Saturday, June 21, 2025

ऑनलाइन परमानंद!

ऑनलाइन परमानंद!

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ


जे जे आपणासी ठावे |
ते ते इतरांसी शिकवावे |
शहाणे करून सोडावे
सकल जन ||


श्री समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितल्याचे आजकाल बऱ्याच लोकांनी मनावर घेतल्याचे मला सोशल मीडियावरून लक्षात आले. या सोशल मीडियावर अशा काही जाहिराती येऊ लागल्या आहेत की, मला आपण किती अज्ञानी आहोत याची अधिकाधिक जाणीव होऊ लागली आहे. पावसाळ्यात अचानक असंख्य भूछत्र्या भूतलावर अवतराव्या तशा या जाहिराती जिथे तिथे दिसू लागल्या आहेत. या जाहिरातींचे मुख्यत्वे ढोबळमानाने मी तीन भाग केले आहेत.


त्यातील पहिला भाग म्हणजे माणसांनी आपला आत्मविश्वास वाढवायचा, आपल्यातील सकारात्मकता वाढवायची जेणेकरून आपण जे ठरवू ते आपल्याला प्राप्त होईल!
दुसऱ्या प्रकारची जाहिरात म्हणजे आपले शारीरिक/ मानसिक स्वास्थ्य. औषध गोळ्यांविना स्वास्थ्यपूर्ण जगणे, शरीर सुदृढतेसाठी योग, मुद्रा, प्राणायाम, ध्यान वा तस्यम शारीरिक हालचाली जेणेकरून शरीर आणि मन स्वस्थ होईल!


तिसऱ्या प्रकारच्या जाहिरातीमध्ये आपल्यातील कलागुणांचा विकास आणि त्याबरोबर त्यातून आपले आर्थिक स्वास्थ्य कसे वाढेल याविषयीचे ज्ञान. यात कथ्थक, भरतनाट्यम, वादन, गायन, चित्रकला आणि शिल्पकलेचे अनेक प्रकार शिकवले जातात. यातील काही जाहिरातींची मी नोंद केली आहे.-
Without showing Face earn Lacks of Rupees on YouTube ( चेहरा न दाखवता युट्यूबने लाखो रुपये कमवा), ‘I am blissful’ (मी परमानंदी आहे.) Unlock the Power within (अंतर्गत शक्तीला उघडा), Your energy shapes your life (तुमची ऊर्जा तुमचे जीवन घडवते.), Extraordinary career opportunity (करिअरची असामान्य संधी), AI coaching workshop (आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्गदर्शन कार्यशाळा), Anyone can dance (कोणीही नाचू शकतो), Scientific manifestation masterclass (वैज्ञानिक प्रकटीकरण कार्यशाळा), Manifest your dream life (तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणा), EFT tapping (शरीरावर विशिष्ट ठिकाणी बोटांनी हलके थोपटून करून भावनिक आणि मानसिक समस्यांवर मात) Get everything with Hypnotherapy (संमोहनशास्त्र शिकून सर्व काही मिळवा).


अशा धडाधड जाहिराती सोशल मीडियावर पाहून मी काही कार्यशाळांना ऑनलाईन असल्यामुळे हजेरी लावली. यातल्या बहुतेक फुकट होत्या. मात्र या कार्यशाळेच्या शेवटी अधिकचे आणि निश्चित फायद्याचे ज्ञान हवे असल्यास भरपूर फी असलेली कार्यशाळा घेणाऱ्यांनी सुचवले. मोठ्या मोठ्या रकमेची फी, तुम्ही आज हजेरी लावल्याबद्दल ६० टक्के ते ८० टक्के त्यांनी सहज माफ केले. मात्र अट होती की, दहा मिनिटांच्या आत पैसे भरण्याची. भारावलेल्या किंवा संमोहित झालेल्या माणसांनी पटापट पैसे भरले. त्यानंतर पुढे काय झाले मला माहीत नाही कारण मी कोणत्याही कार्यशाळेसाठी कोणतीही रक्कम भरलेली नाही.


मला या कार्यशाळा घेणाऱ्यांचे खूप कौतुक वाटते की, अशा तऱ्हेने जगभरातील कानाकोपऱ्यांतील माणसे, त्यांच्या केवळ बोलण्याच्या हुशारीने शिकार होतात आणि आपले हजारो रुपयेही गुंतवतात. इथे मला कोणताही दावा करायचा नाही की त्यामुळे त्यांचा फायदा होतो किंवा तोटा. कारण त्यासंबंधीचा कोणताही डेटा माझ्याकडे नाही; परंतु कमाईचा हा नवीन उत्तम असा मार्ग आहे फक्त तुम्हाला छान बोलता आले पाहिजे! ग्राहक आकर्षित करण्यासाठी त्यांच्या कार्यशाळेतून, आयुष्यात खूप काही मिळवलेली माणसे आत्मकथन करतात. ज्यामुळे इतरांचा पूर्ण विश्वास बसतो.


असो. तर एकंदरीत काय अशा या कार्यशाळांमुळे तुमचे शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक आरोग्य सुधारते. तुमच्या पगारात वाढ होते, तुमची लग्न ठरतात, तुम्हाला हवा तो जोडीदार मिळतो, संसार सुखाचा होतो आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतात. नाचणे, गाणे, वाद्य वाजवणे, चित्रकला, शिल्पकला इत्यादी तुम्हाला सहज जमू लागते. शेअरमध्ये गुंतवलेले पैसे वाढतात. तुम्ही यूट्यूब चॅनल लाखोमध्ये कमवू लागता! अशा तऱ्हेने आपल्या ज्ञानात भर पडल्यावर ते ज्ञान ऑनलाइन येऊन हजारोपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडते! मग आणखी एक जाहिरात सोशल मीडियावर झळकू लागते ज्यात आत्मविश्वासपर हसरा तुमचा असतो!

Comments
Add Comment