Tuesday, August 26, 2025

'दिवेआगरच्या सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकर सुरू करा'

'दिवेआगरच्या सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकर सुरू करा'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची कार्यवाही कृषी विभागाने करावी, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषी मंत्री भरणे बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वर्षा लड्डा-उंटवाल, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, सहसंशोधक कल्पेश शिंदे, कृषी विभागाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यासह इतर अधिकारी या उपस्थित होते.

मंत्री भरणे म्हणाले, रायगड जिलह्यातील दिवेआगर (ता.श्रीवर्धन) येथे होणाऱ्या प्रस्तावित सुपारी संशोधन केंद्रामुळे स्थानिक शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची सुपारीची रोपे मिळून या भागाला त्याचा चांगला फायदा होईल. या सुपारी संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुपारीच्या बुटक्या तसेच दर्जेदार व अधिकचे उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणे, दिवेआगर व परिसरातील हवामानाचा विचार करून आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन, रोजगार निर्मिती, रोपवाटिका उभारणे, कलमे विकसित करणे, परिसरातील गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे नियोजन करावे. सुपारी संशोधन केंद्रासाठी निधी मंजूर असून प्रस्तावित बांधकाम आणि इतर अनुषंगिक बाबीं पूर्ण होण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठाने निविदा प्रक्रिया गतीने पूर्ण करून कामे सुरू करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

दिवेआगर संशोधन केंद्र पर्यटनाला चालना देणारे ठरेल मंत्री आदिती तटकरे

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, दिवेआगार हे पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून येथे निर्माण होणारी रोठासुपारी अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा वाण आहे. हे वाण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे नवीन सुपारी संशोधन केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल, तसेच पर्यटक देखील सुपारी संशोधन केंद्राला भेट देतील अशा दृष्टीने प्रस्तावित सुपारी संशोधन केंद्र तयार करावे, असे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले.

Comments
Add Comment