Saturday, June 6, 2026

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52 लाख 80 हजार रुपयांचा दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) उघडकीस आली आहे. आरोपींनी आधी विश्वास संपादन केला, खरे सोन्याचे कॉईन दाखवून व्यवहार पक्का केला आणि अखेर निर्जन ठिकाणी नेऊन जीवघेणा हल्ला करत रोख रक्कम व दागिने लंपास केले.

अविनाश नलावडे यांना बेदम मारहाण

रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य तथा व्यावसायिक अविनाश अनिल नलावडे (वय 34) यांना स्वस्तात सोने देण्याचं आमिष दाखवत आरोपींनी आधी पुणे, हिंगोली आणि चाकण येथे फिरवलं. अखेर गुरुवारी (4 जून) मोबाईल लोकेशनच्या आधारे त्यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील बुरूडगाव शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाजवळील निर्जन रस्त्यावर बोलावण्यात आलं.

घटनास्थळी आरोपींनी कथित सोनं दाखवलं. त्यातील कॉईन सोनार तपासत असतानाच आरोपी राजू मोहिते याने अचानक शिट्टी वाजवली. हा इशारा मिळताच उसाच्या शेतातून 10 ते 12 जणांचं टोळकं बाहेर आलं आणि त्यांनी अविनाश नलावडे यांना वाहनातून खेचून बेदम मारहाण सुरू केली. आरोपी अक्षय मोहिते याने लोखंडी रॉडने डोक्यावर व पायावर वार केल्याचा आरोप आहे. चालक आणि सोबत असलेल्या सोनारालाही मारहाण करण्यात आली.

हल्ल्यानंतर आरोपींनी वाहनातील 46 लाखांची रोख रक्कम, सोन्याची चेन, महाकाली लॉकेट आणि सोन्याच्या अंगठ्या असा एकूण 52.80 लाख रुपयांचा ऐवज लुटून पलायन केलं. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Ahilyanagar Taluka Police Station) 14 ते 16 जणांविरुद्ध दरोडा व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >