महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन
October 27, 2025 04:05 PM
मुंबई : दशकभरात केंद्र सरकारने मेरिटाईम अर्थात सागरी अर्थव्यवस्थेत केलेल्या धोरणात्मक सुधारणांमुळे आज भारत जगात मेरिटाईम क्षेत्रातला सशक्त देश म्हणून उभा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. अमित शाह यांच्या हस्ते आज म्हणजेच सोमवार २७ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक या परिषदेचं उद्घाटन झालं, तेव्हा ते बोलत होते. गेट वे ऑफ इंडिया सारख्या ऐतिहासिक वास्तू लाभलेल्या ठिकाणी होणाऱ्या मेरिटाईम वीक या परिषदेत गेट वे ऑफ वर्ल्ड दृष्टिकोनाविषयी विचारमंथन होणार असल्याचं ते म्हणाले.
इंडिया मेरिटाईम वीक हा जगातल्या सर्वात प्रमुख सागरी मेळाव्यापैकी एक झाला असून त्यात ८५ देशांनी सहभाग घेतल्याचं केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यावेळी म्हणाले. या परिषदेची यंदाची संकल्पना एकत्रित महासागर, एक सागरी दृष्टीकोन अशी असल्याचंही ते म्हणाले. तर महाराष्ट्रातलं वाढवण हे बंदर जगातल्या सर्वोत्तम दहा बंदरांपैकी एक असेल, त्यामुळे भारताची सागरी शक्ती आणखी मजबूत होईल, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबईत माझगाव गोदीत खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठीच्या दोन नौकांचं लोकार्पणही अमित शाह यांच्या हस्ते झालं. या नौकांची चावी आणि नोंदणी प्रमाणपत्रही यावेळी लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह अमित शाह यांनी खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठीच्या दोन नौकांची पाहणी केली. या नौकांमुळे मच्छीमारांना खोल समुद्रात जाऊन टूनासारखे मासे पकडणं शक्य होणार आहे. या सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते.