मुंबई : भारतीय हवामान खात्याने यंदाच्या मान्सूनबाबत सुधारित अंदाज जाहीर करत देशभरात सरासरीच्या सुमारे ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यापूर्वी हा अंदाज ९२ टक्के होता; मात्र आता त्यात घट करण्यात आल्याने यंदाचा मान्सून तुलनेने कमकुवत राहू शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः शेतीवर अवलंबून असलेल्या राज्यांसाठी हा इशारा गंभीर मानला जात आहे.भारतातील बहुतांश शेती ही आजही पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे मान्सून कमी राहिल्यास त्याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होऊ शकतो. मागील तीन वर्षांनंतर प्रथमच मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच वाढते इंधनदर, खतांचे महागलेले दर, बियाण्यांचा खर्च आणि मध्यपूर्वेतील संघर्षामुळे वाढलेला वाहतूक खर्च यामुळे कृषी क्षेत्र आर्थिक दबावाखाली आहे. अशा परिस्थितीत कमी पाऊस पडल्यास परिस्थिती आणखी कठीण होण्याची शक्यता आहे.हवामान तज्ज्ञांच्या मते, प्रशांत महासागरातील एल निनोची स्थिती पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हे यामागील प्रमुख कारण आहे. एल निनोचा परिणाम भारतीय मान्सूनवर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे अनेक वर्षांच्या हवामान अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. सामान्यतः एल निनो सक्रिय झाल्यास भारतात पावसाचे प्रमाण घटते आणि अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.
पंजाबवरही विशेष लक्ष नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने दिल्लीसह चार राज्यांमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करत संघटनात्मक फेरबदल केले आहेत. ...
जलविद्युत निर्मितीवर होणार परिणाम
भारतीय हवामान विभागाच्या निकषांनुसार, मान्सून काळात देशात सरासरी ८७ सेंटीमीटर पाऊस पडतो. जर पावसाचे प्रमाण ९६ ते १०४ टक्क्यांच्या दरम्यान असेल, तर तो ‘सामान्य’ मानला जातो. मात्र यंदाचा अंदाज ९० टक्क्यांच्या आसपास असल्याने तो ‘सामान्यपेक्षा कमी’ या श्रेणीत मोडतो. याचा अर्थ देशातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी राहू शकते. ऊर्जा क्षेत्रावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. धरणांतील पाणीसाठा कमी राहिल्यास जलविद्युत निर्मितीवर परिणाम होईल. उष्णतेच्या लाटा आणि पाण्याअभावी आरोग्याच्या समस्याही वाढू शकतात. यंदाचा मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता लक्षात घेता, पाण्याचा काटकसरीने वापर, जलसंधारण, पर्यायी पिकांची निवड आणि हवामानानुसार कृषी नियोजन याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सायप्रस येथील अवैध बेटिंग प्लॅटफॉर्म 'परिमाच'च्या विरोधात सहा राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकून ३ हजार कोटी ...
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर होणार
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता अधिक आहे. हे भाग आधीपासूनच पाण्याच्या समस्येला सामोरे जात असल्याने परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यांनी पुढील वर्षभरात या परिस्थितीचे परिणाम शेती, पिण्याचे पाणी, ऊर्जा उत्पादन आणि सार्वजनिक आरोग्यावर जाणवू शकतात, असेही नमूद केले.






