मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली. परंतु ही मंजुरी देताना विरोधकांनी पर्यावरणाच्या नावाखाली याला विरोध करण्याचा प्रयत्न केला.पण सन २००९मध्ये मुंबई ३ अ या प्रकल्पांतर्गत मध्य वैतरणा पाणी प्रकल्प हा त्यांच्या सत्तेच्या काळात पूर्ण झाला. पण त्यावेळेला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १ लाख ८७ हजार झाडे कापली गेली. तेव्हा त्यांचे हे पर्यावरण प्रेम कुठे होते असा सवाल करत भाजप नगरसेवक नितेश सिंह यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
मुंबई महापालिकेच्या सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पावर भाषण करताना भाजपचे स्वीकृत नगरसेवक नितेश सिंह यांनी पाण्यावरून नगरसेवक चिंतेत आहे. कुणी म्हणतेय पाण्यावरून युध्द पेटेल तर मला तर आत्ताच पाण्यावरून भीती वाटायला लागली असे सांगत पाण्यावरून विरोध करणे हे योग्य नसून आपण मुंबईकरांना जेवढे पाणी देतो तेवढे कमी पडत आहे, मग मागणी आणि पुरवठ्यातील तुट कशी भरुन काढणार असा सवाल सिंह यांनी केला.
यावेळी त्यांनी कुर्ला विभागातील पाणी समस्येवर लक्ष केंद्रीत करताना आपल्या घरीही टँकरने पाणी करण्याची वेळ आल्याचे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. ही सर्व मेहरबानी टँकर माफियांनी असून मुंबईत ३० टक्के अनधिकृत जलजोडण्या आहेत.या अनधिकृत जलजोडण्या तोडल्यास तब्बल ७०० दशलक्ष लिटर पाणी वाचू शकेल.पण याला महापालिकेचे अधिकारी तयार नाहीत. जलअभियंता विभागाचे अधिकारी आपल्याच धुंदीत आहे. ते एसी कार्यालयात बसून करतो, बघतो, सांगतो, जेईला सांगतो, रात्री येणार पाणी अशीच कारणे देतात. त्यामुळे आता या टँकर माफियांची टोळी संपुष्टात आणण्यासाठी अनधिकृत जलजोडण्या तोडून टाकायला हव्यात, आणि जर या अनधिकृत जलजोडण्या तोडण्याची हिंमतच नाही तर अधिकृत तरी करू टाका, निदान त्या पाण्यापासूनचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा होईल.
यावेळी त्यांनी मुंबईतील विहिरींचे सर्वेक्षण करण्याची सूचना महापौरांना करून जेवढ्या विहिरी आहेत, त्यातील झोपडपट्टी भागांमध्ये असलेल्या विहिरी तपासून आपण त्यातील पाणी विकू शकतो हे पाहावे. या विहिरींच्या आसपास रासायनिक प्रक्रिया कारखाने, त्यांचे सांडपाणी येत नसेल तर त्या विहिरींमधील पाणी आर ओ प्लांट लावून त्याचा वापर पिण्यासाठी करण्यात यावा अशी मागणी नितेश सिंह यांनी केली.






