Sunday, April 12, 2026
Nari Shakti Vandan

Iran Israel War : खामेनी यांच्या निधनावर भारताची श्रद्धांजली; परराष्ट्र सचिव यांनी दिली इराणी दूतावासाला भेट

Iran Israel War : खामेनी यांच्या निधनावर भारताची श्रद्धांजली; परराष्ट्र सचिव यांनी दिली इराणी दूतावासाला भेट

भारत सरकारतर्फे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाला भेट देऊन इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी त्यांनी दूतावासात ठेवलेल्या शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी करून आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

विक्रम मिस्री यांनी खामेनी यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत इराणची सरकार आणि तेथील जनतेप्रती सहवेदना व्यक्त केली. या कठीण काळात भारताने इराणसोबत एकजूट आणि सहानुभूती व्यक्त केली आहे.यासोबतच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी इराणच्या राजनैतिक प्रतिनिधींशी भेट घेऊन भारताकडून शोकसंदेश नोंदवला. त्यांनी खामेनेई यांच्या निधनावर खोल शोक व्यक्त करत इराणच्या सरकार आणि जनतेबद्दल सहानुभूती व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शांततेचे आवाहन :

भारताचे इराणसोबत दीर्घकाळापासून राजनैतिक आणि आर्थिक संबंध आहेत. त्यामुळे या घटनेनंतर भारताची प्रतिक्रिया प्रादेशिक कूटनीतीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रदेशात शांततेचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की कोणत्याही समस्येचे समाधान केवळ लष्करी संघर्षातून होऊ शकत नाही.

संवाद आणि कूटनीती हाच उपाय :

पंतप्रधान मोदी म्हणाले की; संवाद आणि कूटनीती हाच कायमस्वरूपी उपाय आहे. त्यांचे म्हणणे आहे की पश्चिम आशियात वाढत असलेला तणाव संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे आणि हा संघर्ष लवकरात लवकर थांबला पाहिजे. या संकटाच्या काळात भारताने संतुलित आणि सावध भूमिका घेतली आहे. एकीकडे भारत इराणसोबतचे आपले पारंपरिक संबंध टिकवून ठेवू इच्छितो, तर दुसरीकडे जागतिक शांतता आणि स्थैर्यालाही प्राधान्य देत आहे. तज्ज्ञांच्या मते, भारताची ही भूमिका प्रादेशिक संतुलन राखणे आणि आपल्या रणनीतिक हितांचे संरक्षण करणे या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.

दरम्यान, पश्चिम आशियात गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती सतत बिघडत आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणमध्ये लष्करी कारवाई सुरू केली असून दोन्ही बाजूंनी सातत्याने हल्ले होत आहेत. या संघर्षामुळे संपूर्ण प्रदेशात अस्थिरता वाढली आहे. अनेक देशांना भीती आहे की परिस्थिती लवकर नियंत्रणात आली नाही तर हा संघर्ष अजून व्यापक रूप धारण करू शकतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा