नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
काळच वेगळा होता. घरात मूल नसणे हे कमीपणाचे मानले जाई. हल्लीसारखे शहरी समाजातसुद्धा ‘चंगळ हवी, मूल नको’ हे धोरण तेव्हा आलेले नव्हते. भारतीय जीवनमूल्यांवर लोकांचा दृढ विश्वास होता. अपत्य नसेल, तर आई-वडिलांना मृत्यूनंतर मोक्ष मिळणार नाही अशी श्रद्धा होती. घरात कुणीतरी आपल्यापेक्षा लहान असावे, घरभर दुडुदुडू धावणारे, आपल्या जगात नुसते येण्यानेच वेगवेगळी नाती निर्माण करणारे बाळ असावे, कुणावर तरी हेतूशिवाय, स्वार्थाशिवाय, निरपेक्ष प्रेम करण्याचा आणि त्याच्याकडून ते मिळण्याचा अनुभव घ्यावा ही भावना नैसर्गिक होती. त्या लहानग्याचे पालनपोषण करावे, त्याला मोठे होताना पाहावे, त्याच्यावर संस्कार करून एक चांगली व्यक्ती घडवण्याचा अनुभव घ्यावा असे सर्व विवाहितांना वाटायचे. मूल नसेल, तर विवाहित स्त्री दु:खी असायची, सतत झुरायची. मग तिचा पती तिचे मन सांभाळण्यासाठी काहीही करायला तयार असायचा. त्याच भावनेवर १९६८ला कुंदन कुमार यांनी निर्माण केलेला ‘कुंदन फिल्म्स’चा सिनेमा आला होता ‘औलाद’. दिग्दर्शनही त्यांचेच होते. सर्व गाणी मजरूह सलतानपुरी यांची आणि त्यांना संगीत दिले चित्रगुप्त श्रीवास्तव यांनी. जितेंद्र (सिनेमात सोहन आणि सुरज) आणि बबिता (भारती) या जोडीबरोबर होते - सुजितकुमार (डॉ. मोहन), मनमोहन कृष्ण (जमीनदार), नझीर हुसैन (दिनू), हरी शिवदासानी (मेजर गुप्ता), मेहमूद (चार्ली), जीवन (मुनीम रामलाल), अचला सचदेव (शारदा), अरुणा इराणी (शोभा) आणि हेलन. चित्रगुप्त यांचे संगीत कर्णमधुर होते. ‘अरमा था हमे जिनका वो प्यारके दिन आये’ या गाण्यात गडद निळ्या साडीतली बबिता मोहक आणि पांढऱ्याशुभ्र शर्ट-पॅण्टमध्ये जितेंद्र देखणा दिसला होता. ‘कबतक हुजूर रूठ रहोगे, लेके गुस्सेमे प्यार अब तो हंसो.’ हे गाणे बिनाकाच्या १९६९च्या सर्वाधिक लोकप्रिय गाण्याच्या नामांकनात २७ क्रमांकावर आले. ‘अबके बहार आयी हैं, तुम्हारे नामसे, मस्ती फिजामे हैं इन्ही लबोके जामसे’च्या वेळी बबिता गुलाबी पंजाबी ड्रेसमध्ये फार गोड दिसली.
पूर्वी कथानकाचा ताण अधूनमधून हलका करण्यासाठी मूळ कथेसोबत एखाद्या विनोदी जोडीचीही कथा गुंफलेली असायची तशी ‘औलाद’मध्ये ती होती मेहमूद आणि अरुणा इराणीच्या प्रेमाची. मेहमूद हा सिंगापूरला राहिलेला चिमणलाल ऊर्फ ‘चार्ली’ असतो आणि स्वत:ला इंग्रजी समजत असतो. जितेंद्रकडे मॅनेजर म्हणून नोकरी करायला आल्यावर तो अरुणा इराणीच्या प्रेमात पडतो. त्याच्या विनोदी स्वभावामुळे त्याने बोलण्यात सहजच ‘ये हरियाली और रास्ता’, ‘तू जहा जहा चलेगा, मेरा साया’ अशा हिंदी सिनेगीतांचे संदर्भ आणून आपल्या चतुरपणाचा परिचय दिला होता. एका गंमतीदार दृश्यात मेहमूद अरुणाला मेकओव्हर करून इंग्रजी वेशभूषा करायचा आग्रह करतो. ती उलट त्याला भारतीय जीवनशैली स्वीकारून खरा भारतीय होण्याचा आग्रह करते. हा काळ होता १९६८चा, म्हणजे तब्बल ५८ वर्षांपूर्वीचा! त्याकाळी अनेक परदेशी गोष्टींबद्दल सर्वच लोकांना एक आकर्षण होते. मजरुहजींनी मेहमूद आणि अरुणा इराणीसाठी एक गाणे लिहिले. ते एकेकाळी लोकप्रियही झाले होते. मन्ना डे आणि आशा भोसलेंनी मजेदारपणे गायलेल्या त्या गाण्याचे शब्द होते - “जोड़ी हमारी जमेंगा कैसे जानी, हम तो है अंग्रेज़ी, तुम लड़की हिंदुस्तानी” असे जेव्हा मेहमूद म्हणतो तेव्हा अरुणा म्हणते - “तुमको भी मुश्कील मुझे भी परेशानी, बात मानो सैयां, बन जाओ हिंदुस्तानी.” त्याकाळी पाश्चिमात्य देशातील स्वच्छंदीपणामुळे, मुक्ततेमुळे त्या चंगळवादाकडे आकृष्ट झालेला मोठा वर्ग होता. अशा भारतीय तरुणांचे प्रतिनिधित्व करणारे पात्र म्हणून लेखकाने मेहमूदला उभे केले होते. तो म्हणतो - “अंग्रेज़ी मुल्कमें कितना रोमांस है, बाहरका छोकरी कितना अॅडवांस है.” त्याला अरुणा इराणीने त्याच्याशी केवळ प्रेमच नाही, तर बिनधास्त रोमान्स करावा अशी अपेक्षा आहे. म्हणून तो इंग्रजी समाजाचे उदाहरण देऊन म्हणतो तिकडच्या मुली किती पुढारलेल्या आहेत तुही तशी हो.’ अरुणा इराणीचे मजरूहजींनी लिहून दिलेले उत्तर मात्र ठाम आहे. ती म्हणते, “भारतीय मुलीच्या तोंडावर एक लाजेचा पडदा असतो रे! ती कधी इतक्या प्रेमाने तुझ्याकडे पाहणारसुद्धा नाही. अरे इथे तर आमच्या घुंगटमध्येच यौवन फुलत असते. हे समजून घे.’ “देखेगी ना कभी वो इतने प्यारसे, मुखड़ेपे लाजका अंचरवा डारके, खिलती है सजना घूंघटमें जवानी, जोड़ी हमारी जमेगा कैसे जानी...” रोमांटिक मूडमध्ये गेलेला बिचारा मेहमूद मग तोंडीच कल्पना करून आनंद घेताना म्हणतो, ‘मी तुला रोज प्रेम कसे करायचे ते दोन तास प्रेमाने मिठीत घेऊन शिकवीन.’ यावर अरुणातील संकोची भारतीय युवती गोंधळते आणि त्याला विनंती करू लागते. ‘अरे बाबा, तशी काही लगटबिगट करू नकोस हं! नाही तर माझे काजल विस्कटून जाईल. कानातले डूल तुटतील. मग मला तर रडूच येईल! “बाहोमे थामके दो घंटा रोज मैं, तुमको सिखलायेंगा, उल्फटका पोज मैं, दइया रे नैनका कजरा ना छूट जाए, झकझोरोना पिया झुमका ना टूट जाए. रो देगी देखो तुम्हारे दिलकी रानी, तुमको भी मुश्कील मुझे भी परेशानी...” मजरूहजींचे लक्ष आजूबाजूच्या परिस्थितीकडे किती बारीक होते तेही पुढच्या ओळीतून दिसते. तेव्हा फक्त खूप मोठ्या शहरात आणि अतिश्रीमंत घरातच मुलींनी केस कापायची फॅशन सुरू होत होती. त्यामुळे चार्ली शोभाला म्हणतो, ‘प्रिये इकडे ये, मी तुझे लांबचलांब केस कापून टाकतो कारण तुला आता ‘हीर रांझा’मधल्या ‘हीर’पासून ‘रोमियो ज्युलीयट’मधली ‘ज्युलीयट’ बनायचे आहे! ‘लाओ मैं काट दू लंबी लंबी ये लट, तुमको तो हीरसे बनना ज्युलीयट. यु ना पागल बनो देखो रे बालमा, चिल्लाके शोर मैं कर दुंगी जालमा, जुल्फे कटाके लगुंगी मैं दिवानी.’
मग तर शोभा त्याला भीतीच दाखवताना म्हणते, तू माझ्या केसांना हात जरी लावलास तरी मी आरडाओरडा करेन हं! अरे वेड्या, केस कापल्यावर मी लोकांना वेडीच नाही का वाटणार?’ अशी अनेक गंमतीशीर गाणी आपल्या सिद्धहस्त गीतकरांनी लिहून ठेवली आहेत. ‘औलाद’च्या बरोबर १० वर्षे आधीच येऊन गेलेल्या रागिणी(१९५८) मध्ये असेच एक गाणे खुद्द किशोरदांवर आणि दाक्षिणात्य सौंदर्यवती पद्मिनीवर चित्रित झाले होते. शब्द होते, “मैं बांगाली छोकरा करू प्यारको नोमोस्कारम” आणि त्याच्या प्रेमात पडलेली पद्मिनी म्हणते, “मैं मद्रासी छोकरी, मुझे तुझसे प्यारम.” पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी!






