मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे ही मुंबई महानगर क्षेत्राची जीवनवाहिनी आहे. वाजवी दरात वेगाने प्रवास करण्याचा पर्याय म्हणून लाखो मुंबईकर रेल्वेची निवड करतात. दररोज पश्चिम रेल्वेद्वारे सुमारे ३० लाख तर मध्य रेल्वेद्वारे सुमारे ६२ लाख प्रवासी प्रवास करतात. पश्चिम रेल्वे चर्चगेट ते डहाणू आणि मध्य रेल्वे ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, कर्जत, खोपोली, गोरेगाव, पनवेल आणि उरण अशी आडवीतिडवी पसरली आहे. कार्यालयीन वेळांमध्ये गाड्यांच्या दारांवर लटकत शेकडो प्रवासी जीव धोक्यात टाकून प्रवास करतात पण रेल्वेचाच पर्याय निवडतात. रेल्वेच्या सर्व गाड्या १२ डब्यांच्या आहेत. मोजक्या गाड्या १५ डब्यांच्या आहेत. पण ही व्यवस्था अपुरी पडत आहे. गर्दी हाताळणे आजही रेल्वेसाठी आव्हान आहे. यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि चर्चगेट ते विरार या दोन मार्गांसाठी भुयारी रेल्वेबाबत विचार सुरू आहे. सध्याची व्यवस्था सुरू ठेवून ही अतिरिक्त व्यवस्था सुरू करता येईल का याचीही चाचपणी सुरू आहे.
मुंबईत जागेची टंचाई आहे. रेल्वेचा विस्तार करायचा तर भूसंपादनासाठीच अब्जावधींचा खर्च होईल अशी स्थिती आहे. शिवाय अतिक्रमण हटवणे, नागरिकांचे पुनर्वसन करणे हे सर्व खर्चिक काम आहे. या खर्चात बचत करण्यासाठीच भुयारी मार्गांचा विचार सुरू आहे. या प्रकारात सामान्य रेल्वे विस्तार योजनेच्या तुलनेत कमी भूसंपादन करुनही रेल्वेचा विस्तार शक्य होईल. यामुळेच भुयारी मार्गाच्या व्यावहारिकतेची चाचपणी सुरू आहे.
सध्या पश्चिम रेल्वेद्वारे सुमारे ३० लाख तर मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, कर्जत पर्यंत सुमारे ३८ लाख प्रवासी प्रवास करतात. या गर्दीला सुयोग्य पद्धतीने हाताळण्यासाठी तसेच प्रवास अधिक सुरळीत करण्यासाठी भुयारी रेल्वे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. भुयारी रेल्वेमुळे रुळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासही मदत होणार आहे. भुयारी मार्ग तयार झाल्यास प्रवाशांना सुरक्षित प्रवेश किंवा बाहेर पडण्याची व्यवस्था करता येईल आणि लोकल, मेल-एक्सप्रेस, मालगाड्यांसाठीही स्वतंत्र मार्ग करण्यास मदत होईल. या सर्व बाबींचा विचार करून मुंबई रेल्वे विकास महामंडळाने चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या पहिल्या टप्प्याच्या भुयारी रेल्वेच्या तांत्रिक तसेच आर्थिक गोष्टींचाही अभ्यास सुरू केला आहे. अंतिम निर्णय केंद्र आणि राज्य सरकार रेल्वेशी समन्वय राखून घेणार आहेत.






