Saturday, April 18, 2026

BMC News : अंकित प्रभू यांचा लहान तोंडी मोठा घास; सभागृह नेत्यांची अप्रत्यक्ष उडवली खिल्ली

BMC News : अंकित प्रभू यांचा लहान तोंडी मोठा घास; सभागृह नेत्यांची अप्रत्यक्ष उडवली खिल्ली

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभागृहात उबाठाचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या भाषणांत आमदार सुनील प्रभू यांचे यांचे पुत्र अंकित यांनी महापालिका सभागृहात वामनराव महाडिक यांनी तब्बल ८ तास संस्कृतमध्ये भाषण केल्याचे सांगत एकप्रकारे जणू काही आपण त्यावेळी उपस्थितच होतो,असे भासवण्याचा प्रयत्न केला. परंतु महाडिक यांनी अशाप्रकारे भाषण केल्याचे मी वाचले आहे किंवा ज्येष्ठ नगरसेवकांकडून ऐकले आहे असे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी न केल्यामुळे एकप्रकारे त्यांच्या भाषणातील मीपणा दिसून आला.एवढेच नाही तर त्यांनी वारंवार अप्रत्यक्षपणे सभागृहनेत्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा देव कडक असल्याचे सांगत कधीतरी आम्हाला आपल्या देवाकडेही घेवून चला असे सांगण्याचा प्रयत्न केला. भाजपाच्या नगरसेवकांनी देवाभाऊ... देवाभाऊ असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अंकितला नक्की खणकर यांच्या कोणत्या देवाला भेटायचे आहे असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला.

मुंबई महापालिकेच्या सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पावर भाषण करताना उबाठाचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी भाषणाच्या ओघात आपल्या समोर वरिष्ठ नगरसेवक असल्याचे तसेच सभागृहनेते यांचा सन्मान राखण्याऐवली त्या पदाचीच खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. सभागृहनेते खणकर यांना २० कोटी रुपयांचा निधी मिळाला, पण आम्हाला २५ लाख असा सवाल करत भगिनी शहर असलेल्या स्टुडगार्डचे महापौर मुंबईला येतात, तसेच या २० कोटींमध्ये आपला प्रभाग असा बनवा कि स्टुडगार्डचे महापौर तिथे यायला हवे. परंतु एवढेच करून ते थांबले नाही तर सभागृहनेते हे बाहेर चांगले असतात पण सभागृहात आल्यावर त्यांचा बीपी वाढतो असे सांगत त्यांची एकप्रकारे खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. तसेच खणकर यांनी मागील महापालिकेत स्वीकृत नगरसेवक असताना त्यांना पक्षाने आदेशानुसार त्यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिला. पण त्यांनी राजीनामा दिल्यानंतर कोविड आला आणि सभागृहच झाले नाही. त्यामुळे त्यांचा देव एवढा कडक आहे की सभागृहाचे कामकाजच झाले नाही. त्यामुळे खणकरजी आम्हालाही आपल्या देवाचे दर्शन घडवा,असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर भाजपच्या नगरसेवकांनी देवाभाऊ... देवाभाऊ असे बोलण्या सुरुवात केली. त्यामुळे अंकितला कुठल्या देवाला भेटायचे आहे ते त्यांनी ठरवावे अशी चर्चा तिथे रंगली होती.

अंकित प्रभू यांनी आपल्या भाषणात हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगितले. परंतु ही समस्या महापालिकेत सत्ता असल्यापासून होती. त्यामुळे सत्ता जाताच प्रभूंनी हे दिसून आले का अशी कुजबूज सभागृहात ऐकायला मिळत होती. कोस्टल रोडवर जपानी तंत्रज्ञानाचा वापर केला, पण यावर न्यायालयाने ताशेरे ओढले. त्यामुळे जपानी तंत्रज्ञानाचा वापर करायचा होता, तर कचरा आणि रस्ते बनवण्याच्या जपानी तंत्रज्ञानाचा वापर का केला नाही,असा सवाल केला.

मी पुन्हा येईन...

अंकित प्रभू यांचे भाषण सुरु असतानाच महापौर रितू तावडे यांनी काही कारणास्तव मला सभागृहाच्या बाहेर जावे लागेल असे सांगत निघून गेल्या.यावर प्रभू यांनी महापौर महोदया तुम्ही बसा आग्रह करण्याचा प्रयत्न केला, यावर महापौरांनी मी पुन्हा येईन, पुन्हा येईन असे सांगत निघून गेल्या. त्यामुळे सभागृहात एक हास्यकल्लोळ माजला.

Comments
Add Comment