मुंबई : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कृत्यांचा आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाचा पर्दाफाश करणारा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येत आहे. दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत यांच्या 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' (Maharashtra Epstein Files Film) या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. मात्र, चित्रपट सेटवर जाण्यापूर्वीच यावरून प्रचंड राजकीय वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Dipali sayyad) यांनी आपल्याला हा चित्रपट न करण्यासाठी आणि विशिष्ट राजकीय महिला नेत्याची भूमिका न साकारण्यासाठी धमक्या येत असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
"कर नाही त्याला डर कशाचा!" दीपाली सय्यद यांचा दबाव झुगारून काम करण्याचा निर्धार
आपल्याला येत असलेल्या धमक्यांबद्दल थेट बोलताना अभिनेत्री दीपाली सय्यद म्हणाल्या, "चित्रपटात काम करणे आणि अभिनय करणे हे माझे प्रोफेशन आहे. खरात प्रकरणावर चित्रपट येत असताना कलाकाराला अशा पद्धतीने दबावात आणणे पूर्णपणे चुकीचे आहे. मला काही अज्ञात दूरध्वनी आले असून चित्रपट न करण्यासाठी, रोल न करण्यासाठी आणि थोडं थांबण्यासाठी धमकावले जात आहे. तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त केले जाईल, अशी भीतीही काही महिला नेत्यांकडून मला फोन करून दाखवली जात आहे. परंतु, 'कर नाही त्याला डर कशाचा?' मी या कोणत्याही दबावाला किंवा राजकीय प्रेशरला अजिबात घाबरत नाही. मी एक कलाकार आहे आणि कोणाची परवानगी घेऊन काम करत नाही. मी हे काम नक्की करणार."
Malegaon : मोसम नदीपात्रात (Mosam river) सोडण्यात येणारे जनावरांच्या कत्तलीचे रक्तमिश्रित पाणी आणि सायझिंग उद्योगांतील घातक रसायनांमुळे होणारे जलप्रदूषण ...
एकनाथ शिंदेंना भेटणार
दीपाली सय्यद यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, त्या थेट पक्षश्रेष्ठींकडे दाद मागणार आहेत. यासंदर्भात त्या म्हणाल्या, "मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर हा सर्व प्रकार उघड करणार आहे आणि मला फोन करून धमकावणाऱ्यांची नावे त्यांच्यासमोर ठेवणार आहे." गेल्या चार महिन्यांपासून आपण 'बिग बॉस'च्या घरात असल्यामुळे बाहेर काय घडले याची कल्पना नव्हती, असे सांगत त्यांनी दोन-तीन दिवसांपूर्वीच या चित्रपटाची चर्चा सुरू झाल्याचे आणि कालच 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'ची स्क्रिप्ट हातात मिळाल्याचे स्पष्ट केले.
"२० पैसे पर कमेंट वाले..."; सुशांत शेलार दीपाली सय्यद यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे
दीपाली सय्यद यांच्या या दाव्यानंतर शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि अभिनेते सुशांत शेलार (Sushant Shelar) यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. सुशांत शेलार म्हणाले, "दीपाली सय्यद या महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रगल्भ अभिनेत्री आहेत, त्यांनी अनेक उत्तम चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. कोणत्याही कलाकाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते. त्याने कोणती भूमिका करावी आणि कोणती करू नये, हा सर्वस्वी त्या कलाकाराचा वैयक्तिक निर्णय असतो. त्यामुळे त्यांना अशा धमक्या देणे अत्यंत निंदनीय आहे. शिवसेना चित्रपट सेना दीपाली ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. विरोधकांनी '२० पैसे पर कमेंट' देऊन काही लोकांना सोशल मीडियावर अशा कामांसाठी बसवून ठेवले आहे, पण दीपाली ताईंचा स्वभाव घाबरणारा नाही आणि त्यांनी अशा धमक्यांना अजिबात भीक घालू नये."
रुपाली चाकणकरांचा रोल ?
या चित्रपटात त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची भूमिका साकारणार आहेत का? या प्रश्नावर दीपाली सय्यद यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. त्यांनी सांगितले की, "मी सध्या कोणत्या भूमिकेत दिसणार आहे, हे कन्फर्म सांगणार नाही आणि २ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच प्रेक्षकांना माझा नेमका रोल समजेल." मात्र, अशोक खरात प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी संताप व्यक्त केला. "अशोक खरात हा कसला गुरु होता? तो लोकांना केवळ काही आकडे सांगायचा, काहीतरी अघोरी करायला सांगायचा आणि काहीतरी प्यायला द्यायचा. असले प्रकार महाराष्ट्रात थांबले पाहिजेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात एक पुसटशी रेषा असते, याचे भान जनतेला आले पाहिजे. रुपाली चाकणकर यांची या प्रकरणात काय चूक आहे की नाही, हे मला संपूर्ण स्क्रिप्ट वाचल्यानंतरच स्पष्टपणे समजेल," असेही त्यांनी पुढे नमूद केले.
'आता सगळं उघड होणार...'
'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या चित्रपटाची 'आता सगळं उघड होणार...!' ही टॅगलाईन सध्या सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत आहे. खरात प्रकरणाच्या मागे अनेक बड्या आणि पांढरपेशा लोकांचे हात असल्याचे बोलले जात असून, या चित्रपटाच्या माध्यमातून अनेकांचा पर्दाफाश होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. येत्या २ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर नक्की कोणकोणत्या धक्कादायक गोष्टी उघड होतात आणि समाजातील कोणत्या मोठ्या व्यक्तींचे सभ्यतेचे मुखवटे गळून पडतात, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.






