Tuesday, December 9, 2025

Delhi Blast : स्फोटाचा तपास आता 'ऑनलाईन'! दहशतवाद्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स रडारवर; दहशतवाद्यांना फुटणार घाम?

Delhi Blast : स्फोटाचा तपास आता 'ऑनलाईन'! दहशतवाद्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स रडारवर; दहशतवाद्यांना फुटणार घाम?

नवी दिल्ली : भारताची राजधानी दिल्ली सोमवारी संध्याकाळी स्फोटाने हादरल्यानंतर आता या भीषण घटनेमागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी तांत्रिक तपासावर लक्ष केंद्रित केले आहे. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचा छडा लावण्यासाठी आता मोबाईल फोनच्या 'डंप डेटा'चा (Dump Data) आधार घेतला जात आहे. तपास यंत्रणांनी लाल किल्ला परिसरातील अनेक भागांतून 'डंप डेटा' गोळा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. लाल किल्ल्याच्या पार्किंग परिसरात आणि त्याच्या आसपासच्या भागात कार्यरत असलेल्या सर्व मोबाईल फोनचा डंप डेटा गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. स्फोट झालेल्या वाहनातील प्रवाशांनी (दहशतवाद्यांनी) एकमेकांशी निश्चितपणे संवाद साधला असावा, असा तपास यंत्रणांचा कयास आहे. हा 'डंप डेटा' कार स्फोटाशी संबंधित फोन नंबरचे संकेत देऊ शकतो, असा तपास यंत्रणांचा विश्वास आहे. याच डंप डेटाद्वारे फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलमध्ये अटक झालेल्या आरोपींमध्ये काय संवाद झाला, याचाही शोध घेतला जात आहे. यामुळे किती लोक एकमेकांशी संवाद साधत होते आणि त्यांचा कट किती मोठा होता, हे उघड होण्यास मदत मिळेल. या तांत्रिक तपासावरून तपास यंत्रणा दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्या मोबाईल नंबरची साखळी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या तपास यंत्रणा सोशल मीडियावरही (Social Media) बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

'डंप डेटा' म्हणजे काय?

दिल्लीतील लाल किल्ला स्फोटासारख्या हाय-प्रोफाइल गुन्ह्यांच्या तपासात आता 'डंप डेटा' या तांत्रिक शब्दाची मोठी चर्चा सुरू आहे. नावाप्रमाणेच 'डंप' (Dump) म्हणजे कचरा किंवा नको असलेला, असा डेटा जो सहसा शोधला जात नाही किंवा आवश्यकही नसतो. पण गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी हाच डेटा तपास यंत्रणांसाठी 'ब्रह्मास्त्र' ठरत आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, 'डंप डेटा' हा एक प्रकारचा 'रॉ डेटा' (Raw Data) असतो, जो सिस्टीममध्ये केवळ बॅकअप म्हणून संग्रहित केला जातो. दररोज लाखो लोक मोबाईलवर बोलतात, मेसेज करतात, पण गरज असल्याशिवाय त्यांचा हा डेटा सक्रियपणे वापरला जात नाही. हा डेटा वरवर पाहता निरुपयोगी वाटत असला तरी, यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण रेकॉर्ड आणि माहिती समाविष्ट असते. तपास यंत्रणा या डेटामधून केवळ कॉल रेकॉर्ड (Call Records) नाही, तर इतर अनेक प्रकारची माहिती पुन्हा मिळवू शकतात. फोन किंवा लॅपटॉपमधून डिलीट झालेले व्हॉट्सॲप चॅट आणि साधे एसएमएस (SMS) मेसेजेस, गॅलरीतून डिलीट झालेले फोटो आणि व्हिडिओ, गूगल किंवा इंटरनेट ब्राउझरची संपूर्ण हिस्ट्री, इन्स्टाग्राम, फेसबूक सह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचा डेटा देखील 'डंप डेटा'च्या विश्लेषणामधून रिकव्हर करता येतो. या 'डंप डेटा'मुळेच तपास यंत्रणा दहशतवाद्यांनी स्फोटापूर्वी केलेले गुप्त संवाद आणि त्यांच्या हालचालींचे पुरावे एकत्र करून गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकतात.

डंप डेटा रिकव्हरीला किती वेळ लागतो?

डेटा रिकव्हरीसाठी लागणारा वेळ प्रामुख्याने मोबाईलच्या प्रकारावर अवलंबून असतो. जर एखाद्याकडे सामान्य अँड्रॉइड फोन असेल, तर त्यातून डंप डेटा रिकव्हर करण्यासाठी साधारणपणे २ ते ६ तास लागतात. आयफोनसारख्या आधुनिक मोबाईल फोनमधून हा डेटा रिकव्हर करण्यासाठी मात्र २४ ते ७२ तासांचा अवधी लागू शकतो, कारण यात सुरक्षा वैशिष्ट्ये अधिक प्रगत असतात. केवळ डेटा रिकव्हरी पुरेशी नसते, तर या गोळा केलेल्या डेटाचे फॉरेन्सिक विश्लेषण करणे आवश्यक असते. FSL (Forensic Science Laboratory) अहवाल तयार होण्यास १५ दिवसांपासून ते ६ महिने इतका मोठा कालावधी लागू शकतो. याचा अर्थ FSL द्वारे डेटाचे संपूर्ण विश्लेषण आणि अहवाल तयार होण्यास मोठा वेळ जाऊ शकतो. तपास यंत्रणांना या प्रक्रियेत काही मर्यादांचा सामना करावा लागतो. जर एखाद्याचा फोन फॅक्टरी रीसेट (Factory Reset) झाला असेल आणि त्यावरील डेटा ओव्हरराईट झाला असेल, तर तो डेटा रिकव्हर होणे अशक्य असते. खूप जुना किंवा खराब झालेला फोन असेल, तसेच जर फोनची चीप डॅमेज झाली असेल, तर त्यातूनही डेटा परत मिळवता येत नाही. या वेळेच्या आणि तांत्रिक मर्यादांमुळे, तपास यंत्रणांनी दिल्ली स्फोटाच्या आरोपींना पकडण्यासाठी जलद गती आणि अचूकता राखणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment