पुणे : पुणे जिल्ह्यात शनिवार १५ मार्च २०२५ पासून दूध महागणार आहे. सध्या ५६ रुपये लिटर दराने मिळणारे गायीचे दूध आता ५८ रुपये लिटर दराने मिळणार आहे. तसेच सध्या ७२ रुपये लिटर दराने मिळणारे म्हशीचे दूध आता ७४ रुपये लिटर दराने मिळणार आहे.
Jay Pawar Wedding : पवारांच्या घरात वाजणार सनई चौघडे, लवकरच होणार नव्या सुनेचे आगमन
बुधवार १२ मार्च रोजी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक सोसायटी येथे झालेल्या दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघटनेच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. या बैठकीत विविध सहकारी आणि खाजगी दूध संघांचे ४७ प्रतिनिधी उपस्थित होते. वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचा विचार करून दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक सोसायटी म्हणजे कात्रज डेअरी येथे झालेल्या दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघटनेच्या बैठकीत दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय एकमताने झाला. संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मानद सचिव प्रकाश कुटवाल, संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, दुग्ध उद्योग तज्ज्ञ श्रीपाद चितळे आणि पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष स्वप्नील धामढेरे उपस्थित होते.
बैठकीत दूध आणि पनीर भेसळीबाबतही चर्चा झाली. या समस्येवर मात करण्यासाठी जनजागृती मोहिमांचे महत्त्व सदस्यांनी अधोरेखित केले आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना प्रलंबित अनुदाने जलदगतीने मिळावीत यासाठी सरकारशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. भेसळीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन तसेच दुग्धविकास मंत्री यांची भेट घेण्याबाबत चर्चा झाली. बनावट पनीरच्या मुद्याकडे अलिकडेच भाजपा आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी लक्ष वेधले होते. सध्या विक्री होत असलेल्या पनीरपैकी ६० ते ७० टक्के पनीर बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हा आरोप करताना त्यांनी सभागृहात बनावट पनीर दाखवले होते. राज्य सरकारने बनावट पनीर तयार करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.