नवी दिल्ली : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी तब्बल ७९ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या अंतर्गत नाग क्षेपणास्त्र,अॅडव्हान्स्ड टॉर्पेडो आणि सुपर रॅपिड गन यांसारखी अत्याधुनिक आणि घातक शस्त्रे खरेदी केली जाणार असून, यामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.
संरक्षण अधिग्रहण परिषदेने मंजूर केलेल्या या प्रकल्पांमुळे जमिनीवर, समुद्रात आणि आकाशात भारतीय दलांची मारक क्षमता अनेक पटींनी वाढणार आहे. नाग मिसाईल सिस्टीम ही प्रणाली ट्रॅकवर चालणाऱ्या वाहनांवर तैनात केली जाईल. शत्रूचे रणगाडे, बंकर्स आणि मजबूत तटबंदी उद्ध्वस्त करण्यात ही क्षेपणास्त्र प्रणाली अत्यंत प्रभावी आहे. ग्राऊंड बेस्ड मोबाईल सिस्टीम ही एक मोबाईल इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स प्रणाली आहे, जी २४ तास शत्रूच्या हालचालींवर आणि इलेक्ट्रॉनिक सिग्नलवर नजर ठेवेल. यामुळे सीमेवरील सुरक्षा अधिक मजबूत होईल. मटेरियल हँडलिंग क्रेनसह हाय मोबिलिटी व्हेईकल ही विशेष वाहने दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये लष्कराला रसद (लॉजिस्टिक) आणि इतर साहित्य पोहोचवण्यासाठी मदत करतील, ज्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लष्कराची कार्यक्षमता टिकून राहील.
या सर्व प्रकल्पांमुळे तिन्ही सैन्य दलांच्या ताकदीत मोठी वाढ होणार आहे. लष्कराला शत्रूशी लढण्यासाठी अधिक प्रभावी शस्त्रे मिळतील, नौदल समुद्रात आपली पकड मजबूत करेल आणि हवाई दल आकाशातून शत्रूवर अधिक अचूक हल्ले करू शकेल. याशिवाय, २४ तास पाळत ठेवणार्या प्रणालींमुळे देशाची सुरक्षा अधिक मजबूत होईल. सरकार आणि सैन्य दले मिळून या प्रकल्पांवर वेगाने काम करतील.