Monday, August 17, 2026

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 79 वर मध्यरात्री भीषण अपघात झाला. मजुरांना घेऊन जाणाऱ्या लोडिंग वाहनाला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर महामार्गावर काही काळ मोठी गर्दी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. (Madhya Pradesh News)

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व मजूर उत्तर प्रदेशातील रहिवासी होते. ते मध्य प्रदेशातील डबरा परिसरातील चनूर भागात भात लागवडीच्या कामासाठी आले होते. दिवसभराचे काम संपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास ते लोडिंग वाहनातून परतत होते. चिन्का परिसरात पोहोचले असताना समोरून आलेल्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ( Gwalior Accident)

धडक इतकी जोरदार होती की मजुरांचे वाहन रस्त्यावर उलटले. या दुर्घटनेत अनेक जण वाहनात अडकले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना वाहनातून बाहेर काढून रुग्णवाहिकांच्या मदतीने ग्वाल्हेरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Truck Accident)

पोलिसांच्या माहितीनुसार, 5 मजुरांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. त्यानंतर उपचारादरम्यान आणखी 3 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा 8 वर पोहोचला आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलीस अधिकारी राम महेश यादव यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले. सध्या 25 ते 26 जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चालकाचा शोध सुरू आहे. (Accident News)

अपघात नेमका कशामुळे झाला, ट्रकचा वेग किती होता आणि चालकाकडून काही निष्काळजीपणा झाला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. या दुर्घटनेमुळे मृत मजुरांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >