महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारीविधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना आगामी आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये मुंबईतील तिसऱ्या विमानतळाचाही समावेश आहे. विधानसभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, मुंबईचे नवीन विमानतळ वाढवन बंदराजवळ (Vadhavan Port) प्रस्तावित असून, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशनही याच बंदराजवळ असणार आहे.
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सध्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबईतील एक अशी दोन विमानतळं आहेत. नवी मुंबईतील विमानतळ या वर्षी सुरू होण्याची अपेक्षा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून त्याच्या काही चाचण्या देखील पूर्ण झाल्या आहेत.
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात असलेले वाढवण बंदर २०३० पर्यंत कार्यान्वित होईल असेही अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. दरम्यान, यावेळी अजित पवार यांनी अधोरेखित केले की, एमएमआर विकास केंद्र म्हणून विकसित केले जात आहे आणि २०४७ पर्यंत त्याची अर्थव्यवस्था १.५ ट्रिलियन डॉलर्सची होईल, ज्यामुळे राज्य विकसित भारत मोहिमेतील आघाडीच्या राज्यांपैकी एक होईल. ‘सन २०३० पर्यंत नव्या बंदरातून मालवाहतूक सुरु होणे अपेक्षित आहे. या बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्या जगातील पहिल्या १०बंदरांमध्ये होणार असल्याने महाराष्ट्र राज्य भविष्यात सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येईल.
यावेळी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्री विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाशी मेट्रोचे जाळे जोडण्यात येणार असल्याचीही घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी शिर्डी विमानतळावर रात्रीच्या वेळी लँडिंगची सुविधा लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती दिली.
मुंबईतील वाहतूकीसाठी ६४ हजार ७८३ कोटी किंमतीचे प्रकल्प
सोमवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबई उपनगरातील वाहतूक गतिमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मढ, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरीवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे ६४ हजार ७८३ कोटी किमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचे नियोजन असून त्याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण व इतर महत्त्वाची शहरं विमानतळाशी जोडली जाणार आहेत. बाळकुंभ ते गायमुख या ठाणे किनारी मार्गाची लांबी १३.४५ किमी असून त्याचे ३,३६४ कोटींचे खर्चाचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.