Saturday, February 7, 2026

ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान

ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान

भाजप पहिला क्रमांक राखणार?

राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर, आता भारतीय जनता पक्षाने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. आज होत असलेल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही 'नंबर १'चा क्रमांक टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे. शहरी भागात मतदारांनी भाजपला पसंती दिली असली, तरी ग्रामीण महाराष्ट्रात पक्षाचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष रणनीती आखली आहे. 'मिनी विधानसभा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुका फडणवीस यांच्या नेतृत्वाची आणि भाजपच्या ग्रामीण प्रभावाची खरी चाचणी ठरणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नागरी निवडणुकांमधील विजयाची लाट ग्रामीण भागातही कायम राहणार का आणि भाजप आपला पहिला क्रमांक राखणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दिग्गज नेत्यांसह ६८० उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला

गेल्या तीन आठवड्यांपासून परभणी जिल्ह्यात सुरू असलेला निवडणुकीचा धुरळा आज शमणार असून, मतदानाच्या रूपाने अंतिम निकालाची प्रक्रिया सुरू होत आहे. जिल्हा परिषदेच्या ५४ जागा आणि पंचायत समितीच्या १०८ जागांसाठी आज जिल्ह्यातील मतदार आपला कौल देणार आहेत. या निवडणुकीत एकूण ६८० उमेदवार (जिल्हा परिषद २४७ आणि पंचायत समिती ४३३) रिंगणात असून, त्यांच्या राजकीय भविष्याचा फैसला आज मतपेटीत बंद होईल. मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतून १,२७८ मतदान केंद्रांवर ईव्हीएम (EVM) मशीन आणि निवडणूक साहित्याचे वाटप पूर्ण करण्यात आले आहे. सर्व मतदान अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या केंद्रांवर पोहोचले असून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ही प्रक्रिया पार पडत आहे. गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचारतोफा थंडावल्यानंतर आता मतदारांच्या मनात नेमके काय आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदानाला थोड्याचवेळात सुरुवात

राज्यातील राजकीय वातावरण तापवणारे १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांचे मतदान आज, ७ फेब्रुवारी रोजी पार पडत आहे. सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदार आपला कौल देतील. खरं तर या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होणार होत्या, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे पुकारण्यात आलेल्या राजकीय दुखवट्यामुळे निवडणूक आयोगाने मतदानाचा हा दिवस पुढे ढकलला होता. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कडेकोट तयारी केली असून, ज्या जिल्ह्यांत मतदान होत आहे तिथे शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आजच्या या चुरशीच्या लढतीचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असून, ग्रामीण भागाची सत्ता कोणाच्या हाती जाणार याचा फैसला अवघ्या ४८ तासांत होईल.

१२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान

आज १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी प्रत्यक्ष मतदान पार पडत आहे. या निवडणुकीसाठी संपूर्ण राज्य निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून कडेकोट बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी मतदान होत आहे. रिंगणात असलेल्या एकूण ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य राज्यातील तब्बल २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार ठरवणार आहेत. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत मतदारांचा कल कोणाकडे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 'सर्व मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा,' असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.

Comments
Add Comment