मुंबई : वकील पल्लवी पूरकायस्थ (२५) हिच्या २०१२ मध्ये झालेल्या हत्या प्रकरणातील दोषसिद्ध आरोपी सज्जाद मुघल याला सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी कायम ठेवली. सज्जादला जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी या मागणीसाठी राज्य सरकार आणि पूरकायस्थ हिच्या वडिलांनी केलेले अपील फेटाळत, न्यायालयाने सज्जाद याची जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.
सत्र न्यायालयाने जुलै २०१४ मध्ये पुरकायस्थ राहत असलेल्या इमारतीतील सुरक्षा रक्षक सज्जादला खून, विनयभंग आणि घरात घुसल्याच्या आरोपप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हे प्रकरण ‘‘दुर्मिळातील दुर्मीळ’’ श्रेणीत मोडत नसल्याचे नमूद करून सज्जादला फाशीची शिक्षा सुनावण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने त्यावेळी फेटाळली. राज्य सरकारने २०१५ मध्ये सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील दाखल करून सज्जादला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. त्यानंतर, पूरकायस्थ हिचे वडील अतनू यांनीही सज्जादला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी फेरविचार याचिका केली होती, तर सज्जाद यानेही शिक्षेच्या निर्णयाला आव्हान दिले होते. हायकोर्टाने सोमवारी या प्रकरणी निर्णय देताना सज्जादसह राज्य सरकारचे अपील आणि पूरकायस्थ हिच्या वडिलांची याचिकाही फेटाळून लावली.






