सरसंघचालक मोहन भागवत यांचा काँग्रेसला सवाल
मुंबई : "आरएसएसची स्थापना १९२५ मध्ये झाली; मग आम्ही ब्रिटिश सरकारकडे संघटनेची नोंदणी करावी, अशी अपेक्षा करता का?" असा सवाल करत "आम्हाला व्यक्तींची संघटना म्हणून वर्गीकृत केले आहे आणि आम्ही एक मान्यताप्राप्त संघटना आहोत," असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी स्पष्ट केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) १०० व्या वर्धापन दिनानिमित्त बंगळूरु याठिकाणी आयोजित दोन दिवसांच्या व्याख्यानमालेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भाषण केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अलीकडेच आरएसएसवर बंदी घालायला हवी असे म्हटले होते. तसेच यानंतर खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी सरकारी संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी आरएसएसच्या उपक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांनी आरएसएसचा नोंदणी क्रमांक आणि त्यांच्या निधीच्या स्रोतावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर आता सरसंघचालकांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी भागवत म्हणाले की, आयकर विभाग आणि न्यायालयांनी आरएसएसला व्यक्तींची संघटना म्हणून संबोधले आहे. संघटनेला आयकरातून सूट देण्यात आली आहे. "आमच्यावर तीनदा बंदी घालण्यात आली. म्हणून सरकारने आम्हाला मान्यता दिली आहे. जर आम्ही तिथे नसतो तर त्यांनी कोणावर बंदी घातली?" असा सवालही सरसंघचालकांनी केला.