Thursday, April 2, 2026

Bullet Train : "बुलेट ट्रेनचा मुहूर्त ठरला! १५ ऑगस्ट... पहिली गाडी 'या' मार्गावर धावणार; मुंबईत कधी?

Bullet Train :

मुंबई : भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला मुंबईत अनपेक्षित खीळ बसली आहे. मुंबई महापालिकेने प्रदूषणाच्या मुद्द्यावरून या प्रकल्पाला नोटीस बजावली असली, तरी दुसरीकडे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या हाय-स्पीड ट्रेनच्या लोकार्पणाचा मुहूर्त जाहीर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबई महापालिकेच्या 'एच-पूर्व' (H-East) विभागाने बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम तूर्तास थांबवण्याचे आदेश दिले आहेत. प्रकल्पाच्या कामादरम्यान प्रदूषणाबाबतच्या नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. धुळीचे नियंत्रण आणि इतर पर्यावरणपूरक उपाययोजनांची अंमलबजावणी न केल्याने बीएमसीने ही कठोर कारवाई केली आहे. या 'स्टॉप वर्क' नोटीसमुळे मुंबईतील प्रकल्पाच्या कामाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एकीकडे मुंबईत कामाला स्थगिती मिळाली असतानाच, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मात्र देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या लोकार्पणाचा कालावधी स्पष्ट केला आहे.

मुंबई-अहमदाबाद अंतर केवळ २ तासांत

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणाचा मुहूर्त जाहीर केला असून, १५ ऑगस्ट रोजी पहिली बुलेट ट्रेन प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते अहमदाबाद हे ५०८ किमीचे अंतर अवघ्या २ तास ७ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मुंबईतील बीकेसी ते शिळफाटा दरम्यानचा २१ किमी लांबीचा अजस्त्र बोगदा. या बोगद्यामध्ये ठाणे खाडीच्या खालून जाणारा ७ किमीचा भाग समाविष्ट आहे, जो या प्रकल्पातील अभियांत्रिकीचा एक चमत्कार मानला जात आहे. बोगद्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी रेल्वेने दोन वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला आहे:

१. NATM पद्धत : शिळफाटा आणि घणसोली दरम्यानचा ५ किमीचा भाग 'न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड' (NATM) वापरून बांधला जात आहे. २. TBM पद्धत : उर्वरित १६ किमीचा बोगदा भव्य 'टनेल बोरिंग मशीन' (TBM) द्वारे तयार केला जात आहे.

प्रवाशांना दर ३० मिनिटांनी सेवा

प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर प्रवाशांना ट्रेनसाठी तासनतास वाट पाहावी लागणार नाही. दर ३० मिनिटांच्या अंतराने बुलेट ट्रेन उपलब्ध असेल, ज्यामुळे व्यावसायिक आणि पर्यटकांच्या वेळेत मोठी बचत होईल. १५ ऑगस्टच्या मुहूर्तामुळे देशाला स्वातंत्र्यदिनी एक मोठी 'आधुनिक भेट' मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

बुलेट ट्रेनचा 'श्रीगणेशा' १५ ऑगस्ट २०२७ ला!

भारताच्या पहिल्या हाय-स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, या प्रकल्पाचा पहिला टप्पा १५ ऑगस्ट २०२७ रोजी प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. हा पहिला टप्पा गुजरात मधील सुरत ते बिलिमोरा दरम्यान असेल. यानंतर वापी ते सुरत, मग वापी ते अहमदाबाद आणि सर्वात शेवटी मुंबई ते अहमदाबाद असा पूर्ण मार्ग कार्यान्वित केला जाईल. या प्रकल्पासाठी जपानचे जगप्रसिद्ध 'शिंकान्सेन' (Shinkansen) हाय-स्पीड ट्रेन तंत्रज्ञान वापरले जात आहे, जे आपल्या सुरक्षिततेसाठी आणि अचूक वेळेसाठी ओळखले जाते. या पूर्ण कॉरिडॉरवर एकूण १२ स्थानके असतील. या प्रकल्पामुळे केवळ प्रवास वेगवान होणार नाही, तर मुंबई आणि अहमदाबादमधील व्यापार, गुंतवणूक आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.

मुंबईतील बीकेसी स्टेशन अभियांत्रिकीचा चमत्कार

या संपूर्ण मार्गावरील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण स्थानक मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे उभारले जात आहे. हे या कॉरिडॉरवरील एकमेव भूमिगत (Underground) स्टेशन असेल. हे स्टेशन जमिनीखाली सुमारे ३२.५० मीटर (अंदाजे १०६ फूट) खोलीवर असेल. यात प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअर असे एकूण तीन मजले असतील. प्रत्येक स्थानकावर सहा प्लॅटफॉर्म असतील आणि हे स्टेशन मेट्रो तसेच रस्ते वाहतुकीशी जोडलेले असेल, जेणेकरून प्रवाशांना सहज प्रवास करता येईल.

असा असेल बुलेट ट्रेनचा प्रवास (टप्प्याटप्प्याने) :

१. पहिला टप्पा : सुरत ते बिलिमोरा (१५ ऑगस्ट २०२७) २. दुसरा टप्पा: वापी ते सुरत ३. तिसरा टप्पा: वापी ते अहमदाबाद ४. चौथा टप्पा: ठाणे ते अहमदाबाद ५. अंतिम टप्पा: मुंबई ते अहमदाबाद

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा