Friday, August 28, 2026

Shilpa Gavare death case : शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणाचा मुळापर्यंत तपास करा; डॉ. नीलम गोऱ्हेंची मागणी

Shilpa Gavare death case : शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणाचा मुळापर्यंत तपास करा; डॉ. नीलम गोऱ्हेंची मागणी

पिंपरी-चिंचवड :  वाकडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. कौटुंबिक छळाची माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले.

डॉ. गोऱ्हे यांनी वाकड पोलीस ठाण्याला भेट देत प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेतला. शिल्पा गवारे यांचा माहेरच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपांची पुराव्यांच्या आधारे सखोल चौकशी करण्याची मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली.

घटनेपूर्वीच्या पाच दिवसांतील घटनाक्रम, माहेरी आणि सासरी झालेले संवाद, कॉल रेकॉर्ड, संदेश, सीसीटीव्ही फुटेज तसेच वैद्यकीय आणि तांत्रिक पुरावे तपासावेत, असे त्यांनी सांगितले. तपास करताना संबंधित व्यक्तींची पदे, प्रतिष्ठा किंवा राजकीय संबंध आड येऊ नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कौटुंबिक छळाची माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरही कारवाईची मागणी त्यांनी केली. छळाला प्रोत्साहन, साथ किंवा संरक्षण दिल्याचे आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, हुंडाबळीच्या तरतुदीतील सात वर्षांच्या मर्यादेचा पुनर्विचार करण्याची मागणीही डॉ. गोऱ्हे यांनी केली. विवाहाला सात वर्षांपेक्षा अधिक काळ झाल्यानंतरही महिलांचा छळ होऊ शकतो. त्यामुळे दीर्घकाळच्या कौटुंबिक छळामुळे मृत्यू झाल्यास दोषींवर कठोर कारवाई करता यावी, यासाठी कायद्यात बदल आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

या प्रकरणाच्या तपासासह आवश्यक कायदेबदलाबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >