Wednesday, May 27, 2026

पाणीपट्टी वाढीवर शिक्कामोर्तब

पाणीपट्टी वाढीवर शिक्कामोर्तब

मुंबई  : मुंबई महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून रखडलेला पाणीपट्टी वाढीचा निर्णय आता प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच पाणीपट्टीत वाढ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा लेखा विभागाने तयार केला असून तो लवकरच महापालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमुळे तसेच महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून गेल्या दोन वर्षांपासून पाणीपट्टी वाढीचा निर्णय वारंवार पुढे ढकलण्यात आला होता. दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकांनंतर पाणीपट्टी वाढ होणार असल्याचे संकेत होते; मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय स्थगित ठेवण्यात आला. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यासने आणि पुढील चार वर्षांत कोणतीही मोठी निवडणूक नसल्यामुळे पाणीपट्टी वाढीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

जल अभियंता खात्याचा आस्थापना खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते, प्रशासकीय खर्च, प्रचालन व परिरक्षण खर्च, विद्युत खर्च तसेच भातसा व अप्पर वैतरणा धरणांतून उपसा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या पाणीपट्टीचा सविस्तर आढावा घेऊन ही वाढ सुचवण्यात आली आहे. प्रस्तावित वाढ सरासरी ६ ते ७ टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे घरगुती पाणीपट्टीत प्रति हजार लिटरमागे सरासरी एक रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे, तर व्यावसायिक वापरासाठी तीन ते चार रुपयांपर्यंत वाढ अपेक्षित आहे. याशिवाय एकूण पाणीबिलाच्या ७० टक्के मलनि:सारण आकार वसूल केला जाणार आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पानंतर या प्रस्तावाला मंजुरी देऊन पुढील आर्थिक वर्षापासून पाणीपट्टी वाढीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >