणि हृदयापर्यंत झिरपायला हवं. ज्याप्रमाणे दोन व्यक्तींमधील संवादात एकमेकांचे मुद्दे लक्षपूर्वक न ऐकल्यास ते केवळ निरर्थक ध्वनी ठरतात, तसंच वाचनाचं आहे. शब्दांमागचे बारकावे, त्यातील मथितार्थ आणि विषयाचा सखोल अभ्यास करून जे वाचले जाते, तेच खरे 'नेटके वाचन'. मी किती पुस्तके वाचली या आकड्यापेक्षा, ती 'कशी' वाचली आणि त्यातून मला काय गवसले, हे महत्त्वाचे आहे. जर वाचनामुळे माझ्या ज्ञानात भर पडत नसेल, माझ्या आचारात-विचारात परिवर्तन होत नसेल किंवा त्या ज्ञानाचा उपयोग समाजाला होत नसेल, तर अशा भरमसाट वाचनाचा उपयोग काय? असे वाचक म्हणजे केवळ 'पढत मूर्ख'! ते यंत्रमानवासारखे माहितीची देवाणघेवाण तर करतात, पण स्वतः मात्र ज्ञानाच्या महासागरात दिशाहीन गटांगळ्या खात असतात. 'विद्या विनयेन शोभते' असे आपण म्हणतो. ज्याप्रमाणे फक्त खूप गाणारा गवय्या नसतो किंवा खूप खाणारा खवय्या नसतो. जो रसिक सुरांनी हृदयाला तृप्त करतो तो खरा गवय्या आणि जो चवीने आस्वाद घेतो तो खरा खवय्या. तसाच जो साहित्यातून आनंद मिळवतो, ते ज्ञान आत्मसात करतो आणि इतरांनाही वाचनासाठी प्रेरित करतो, तोच 'खरा वाचक'.
अनेकदा विद्वत्तेचा अहंकार माणसाला ग्रासतो. पण ज्ञानाने समृद्ध होत असताना माणूस अधिकाधिक लीन व्हायला हवा. समृद्धता आणि अहंकार यातील ती पुसट रेषा कधी ओलांडली जाते, हे कळतही नाही.
या संदर्भात योगी चांगदेव आणि संत ज्ञानेश्वर यांचा प्रसंग बोलका आहे. चौदाशे वर्षे जगणाऱ्या चांगदेवांनी जेव्हा ज्ञानदेवांना पत्र पाठवण्याचे ठरवले, तेव्हा अहंकारापोटी म्हणा किंवा संभ्रमापोटी, त्यांना पत्राचा मायना सुचेना. अखेर त्यांनी 'कोरं भूर्जपत्र' पाठवले. ज्ञानदेवांनी त्याचा उपहास न करता चांगदेवांचे मन कोऱ्या पत्रासारखे निर्मळ असल्याचे ओळखले आणि त्यावर ओव्या लिहून त्यांना आत्मज्ञानाची दिशा दाखवली. लेखकाचे केवळ शब्द न वाचता त्यातील सुप्त अर्थ शोधण्याचा धडा ज्ञानदेव आपल्याला देऊन जातात.
चला, आपण मराठी साहित्य आणि वाङ्मय वाचूया. आपल्या मराठी शाळांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देऊया. मराठी वाचन संस्कृतीची प्रेरणा स्वतः घेऊया आणि इतरांनाही देऊया. संत ज्ञानेश्वरांच्या शब्दांत सांगायचे तर:
माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। हे वचन आपण आपल्या कृतीतून सार्थ ठरवूया!
केवळ अक्षरांवरून नजर फिरवणे म्हणजे वाचन नसून, लेखकाच्या अनुभवाशी एकरूप होऊन स्वतःला समृद्ध करणे हीच खरी वाचनकला आहे. २३ एप्रिलच्या 'जागतिक पुस्तक दिना'निमित्त, केवळ पुस्तकांचे आकडे न मोजता, त्यातील आशयाने आपले आयुष्य कसे उजळून निघेल, याचा विचार करणे आवश्यक आहे."
(लेखक, कवी, निवेदक) प्रसाद कुळकर्णी






