Friday, August 7, 2026

IRCTC Japan Tour Package : IRCTC ची भन्नाट ऑफर : दिल्ली ते जपान १० दिवसांची मस्त सफर; टोकियो, ओसाका अन् हिरोशिमा फिरण्याची संधी!

IRCTC Japan Tour Package : IRCTC ची भन्नाट ऑफर : दिल्ली ते जपान १० दिवसांची मस्त सफर; टोकियो, ओसाका अन् हिरोशिमा फिरण्याची संधी!

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या 'इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन'ने (IRCTC) परदेशात फिरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पर्यटकांसाठी एक अत्यंत आकर्षक संधी उपलब्ध करून दिली आहे. आयआरसीटीसीने जपानची सफर घडवून आणण्यासाठी ९ रात्री आणि १० दिवसांचे विशेष आंतरराष्ट्रीय टूर पॅकेज लाँच केले आहे. या प्रवासादरम्यान पर्यटकांना जपानमधील आधुनिक तंत्रज्ञानाची शहरे, ऐतिहासिक मंदिरे आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळांना जवळून अनुभवता येणार आहे.

प्रवासाचे वेळापत्रक आणि प्रमुख शहरे :

हे खास टूर पॅकेज ६ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथून सुरू होईल आणि १५ सप्टेंबर रोजी समाप्त होईल. पर्यटकांना ऑल निप्पॉन एअरवेज (ANA) च्या विमानाने दिल्लीहून जपानच्या हानेडा विमानतळावर नेले जाईल. प्रवासादरम्यान पर्यटकांना टोकियो, हाकोने, हामामात्सु, क्योटो, ओसाका, नारा आणि हिरोशिमा या जपानमधील ७ प्रमुख आणि ऐतिहासिक शहरांना भेट देण्याची संधी मिळेल. ६ सप्टेंबरला संध्याकाळी ६ वाजता दिल्लीहून सुटणारे हे विमान दुसऱ्या दिवशी सकाळी ५:५५ वाजता जपानमध्ये उतरेल, तर १५ सप्टेंबरला जपानमधून उड्डाण करून दुपारी ४:३० वाजता विमान दिल्लीत परत येईल.

काय काय पाहायला मिळणार ?

१० दिवसांच्या या सहलीमध्ये टोकियोतील प्रसिद्ध आसाकुसा मंदिर, नाकामिसे मार्केट, उएनो पार्क आणि टीमलॅब प्लॅनेट्सचा समावेश आहे. याशिवाय पर्यटकांना जगप्रसिद्ध 'माऊंट फुजी'चे पाचवे स्टेशन (ओशिनो हक्काई), हाकोने रोपवे आणि हाकोने पायरेट शिप क्रूझचा आनंद घेता येईल. नागोयामधील टोयोटा संग्रहालय, क्योटोचे अराशियामा बांबू फॉरेस्ट, किंकाकु-जी मंदिर, ओसाका किल्ला, तसेच नारा डियर पार्क यांसारख्या प्रसिद्ध ठिकाणांची सफर एसी बसद्वारे घडवून आणली जाईल.

पॅकेजची किंमत आणि मिळणाऱ्या सुविधा

या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना ४-स्टार हॉटेल्समध्ये राहण्याची सोय, दररोजचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले जाईल. याशिवाय दिल्ली ते जपान इकॉनॉमी क्लासचे रिटर्न फ्लाइट तिकीट, जपानचा टूरिस्ट व्हिसा, सर्व स्थानिक प्रवास (AC बस), टूर गाईड आणि ७० वर्षांखालील प्रवाशांसाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स या सर्व सुविधांचा समावेश पॅकेजच्या मूळ किंमतीतच करण्यात आला आहे.

पॅकेजचे दर खालीलप्रमाणे आहेत :

  • ट्रिपल शेअरिंग (तीन व्यक्ती एकत्र): ₹३,४५,९९९ प्रति व्यक्ती
  • ट्विन शेअरिंग (दोन व्यक्ती एकत्र): ₹३,४९,९९९ प्रति व्यक्ती
  • सिंगल ऑक्युपन्सी (एकट्या व्यक्तीसाठी): ₹४,७३,९९९
  • लहान मुलांसाठी (५ ते ११ वर्षे, बेडसह): ₹२,९२,४९९
  • लहान मुलांसाठी (५ ते ११ वर्षे, विना बेड): ₹२,६३,९९९

बुकिंग आणि कागदपत्रांची अट :

या सहलीसाठी उत्सुक असलेल्या पर्यटकांकडे प्रवासाच्या अंतिम तारखेपासून (१५ सप्टेंबर) पुढे किमान ६ महिने वैधता (Validity) असणारा मूळ पासपोर्ट असणे आवश्यक आहे. बुकिंगच्या वेळी पॅन कार्डसह इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. तसेच जपान व्हिसा प्रक्रियेसाठी आर्थिक स्थिती आणि व्यवसायाशी संबंधित पुरावे आयआरसीटीसीकडे जमा करणे बंधनकारक असेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >