- डॉ. शुभांगी पारकर, प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ
रोहित आर्य यांच्या कृतीतून दिसणारी हिंसक निराशा आणि फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण अलीकडच्या काळात विशेष चर्चेत राहिले. या घटना मानसिक आरोग्य, वैद्यकीय क्षेत्रातील दबाव आणि प्रशासनातील संवेदनहीनता यावर थेट बोट ठेवतात. न्याय मिळण्याची आशा संपते, तेव्हा नैराश्य येते. पण या नैराश्येच्या मुळाशी आणखी काय दडले आहे, याचे हे सखोल विश्लेषण.
आज महाराष्ट्रात आणि देशात जे काही घडत आहे, ते पाहून मन केवळ दुःखी होत नाही, तर एका गंभीर सामाजिक आणि मानसिक संकटाची जाणीव होते. नुकतेच घडलेले रोहित आर्य याचे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना ओलीस ठेवण्याचे प्रकरण असो वा याच वर्षी घडलेली हर्षल पाटील या कॉन्ट्रॅक्टरची आत्महत्या. ही केवळ दोन नावे नाहीत, तर सरकारी यंत्रणेच्या अपयशाचे आणि मानवी वेदनेचे बळी आहेत. या दोन्ही व्यक्तींनी टोकाचे पाऊल उचलले, कारण त्यांना हव्या असलेल्या मदतीला शासकीय पातळीवर प्रतिसाद मिळाला नाही. सरकारी यंत्रणेकडून होणारा विलंब आणि उदासीनता या एकाच समस्येने त्यांना ग्रासले होते. आर्थिक विवंचनेने त्यांना टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले. एखाद्या व्यक्तीवर पैशांचे असह्य ओझे येते, तेव्हा तिची विचारशक्ती भावनिकदृष्ट्या एका भोवऱ्यात अडकते. कर्जाचा डोंगर, बेरोजगारी आणि सामाजिक भीती यामुळे तणावाची पातळी इतकी वाढते की व्यक्तीचे मन निष्क्रिय आणि आशाहीन होते. आर्थिक विवंचना आणि त्यातून येणारी निराशा हे मनोविकारांना खतपाणी घालतात. जगातील अनेक संशोधनांनी हे सिद्ध केले आहे की, आर्थिक विवंचना हे नैराश्याच्या सर्वात महत्त्वाच्या कारणांपैकी आहे. तणाव अति होतो, तेव्हा व्यक्तीच्या मेंदूतील विचारांचा ताबा सुटतो. तर्कशुद्धता लोप पावते आणि ती अतर्क्य विचार करू लागते. व्यक्तीच्या मेंदूतील विचारांवर तणावाचा थेट परिणाम होतो. त्यामुळे माणूस विचारांचा ताबा गमावून बसतो.
अनेकदा टोकाचा संघर्ष अनुभवणाऱ्या व्यक्ती आत्महत्येचे पाऊल उचलतात पण, रोहित आर्यने हिंसेचा मार्ग निवडला. याकडे केवळ नैराश्यातून आलेली कृती म्हणून पाहता येणार नाही. हा प्रकार वैफल्य आणि आक्रमकतेचा भाग आहे. एखादी व्यक्ती वैफल्यग्रस्त होते, तेव्हा आपला संताप जगावर व्यक्त करण्यासाठी काही वेळा ती प्रयत्न करते. याला आपण प्रतिक्रियात्मक आक्रमकता म्हणू शकतो. नियंत्रण गमावलेल्या अवस्थेत ती व्यक्ती इतरांना नुकसान पोहोचवून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करू शकते. ही टोकाची आणि हिंसक भूमिका घेण्यास व्यक्तिमत्त्वाचा इम्पल्सिव्ह भागही कारणीभूत ठरतो. याच स्वरूपाचे दुसरे एक प्रकरण म्हणजे फलटणमधील महिला डॉक्टरची आत्महत्या. डॉक्टर आत्महत्या प्रकरणात वारंवार मदतीची याचना करूनही कायदेशीर रक्षण मिळत नव्हते. अशा वेळी पीडित व्यक्तीच्या मनात अत्यंत निराशेची भावना निर्माण झाली. कारण आतून हेलावलेल्या व्यक्ती असुरक्षित वाटत असताना कुठूनही आधार न मिळाल्यास निराशेच्या गर्तेत जातात. बऱ्याच वेळा ही मदतीची असहाय्य हाक असू शकते. एखाद्या व्यक्तीला असहाय्यता, निराशा आणि निरर्थकता या तिन्ही भावनांनी घेरले जाते, तेव्हा आत्महत्येचे विचार पक्के होतात. पीडितेला वाटते की आता काहीही बदलणार नाही, आपण यातून कधीही बाहेर पडणार नाही आणि मग आत्महत्येचे पाऊल उचलले जाते.
फलटणच्या आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाकडून पत्रकार परिषदेत मृत महिलेच्या वैयक्तिक आयुष्याचे तपशील सार्वजनिक करण्यात आले. कोणत्याही व्यक्तीला आपल्या वैयक्तिक गोपनीयतेचा अधिकार असतो. पीडित महिलेच्या बाबतीत तो पाळला गेलाच पाहिजे. आपल्याकडे ‘पॉश’सारख्या कायद्याचे संरक्षण असताना पीडितेला संरक्षण का मिळाले नाही याचे आश्चर्य वाटते. पॉश कायदा अस्तित्वात असताना महिलांना इतर कोणत्याही कायद्याची गरज पडूच नये, इतके या कायद्याचे उत्तम संरक्षण आहे. बरेचदा ‘मला मरावंसं वाटतं’ अशी एखादी व्यक्ती बोलते तेव्हा बरेचदा फार गांभीर्याने घेतले जात नाही. ती व्यक्ती नाटक किंवा ढोंग करत आहे हाच साधारण सामान्य दृष्टिकोन असतो. पण मानसोपचार क्षेत्रात आत्महत्येविषयी वाटणारे कोणतेही संकेत हे प्रचंड गांभीर्याने घेतले जाते. कारण आत्महत्या करण्यामागे जितका मनोविकार कारणीभूत असतो, तितकीच मेंदूमधील रसायनांची त्या वेळेची स्थितीही कारणीभूत असते. मानसिक आरोग्य हे मन आणि विचारांपुरतेच मर्यादित नसून तुमच्या शरीरात, मुख्यत्वे तुमच्या मेंदूत होणारे रासायनिक बदलही याला कारणीभूत असतात. आत्महत्या करण्यापूर्वी अशा व्यक्ती काही संकेत देत असतात. ते ओळखणे आणि त्यावर वेळीच उपचार करणे हे महत्वाचे आहे.
हे संकेत म्हणजे मृत्यूची इच्छा व्यक्त करणे, अपराधीपणा वाटणे किंवा इतरांवर ओझे असण्याची भावना असणे. निराश, हताश वाटणे, अधिक चिंताग्रस्त, अस्वस्थ किंवा रागाने ग्रस्त असणे. असह्य मानसिक किंवा शारीरिक वेदना व्यक्त करणे. वागण्यात बदल जाणवणे, जसे की मृत्यूची योजना आखणे किंवा शोध घेणे, एकाकी वाटणे. मित्रांपासून दूर जाणे, निरोपाची भाषा करणे, महत्त्वाच्या आवडत्या वस्तू देऊन टाकणे. अत्यंत वेगाने गाडी चालवण्यासारखे धोके पत्करणे, अत्यंत मूड स्विंग्ज दाखवणे, कमी किंवा अधिक झोपणे, ड्रग्ज किंवा अल्कोहोल सेवनाचे प्रमाण वाढणे, आत्मसन्मान कमी होणे वगैरे. अशा वेळी संबंधित व्यक्तीला काही मानसिक प्राथमिक उपचार द्यावे लागतात. संकटाच्या क्षणी आधार द्यावा लागतो. वर नमूद केलेली लक्षणे आढळल्यास ज्या पद्धतीने आपण शारीरिक इजेच्या वेळी प्रथोमोपचार देतो तसेच मानसिक प्राथमिक उपचार देण्याचे हे कौशल्य प्रत्येकाने शिकले पाहिजे. एखादी व्यक्ती आत्महत्येचा विचार करत असल्याचे लक्षात आल्यास त्वरित मदत करणे आवश्यक आहे. हा उपचार म्हणजे त्या व्यक्तीला संकटाच्या क्षणी भावनिक आधार देणे. त्यासाठी तिचे म्हणणे शांतपणे ऐकावे लागते. कोणताही तर्क न देता, त्या व्यक्तीला काय वाटते आहे ते शांतपणे समजून घ्यायची गरज असते. तिच्या भावनांना मान्यता द्यावी लागते. अशा प्रसंगी तिला एकटे सोडता येत नाही. तिला आशा दाखवत सध्याचा तणाव काही काळासाठीच आहे आणि परिस्थिती बदलू शकते, हे उलगडून द्यावे लागते. असा त्रास दिसताच संबंधित व्यक्तीला त्वरित मानसोपचारतज्ज्ञ किंवा मानसिक आरोग्य हेल्पलाईनकडे घेऊन जावे लागते. आत्महत्या हा नैराश्यातून आलेला टोकाचा निर्णय नव्हे, तर एक मदतीची हाक आहे, हे या वळणावर समजून घ्यायला हवे. हा संकटाचा क्षण असतो. तेव्हा योग्य आधार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. रुग्णांच्या मनामध्ये सतत आत्महत्येचे विचार येत असतील तर त्यातून बाहेर पडण्यासाठी आवडीची गोष्ट करायला सांगणे, हा एक उपाय ठरतो. उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाला मोहमद रफीचे ‘मन रे तू काहे ना धीर धरे’ गाणे आवडत होते. मी त्याला आत्महत्येचे विचार आल्यास ते गाणे गुणगुणायला सांगितले. ती व्यक्ती आत्महत्येच्या विचारातून सुखरूप बाहेर पडली. आपल्या भावनांचे नियमन करणे हा प्रत्येक व्यक्तीचा गुण असू शकत नाही. अशावेळी ‘माईंडफुलनेस’ अर्थात सकारात्मक विचारांची जोड नैराश्यासारख्या मनोविकारांपासून लांब नेऊ शकते. म्हणूनच मनोविकारांना कलंक न मानता त्याबद्दल जागरूक होऊन वेळीच तज्ज्ञांची मदत घेणे महत्त्वाचे ठरते. सध्या आर्थिक मंदी, बेरोजगारी, अशा समस्यांमुळे मनोविकारांचे प्रमाण वाढते. या काळात सर्वांनी मिळून अधिक संवेदनशील, आधार देणारा आणि मानसिकदृष्ट्या कणखर समाज निर्माण करण्याची गरज आहे.






