Saturday, December 13, 2025

‘वंदे मातरम्’चा विवाद

‘वंदे मातरम्’चा विवाद

वंदे मातरम् हे आपले राष्ट्रगीत होणार होते. स्वातंत्र्यपूर्वीपासून तसेच ठरले होते. पण पंडित नेहरू यांनी जे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान राहिले त्यांनी मुस्लिमांना खूश करण्यासाठी आणि मुस्लीम व्होट बँक जपण्यासाठी वंदे मातरम् हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आणि मग जनगनमन हे आपले राष्ट्रगीत झाले. पण तो वाद तेव्हाही तसाच होता, तो अद्यापही सुटला नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभर भाजपच्या वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले आहे. अर्थात यास ममता बॅनर्जी यांनी विरोध केला आहे आणि त्यामागे कारण हे निव्वळ राजकीय आहे. वास्तविक वंदे मातरम् हे भारतमातेचे गायन आहे आणि त्याबद्दल कुणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही. पण मुस्लिमांनी या गीताला १९३७ मध्येही आक्षेप घेतला होता आणि आजही मुस्लिमांना या गीताबद्दल आक्षेप असल्यामुळे देशभर नाही तर किमान बंगालमध्ये वंदे मातरमवरून वाद निर्माण झाला आहे. ममता बॅनर्जी यांनी आणि त्यांच्या संपूर्ण पक्षाने या वादावर मौन पाळले आहे. ममता यांच्या या मौनाचा अर्थ उघड आहे. कारण ममता यांची सारी मदार मुस्लीम आणि रोहिंग्य मतदारांवर आहे.

वंदे मातरम् हे गीत लिहिले होते बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आणि त्यामुळे भाजपने या प्रकरणी बंगाली अस्मितेचा मुद्दा जोडून आगामी विधानसभा निवडणुका लढवण्याची खेळी खेळली आहे. ही खेळी ममता यांना अडचणीत आणू शकते. म्हणूनच त्यांनी या मुद्द्यावर सोयीस्कर मौन पाळले आहे. हे गीत बंगाली अस्मितेशी जोडले गेले आहे आणि ते बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले असले तरीही ते गायले आहे रवींद्रनाथ टागोर यांनी. १९०५ मध्ये बंगालची फाळणी झाली तेव्हा वंदे मातरम् हेच गीत राष्ट्रवाद्यांचा आवाज बनला होता. पण ममता यांनी गीताच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या वादावर मौन पाळले आहे. त्याचे कारण आहे की या गीताचा मूळ स्वरूपातील स्वीकार किंवा विरोध करणे तृणमूल काँग्रेसला शक्य नाही. बंगालमध्ये आज ३७ टक्के मुस्लीम आहेत. भारतमातेचे दैवतीकरण करण्यास आणि हे गीत मुस्लीम विरोधी आहे असे भासवण्याचा प्रयत्न अल्पसंख्याकांनी सातत्याने केला आहे. या विरोधाचे मूळ इस्लाम धर्मात आहे कारण मुसलमान अल्लाशिवाय कुणाचीही पूजा करत नाही. तसे करण्यास त्याला मनाई आहे. या विरोधातून अल्पसंख्याकांचा वंदे मातरम् गीताला विरोध झाला आहे. आणि काँग्रेस इतकी वर्षे अल्पसंख्याकांच्या मतांवरच निवडून येत होती त्यामुळे अल्पसंख्याकांच्या विरोधाला डावलून काँग्रेसला काहीच करता येणे शक्य नव्हते. अर्थात अल्पसंख्याकांच्या विरोधाचा मुद्दा बाजूला ठेवला तरीही वास्तविक पहाता वंदे मातरम् गीताला आदर देण्यात काहीच आक्षेपार्ह नाही. कारण यात भारत मातेची प्रार्थना आहे. पहिल्या प्रथम हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीत अवतीर्ण झाले आणि त्यानंतर प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाचा तो श्वास बनला. याच वादामुळे काँग्रेसचे देशात अधिवेशन भरले तेव्हा १९३७ मध्ये वंदे मातरमचे पहिली दोन कडवी फक्त स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. अनेक मुस्लिमांचा या गीताला आक्षेप आहे पण अब्दुल रहेमान अंतुले यांच्यासारखे काही मुस्लीम असेही नेते होते की ज्यांनी मातृभूमीसाठी हे देशभक्तीपर गीत आहे, असे मानत होते. ममता यांची अडचण वेगळीच आहे. मुस्लीम लीगने सर्वप्रथम या गीताला विरोध केला होता. ममता यांनीच वास्तविक वंदे मातरम् शाळा आणि सार्वजनिक स्थळांवर गायन करणे अनिवार्य करण्याची मागणी केली होती पण आज त्यांनी या वादावर सोयीस्कर मौन पाळले आहे. कारण एक तर हे गीत बंगाली अस्मितेशी जोडले गेले आहे. दुसरे म्हणजे ममता यांचा भर मुख्यतः मुस्लीम आणि रोहिंग्य मतदारांवर आहे. त्यामुळे त्या दोघांनाही दुखवता येत नाही. हे गीत आज भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वादविवादाचे कारण बनले आहे. पंडित नेहरू यांनी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, की या गीतामुळे अल्पसंख्याकांच्या नाराजीचे कारण होऊ शकते. राष्ट्राला प्रेरणा देणाऱ्या गीतावरून वाद निर्माण व्हावा यासारखे दुर्दैव नाही. कारण काँग्रेसने गेली कित्येक वर्षे हिंदू धर्माचे प्रेरणास्त्रोत आणि हिंदू धर्माला नेहमीच दुय्यम लेखले आहे. अल्पसंख्याकांच्या एकगठ्ठा मतांवर सत्ता हस्तगत केली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तास्थानी येताच हिंदू जागा झाला आणि काँग्रेसने येथील इतिहास कसा दडपून टाकला याचा पर्दाफाश करण्यास सुरुवात केली, म्हणून काँग्रेस असो की तृणमूल काँग्रेस असो की अल्पसंख्याक असोत, याच्या देशद्रोही कारवाया जनतेसमोर आल्या आहेत आणि त्याचमुळे ही मंडळी बॅकफुटवर गेली आहेत.

काँग्रेस आणि वंदे मातरमचा हा वाद जुनाच आहे. पंडित नेहरूंनी जाणीवपूर्वक वंदे मातरमची दोन कडवी वगळली होती. कारण त्यात माँ दुर्गादेवीची स्तुती केली आहे. नेहरूंच्या निधर्मी राजकारणाला हे साजेसे नव्हते त्यामुळे ही कडवी वगळण्याचा त्यांच्या कार्यकाळात सरकारने हा निर्णय घेतला. हा आरोप भाजपने केला म्हणून तो राजकीय आहे असे नाही, तर त्यात वास्तव आहे. वंदे मातरम गीत कोणत्याही एका धर्माचे नाही. या गीतावरून आताच वाद होण्याचे कारण म्हणजे बंगालमध्ये होऊ घातलेल्या २०२६ मधील निवडणुका. त्यात ममता यांचा पक्षाची थेट लढत भाजपशी होत आहे आणि त्यामुळेच ममता यांनी विरोधी नेत्यांना कठोर शब्द बाण वापरत टीका करण्याचे धोरण अवलंबिले आहे. ममता यांनी आपण हिंदू असल्याचे विधानसभेत जाहीर केले होते. पण त्यांनी वेळोवेळी अल्पसंख्याक आणि रोहिंग्यांच्या हिताची भूमिका घेतली. त्यामुळे यावेळी त्यांना काय भूमिका घ्यावी हा पेच पडला असावा. ममता यांची दुटप्पी भूमिका तेव्हाच उघड झाली होती जेव्हा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वंदे मातरम गीत गाऊ नका असे सांगितले. वंदे मातरम राष्ट्राला स्फूर्ती देणाऱ्या गीताला आज १५० वर्षे साजरी होत असताना केवळ अल्पसंख्यांकांना खुश करण्यासाठी विरोध केला जात आहे हे देशाची प्रतिमा उंचावणारी बाब नाही. वंदे मातरम हे राष्ट्राचे प्रेरक गीत आहे आणि त्याचे स्थान तसेच राहिले पाहिजे.

Comments
Add Comment