Thursday, May 28, 2026

विस्तारित मेट्रो लाईन ५- ठाणे,भिवंडी,उल्हासनगरमधील कनेक्टिविटी अधिक सक्षम, ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला मोठी गती

विस्तारित मेट्रो लाईन ५- ठाणे,भिवंडी,उल्हासनगरमधील कनेक्टिविटी अधिक सक्षम, ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला मोठी गती

मुंबई :मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मेट्रो लाईन ५ हा महत्त्वाचा प्रकल्प आता नव्या टप्प्यात दाखल झाला आहे. विस्तारित टप्प्याला मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गिकेची एकूण लांबी आता ३४.२१ किमी झाली असून ती एमएमआरमधील सर्वात मोठ्या मेट्रो मार्गिकांपैकी एक ठरणार आहे. त्याच वेळी, या प्रकल्पाचा पहिला टप्पा आता 'CMRS' तपासणीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून, प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.

मेट्रो मार्ग ५ चा विस्तार असलेला मेट्रो मार्ग ५ए ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि आसपासच्या वाढत्या विकास केंद्रांमधील संपर्कक्षमता मोठ्या प्रमाणात वाढविणार आहे. यापूर्वी मेट्रो मार्ग ५ ची लांबी २२.३८ किमी होती आणि ११.८३ किमी लांबीच्या मेट्रो मार्ग ५ए च्या समावेशानंतर या संपूर्ण मार्गिकेची एकूण लांबी आता ३४.२१ किमी होणार आहे.

विस्तारीकरणानंतर मेट्रो लाईन ५ प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ₹१८,१३० कोटी इतका आहे. या वर्षाअखेर टप्पा १ सुरू होणे अपेक्षित असून त्यामुळे या संपूर्ण पट्ट्यातील प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार असून नव्या मंजुरींमुळे या मार्गिकेची व्याप्ती व प्रभाव दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ होते.

मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मेट्रो लाईन ५ ही मुंबई महानगर प्रदेशासाठी अत्यंत महत्त्वाची मार्गिका आहे, विशेषतः भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली परिसरासाठी, जे या प्रदेशातील सर्वात महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांपैकी आहे. आशियातील सर्वात मोठ्या वस्त्रोद्योग आणि वेअरहाऊसिंग हबपैकी एक असलेले भिवंडी, तसेच 35 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेला कल्याण–डोंबिवली परिसर, यांना जलद आणि उच्च क्षमतेची कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचा पूर्ण विकास साधता येईल. हा विस्तारित कॉरिडॉर उपनगरीय रेल्वे आणि प्रमुख महामार्गांशी सुरळीतपणे जोडला जाईल, ज्यामुळे लाखो नागरिकांना अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास मिळेल. मला विश्वास आहे की, टप्पा १ या वर्षाअखेर नागरिकांसाठी खुला होईल.”

मा. उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष श्री. एकनाथ शिंदे म्हणाले, “ही अत्यंत समाधानाची बाब आहे की, मेट्रो लाईन ५ ही एमएमआरमधील सर्वात मोठ्या मेट्रो कॉरिडॉरपैकी एक म्हणून उदयास येत आहे, जी ३४ किमी पेक्षा जास्त पसरलेली असून ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरला जोडते. हा कॉरिडॉर विशेषतः महत्त्वपूर्ण आहे, कारण तो आशियातील सर्वात मोठ्या वस्त्रोद्योग आणि वेअरहाऊसिंग हबपैकी एक असलेल्या भिवंडीला, दाट लोकवस्तीच्या कल्याण-डोंबिवली प्रदेशाशी जोडतो, ज्यामुळे पूर्व कॉरिडॉरमध्ये एक भक्कम वाहतूक दुवा निर्माण होतो. उपनगरीय रेल्वे आणि प्रमुख महामार्गांशी एकीकरणामुळे, मेट्रो लाईन ५ लाखो कामगार, व्यापारी आणि नागरिकांना सेवा देईल आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देणारा एक प्रमुख घटक म्हणून काम करेल.”

डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से., एमएमआरडीएचे महानगर आयुक्त म्हणाले, “मेट्रो लाईन ५ फेज १ चे काम आता प्रगत टप्प्यात पोहोचले आहे. स्थानकांची पायाभूत सुविधा हळूहळू आकार घेत आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी महत्वाच्या असलेल्या सीएमआरएस तपासणीची आम्ही तयारी करत आहोत. मार्गिका सुरू झाल्यानंतर ‘मुंबई इन मिनिट्स’ या संकल्पनेला मोठी गती मिळेल आणि या भागातील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल.”

विस्तारित मार्गिका आणि प्रकल्पाचा आढावा

१) टप्पा १ : ठाणे ते धामणकर नाका

लांबी : ११.९ किमी

स्थानके : ६

स्थानकांची नावे : बाळकुम , कशेळी , काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा, धामणकर नाका

अंदाजित खर्च : ₹६,७४१ कोटी

महत्त्वाचे काम : कशेळी मेट्रो कार डेपो येथे PVD द्वारे भू-सुधारणा, इन्स्पेक्शन पिट आणि डेपो कंट्रोल सेंटरची कामे वेगाने सुरू आहेत.

२) टप्पा २ : धामणकर नाका ते दुर्गाडी

लांबी : १०.४८ किमी

स्थानके : ६ (१ भूमिगत + ५ उन्नत)

स्थानकांची नावे : भिवंडी (भूमिगत), टेमघर, राजनोली, गोवे गाव, कोनगाव (पूर्व), कोनगाव (पश्चिम).

अंदाजित खर्च : ₹७,३२६ कोटी

३) टप्पा ५ अ : दुर्गाडी – खडकपाडा – भोईरवाडी – कल्याण तसेच उल्हासनगर जोडणी

लांबी : ११.८३ किमी

स्थानके : ७ (सर्व उन्नत)

स्थानकांची नावे : दुर्गाडी, खडकपाडा, भोईरवाडी, छत्रपती शिवाजी महाराज पथ, शांतिनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, उल्हासनगर

विशेष वैशिष्ट्य : भोईरवाडी येथून उल्हासनगरसाठी स्वतंत्र स्पर कनेक्टिव्हिटी

अंदाजित खर्च : ₹४,०६३ कोटी

* अखंड कनेक्टिव्हिटी आणि इंटरमॉडल सुविधा*

मेट्रो लाईन ५ ही इतर वाहतूक व्यवस्थांशी जोडलेली एकात्मिक मार्गिका म्हणून विकसित केली जात आहे.

इंटरचेंज सुविधा :

* मेट्रो लाईन ४ येथे बाळकुम (कापूरबावडी).

* मेट्रो लाईन १२ येथे कल्याण जंक्शन.

उपनगरीय रेल्वे स्थानकांशी थेट जोडणी :

* ठाणे

* कल्याण

* विठ्ठलवाडी

* उल्हासनगर

लास्ट माईल सुविधा :

* सर्व स्थानकांवर फीडर बस सेवा

महामार्गांशी जोडणी :

* NH-160 (मुंबई–नाशिक)

* NH-61 (भिवंडी–निर्मल)

* NH-848

मुख्य फायदे

* एमएमआरमधील सर्वात मोठ्या मेट्रो मार्गिकांपैकी एक

* रस्ते प्रवासाच्या तुलनेत ४० ते ५० टक्के वेळेची बचत

* मुख्य रस्ते आणि महामार्गांवरील वाहतूक कोंडीत घट

* भिवंडीतील उद्योग, वस्त्रोद्योग बाजारपेठा आणि लॉजिस्टिक हब यांना मोठा फायदा

* खाजगी वाहनांवरील अवलंबित्व कमी झाल्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास आणि हवेची गुणवत्ता सुधारेल.

प्रादेशिक वाहतुकीत मोठा बदल

मेट्रो लाईन ५ मुळे ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली आणि परिसरातील निवासी, औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्राना मोठा फायदा होणार आहे. टप्पा १ आता सीएमआरएस तयारीच्या टप्प्याकडे वाटचाल करत असताना आणि मार्गिका अधिक विस्तारत असताना, मेट्रो लाईन ५ ही अधिक वेगवान, सुलभ आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे जाणारे महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ही मार्गिका महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Comments
Add Comment