Saturday, June 6, 2026

Fake cotton seeds : खरीपच्या तोंडावर मोठा घोटाळा उघड ! जामनेरमध्ये बनावट कापूस बियाण्यांचा साठा जप्त

Fake cotton seeds : खरीपच्या तोंडावर मोठा घोटाळा उघड ! जामनेरमध्ये बनावट कापूस बियाण्यांचा साठा जप्त

Fake cotton seeds : जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे. जामनेर (Jamner) तालुक्यात पोलिसांनी धडक कारवाई करत अनधिकृतरीत्या साठवून ठेवलेल्या कापूस बियाण्यांच्या मोठ्या साठ्यावर छापा टाकला. या कारवाईत तब्बल ९ लाख १५ हजार ४१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट कापूस बियाण्यांचा साठा जप्त

जामनेर शहरातील साईनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर संशयास्पद कापूस बियाण्यांचा साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत दीपक राजमल चौधरी यांच्या घरावर छापा टाकला. छाप्यात घरामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस बियाण्यांचा साठा आढळून आला.

तपासादरम्यान ४० गोण्या आणि तब्बल १ हजार १६ बियाण्यांची पॅकेट्स जप्त करण्यात आली. या पॅकेट्सवर विविध कंपन्यांची नावे, बॅच क्रमांक आणि उत्पादनासंबंधी माहिती नमूद करण्यात आली होती. मात्र संबंधितांकडे बियाण्यांची विक्री, साठवणूक आणि वितरणासाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना किंवा अधिकृत कागदपत्रे नसल्याचं तपासात उघड झालं.

पुरवठादार कोण ?

याशिवाय, जप्त बियाण्यांची खरेदी कुठून करण्यात आली? पुरवठादार कोण होता? आणि ही बियाणे अधिकृतरीत्या विक्रीसाठी मंजूर होती का? याबाबतही समाधानकारक माहिती संशयितांकडून देण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणामागे मोठं अवैध वितरण जाळं कार्यरत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. जप्त बियाण्यांमध्ये ‘दिया-५९’ वाणाची ४५० पॅकेट्स आणि ‘क्रीश-४५’ वाणाची ५६६ पॅकेट्स असल्याचं समोर आलं आहे. पंचनाम्यानुसार या सर्व साठ्याची किंमत ९ लाखांहून अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी (Agriculture Department Officers) इशारा दिला आहे की, अशा प्रकारची अनधिकृत किंवा बनावट बियाणे बाजारात पोहोचल्यास त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. कमी उगवण क्षमता, उत्पादनात घट, पीक नुकसान आणि मोठं आर्थिक नुकसान अशा संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागू शकतं. विशेषतः कापूस हे जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचं नगदी पीक असल्याने हा प्रकार गंभीर मानला जात आहे.

अहवालानंतर मोठे खुलासे होणार ?

या प्रकरणी पंचायत समितीच्या कृषी विकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून दीपक राजमल चौधरी, गुलाब आधार पाटील, शेषराव पाटील आणि इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांवर शेतकऱ्यांची फसवणूक, अनधिकृत बियाणे साठवणूक आणि विक्रीचे आरोप ठेवण्यात आले असून, बीएनएस २०२३, बियाणे अधिनियम १९६६, बियाणे नियंत्रण आदेश १९८३ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सध्या जप्त बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून, अहवालानंतर या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >