Thursday, May 28, 2026

Keir Starmer : मजूर पक्षाच्या अस्तित्वाचा लढा

Keir Starmer : मजूर पक्षाच्या अस्तित्वाचा लढा

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याकडे प्रचंड बहुमत असले तरी ‘राजकीय विश्वास’ वेगाने संपत चालला आहे. त्यांना कार्यकाळ पूर्ण करायचा असेल, तर तडजोड आणि व्यवहाराचा आधार घ्यावाच लागेल. सत्तेच्या खुर्चीचा हा संघर्ष एका व्यक्तीचा नव्हे, तर मजूर पक्षाच्या अस्तित्वाचा लढा बनला आहे.

टनमध्ये जिमी कार्बिन यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्षाने पुन्हा डावीकडे झुकण्याचा प्रयत्न केला. कार्बिन यांनी सामाजिक न्याय, सरकारी गुंतवणूक आणि युद्धविरोधी भूमिका यावर भर दिला; पण त्याचवेळी त्यांच्यावर अतिडावे, अव्यवहार्य आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत कमकुवत असल्याचे आरोप झाले. ब्रिटिश जनतेने त्यांना पूर्णपणे स्वीकारले नाही. त्या पराभवानंतर कीर स्टार्मर यांना पुढे आणण्यात आले. त्यांनी पक्षाला ‘विश्वासार्ह’ आणि ‘सत्तेसाठी योग्य’ बनवण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात त्यांनी कार्बिन युगातील अनेक नेत्यांना बाजूला केले. पक्षातील डाव्या गटाची ताकद कमी केली आणि मजूर पक्षाला पुन्हा मध्यवर्ती राजकारणाकडे आणले; पण इथेच स्टार्मर यांची खरी अडचण सुरू झाली. निवडणूक जिंकली खरी; पण ते पक्षाची स्पष्ट वैचारिक ओळख निर्माण करू शकले नाहीत. ते ना पूर्णपणे ब्लेअरवादी मध्यममार्गी ठरले, ना पारंपरिक समाजवादी. परिणामी, मजूर पक्षात एक प्रकारची वैचारिक पोकळी निर्माण झाली. सामान्य मतदारांना हा पक्ष नेमका कोणासाठी आहे, हेच समजेनासे झाले. स्थलांतराच्या प्रश्नावर पक्षाची भूमिका सतत बदलत राहिली. आर्थिक धोरणांमध्ये काटकसरीची भाषा आणि कल्याणकारी राज्याची आश्वासने यांचा विचित्र मेळ दिसला. पर्यावरण, ओळख राजकारण आणि अल्पसंख्याकांवरील प्रश्नांवर भर देताना पारंपरिक कामगार वर्गाच्या आर्थिक असुरक्षिततेकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही, अशी भावना वाढली. लंडनकेंद्रित, उच्चशिक्षित, उदारमतवादी वर्गाचा पक्ष अशी त्याची प्रतिमा बनू लागली.

स्थलांतर, राष्ट्रीय ओळख आणि सांस्कृतिक बदलांविषयी अस्वस्थ असलेला पारंपरिक मतदार अलीकडे ‘रिफॉर्म यूके’कडे आकर्षित होऊ लागला. हे केवळ निवडणूक गणिताचे बदल नाहीत, तर ब्रिटनच्या सामाजिक मानसिकतेतील मोठा बदल आहे. पूर्वी आर्थिक विषमता हा डाव्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. आता सांस्कृतिक असुरक्षितता आणि राष्ट्रीय ओळख यांसारखे प्रश्न अधिक प्रभावी ठरत आहेत. स्टार्मर आणि मजूर पक्ष या बदलाचे अचूक वाचन करण्यात अपयशी ठरताना दिसतात. स्टार्मर हे मुळात वकील आणि अभियोजक आहेत. त्यामुळे त्यांची राजकीय शैलीही अत्यंत नियंत्रित, सावध आणि व्यवस्थापकीय स्वरूपाची आहे; पण ब्रिटिश राजकारणात केवळ प्रशासकीय क्षमता पुरेशी नसते. लोकांना भावनिक संवाद साधणारा, संकटात स्पष्ट दिशा देणारा आणि संघर्षाला सामोरे जाणारा नेता हवा असतो. बोरिस जॉन्सन यांच्याभोवती अनेक वाद होते; पण त्यांच्याकडे जनतेशी थेट जोड निर्माण करण्याची क्षमता होती. फरागे यांच्याकडेही ती आहे. स्टार्मर मात्र अजूनही प्रशासकीय अधिकाऱ्यासारखे वाटतात. त्यामुळे आर्थिक संकट, स्थलांतर प्रश्न किंवा पक्षांतर्गत बंडखोरी यांसारख्या प्रसंगी ते जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकत नाहीत.

स्टार्मर यांच्याभोवती निर्माण झालेले वादही या प्रतिमेला अधिक हानी पोहोचवत आहेत. पीटर मंडेल्सन यांच्यासारख्या जुन्या ब्लेअरवादी नेत्यांना पुन्हा महत्त्व देणे, निकटवर्तीय सल्लागारांचा वाढता प्रभाव, पक्षातील मतभिन्नतेबाबत असहिष्णुता अशा अनेक बाबींमुळे स्टार्मर यांच्यावर ‘नियंत्रणप्रिय’ नेतृत्वाचा आरोप होतो आहे. भारतीय संदर्भात पाहायला मिळणारा घराणेशाहीचा आरोप इथे नसला, तरी आपल्या गटातील लोकांनाच पुढे आणणे ही भावना पक्षात नाराजी वाढवत आहे. हे संकट केवळ स्टार्मर यांच्यापुरते मर्यादित नाही. संपूर्ण युरोपमध्ये डाव्या पक्षांसमोर असेच प्रश्न उभे आहेत. फ्रान्समध्ये समाजवादी पक्ष कोसळला. जर्मनीतील सोशल डेमोक्रॅट्स संघर्ष करत आहेत. इटलीमध्ये उजव्या राष्ट्रवादी शक्ती मजबूत झाल्या. कारण पारंपरिक डावे पक्ष जागतिकीकरणानंतरच्या नव्या वास्तवाला ठोस उत्तर देऊ शकले नाहीत. आर्थिक समानतेची भाषा अजूनही आहे; पण राष्ट्रीय ओळख, सांस्कृतिक बदल आणि स्थलांतर यांसारख्या प्रश्नांवर बचावात्मक दिसतात. परिणामी कामगारवर्गातील मोठा भाग उजव्या राष्ट्रवादी राजकारणाकडे झुकतो आहे. पक्षाला सत्तेत आणणे आणि दीर्घकालीन वैचारिक दिशा देणे या दोन वेगळ्या गोष्टी असतात. पहिली गोष्ट स्टार्मर यांनी साध्य केली; दुसऱ्यात मात्र ते अपयशी ठरताना दिसतात. म्हणूनच आज ब्रिटनमध्ये विचारला जाणारा खरा प्रश्न ‘स्टार्मर राहतील की जातील?’ हा नाही.

प्रश्न असा आहे, की आधुनिक डावे राजकारण स्वतःची नवी ओळख निर्माण करू शकेल का? कामगारवर्ग, तरुण उदारमतवादी आणि सांस्कृतिकदृष्ट्या अस्वस्थ मध्यमवर्ग या परस्परविरोधी गटांना एकत्र ठेवणारी नवी राजकीय चौकट तयार होऊ शकेल का? स्टार्मर यांचे भवितव्य या प्रश्नांच्या उत्तरांशी जोडले गेले आहे. केवळ पद टिकवण्याची धडपड केली आणि व्यापक वैचारिक संकटाकडे दुर्लक्ष केले, तर त्यांचे नेतृत्व फार काळ टिकणार नाही; पण मजूर पक्षाला नव्याने परिभाषित करण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित ते आजच्या संकटातून बाहेर पडू शकतील; मात्र त्यासाठी त्यांना प्रशासकीय नेत्यापासून राजकीय नेत्यामध्ये रूपांतर करावे लागेल आणि नेमके तेच त्यांना आजपर्यंत जमलेले नाही. आजची परिस्थिती अशी आहे की स्टार्मर यांचे राजकीय भवितव्य केवळ विरोधकांच्या हल्ल्यांवर अवलंबून नाही, तर ते त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांच्या संयमावर अवलंबून आहे. पक्षातील अविश्वास दूर केला नाही, तर २०२४ मध्ये प्रचंड आशा निर्माण करणारे हे नेतृत्व २०२६ मध्येच इतिहासजमा होऊ शकते. ब्रिटनच्या राजकारणात ‘परिवर्तनाचे वारे’ वाहतील या आशेने जनतेने स्टार्मर यांच्या हाती सत्तेची धुरा सोपवली. १४ वर्षांच्या हुजूर पक्षाच्या (काँझर्व्हेटिव्ह) राजवटीनंतर मजूर पक्षाचा विजय ऐतिहासिक होता; मात्र विजयाचा हा गुलाल सुकण्यापूर्वीच स्टार्मर यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सध्याचे चित्र पाहता, स्टार्मर हे केवळ विरोधकांशीच नाही, तर स्वतःच्या पक्षातील ‘अदृश्य शत्रूंशी’ आणि स्वतःच्याच प्रतिमेशी झुंज देत असल्याचे दिसते. सरकार आणि नोकरशाहीमध्ये संघर्षाची ठिणगी पडते, तेव्हा प्रशासनाची चाके मंदावतात. स्टार्मर यांना सध्या याच गतिरोधकाचा सामना करावा लागत आहे.

__प्रा. जयसिंग यादव

Comments
Add Comment