भारत व युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा
नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील ‘मदर ऑफ ऑल डील’वर स्वाक्षरी करण्यात आली आहे. त्यामुळे भारतासाठी हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. भारत व युरोपियन संघातील या मुक्त व्यापार कराराची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. भारत आणि युरोपियन युनियनमधील करार म्हणजे ‘सर्व करारांची जननी’ असल्याचे भाष्य पंतप्रधान मोदींनी केले आहे.
‘भारत-युरोपियन युनियन व्यापार करारामुळे भारतातील उत्पादन वाढेल आणि देशातील सेवा आणि संबंधित क्षेत्रांचा मोठ्या प्रमाणात विस्तार होण्यास मदत होईल. सर्व करारांची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुक्त व्यापार करारामुळे जागतिक व्यवसाय आणि गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास आणखी दृढ होईल’, असे मोदींनी म्हटले आहे.
‘हा व्यापार करार जागतिक पुरवठा साखळींना आणखी बळकटी देईल. भारतातील विविध क्षेत्र, जसे की कापड व्यवसाय, रत्न, दागिने यासह आदींना उद्योगांना या व्यापार कराराचा फायदा होणार आहे. जगातील लोक ‘सर्व करारांची जननी’ म्हणून या कराराची चर्चा करतील. या करारामुळे सर्व भारतीय आणि युरोपीयन देशांमधील लाखो लोकांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील. जगातील दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमधील समन्वयाचे हे एक अद्भुत उदाहरण ठरले आहे. हा करार जागतिक जीडीपीच्या अंदाजे २५ टक्के व जागतिक व्यापाराच्या एक तृतीयांश भागाचे प्रतिनिधित्व करतो’, असे मोदींनी म्हटले आहे.
‘या व्यापार करारामुळे भारतातील उत्पादनाला फक्त चालना मिळणार नाही, तर सेवांशी संबंधित सर्व क्षेत्रांचा विस्तारही होण्यास मदत होईल. या मुक्त व्यापार करारामुळे जगातील प्रत्येक व्यवसाय व गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास आणखी दृढ होईल, असा आशावाद मोदी यांनी व्यक्त केला आहे.
रोजगाराच्या नव्या संधी
या करारामुळे २०३२ पर्यंत भारत-युरोपीय संघ व्यापार दुप्पट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासोबतच भारतात लाखो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. विशेषतः उत्पादन, सेवा आणि एमएसएमई क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.
- कॅनडाचा मैत्रीचा हात पुढे
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांमध्ये भारताने युरोपियन युनियनसोबत आपली मैत्री आणखी मजबूत केली आहे. भारताने युरोपियन युनियनसोबत मुक्त व्यापार करार केला आहे. ज्याला मदर ऑफ ऑल डिल्स असे म्हटले जाते. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या करारावर शिक्कामोर्तब झाले. दुसरीकडे कॅनडाही भारतासोबत संबंध मजबूत करण्याचा विचार करत आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी येत्या मार्चमध्ये भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. तर त्यांचे मंत्री टीम हॉजसन याच आठवड्यात भारत दौऱ्यावर येत आहेत. - एकीकडे युरोपियन युनियनसोबत भारत करार करत आहे तर दुसरीकडे कॅनडाही भारतासोबत संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. कॅनडाचे पंतप्रधान भारत दौरा करण्याच्या विचारात आहेत. कार्नी मार्चच्या पहिल्या आठवड्यात भारतात येऊ शकतात. त्यावेळी युरेनियम एनर्जी, मिनरल्स, आर्टिफिशियल इंटेलिजेंस डीलवर स्वाक्षरी होऊ शकते. मागील वर्षी कॅनडाचे पंतप्रधान कार्नीच्या आमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ७ समिटमध्ये सहभागी झाले होते. कार्नी यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री भारतात आले आहेत. कॅनडातील भारताचे उचायुक्त दिनेश पटनायक यांनी कार्नी यांच्या भारत दौऱ्याबाबत माहिती दिली. गेली २ वर्ष कॅनडासोबत चर्चा थांबल्यानंतर आता पुन्हा दोन्ही देश संबंध सुधारण्यासाठी पुढे येत आहेत.
अमेरिकेचा जळफळाट
स्कॉट बेसेंट यांनी युरोपियन युनियनवर थेट रशिया-युक्रेन युद्धाला निधी पुरवल्याचा आरोप करत युरोपियन युनियन स्वतः विरुद्धच्या युद्धाला फायनान्स करत असल्याचा आरोप केला. स्कॉट बेसेंट यांनी म्हटले की, ‘गेल्या आठवड्यात काय घडले? याचा विचार करा, आम्ही भारतावर कर लादला आणि युरोप त्यांच्यासोबत व्यापार करार करत आहे. रशिया त्यांचे कच्च तेल भारतात पाठवतो. भारतात तेल शुद्ध केले जाते आणि नंतर युरोपला विकले जाते. तांत्रिकदृष्ट्या युरोप हे शुद्ध उत्पादन खरेदी करत आहे, जे प्रत्यक्षात रशियन तेल आहे. ते (युरोपियन देश) स्वतःविरुद्ध युद्धासाठी निधी पुरवत आहेत’, असे स्कॉट बेसेंट यांनी म्हटले आहे.
काय-काय वस्तू स्वस्त होणार?
या करारामुळे आपल्या दैनंदिन आयुष्याशी संबधित वापराच्या आणि औद्योगिक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. यात कारपासून ते केमिकल्सपर्यंत, तसेच वाइन, बिअर आणि मद्यपदार्थांचे दरही कमी होऊ शकतात. हा करार मद्य, अन्नपदार्थ, रसायने, मशीनरी, औषधे आणि एअरोस्पेस क्षेत्रातील किमती कमी करू शकतो.