मुंबई: आज म्हणजेच सोमवार २ फेब्रुवारी रोजी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात एकत्र येणार आहेत. तेथून सर्व नगरसेवक गटनोंदणीसाठी कोकण भवनाकडे रवाना होतील. यावेळी भाजप - शिवसेनेची स्वतंत्र गटनोंदणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई महापालिकेच्या महापौरपदाबाबतची उत्सुकात शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेना गटाकडून युवा सेनेचे माजी नेते आणि महापालिकेच्या राजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या अमेय घोले यांची मुंबई महानगरपालिकेतील गटनेते पदासाठी निवड करण्यात आली आहे. अमेय घोले यांच्या निवडीमुळे पालिकेत प्रशासनावर पकड मिळवणे शिवसेना शिंदे गटाला सोपे जाईल, असे मानले जात आहे.
८९ नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी :
सोमवार २ फेब्रुवारी रोजी कोकण भवनात भाजपच्या एकूण ८९ नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी होणार आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची एकत्र गटनोंदणी केली जाणार आहे. त्यामुळे महायुतीच्या नगरसेवकांची एकूण संख्या १२१ वर पोहोचली आहे.






