सावंतवाडी : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघ सातत्याने चर्चेत होता. ज्यांना पक्षाने ताकद दिली, मोठं केलं ते ऐन निवडणुकीत पक्षाच्या विरोधात गेले. पक्ष संघटना संपवण्याचे काम स्वकीयांनी केले. कार्यकर्त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला गेला.आमच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका केली. मात्र, असे असताना आमच्या कार्यकर्त्यांनी नि:स्वार्थी पद्धतीने केलेलं काम कौतुकास्पद आहे. पक्ष संकटात असताना स्वतःचा विचार न करता पक्षाचा झेंडा हाती घेऊन इथले कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले.
या दोन्ही निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मिळविलेल्या यशामुळे या मतदारसंघाचे नाव महाराष्ट्रात चर्चिलं गेलं. त्यामुळे महाराष्ट्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सावंतवाडीतील कार्यकर्त्यांकडून प्रेरणा घ्यावी. यापुढेही सावंतवाडी मतदारसंघातील गावागावात भाजपा पक्ष वाढविण्यासाठी काम करा. सावंतवाडी तालुक्याला नेहमीच जिल्ह्यात नंबर वन ठेवा. पालकमंत्री म्हणून सर्व ताकद द्यायला मी तयार आहे, असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित भारतीय जनता पार्टी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या संघटनपर्व बैठकीला उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सावंतवाडीत जेव्हा जेव्हा कार्यकर्त्यांची परीक्षा घेतली गेली तेव्हा तेव्हा ते मेरिटमध्ये पास झाले. मात्र, आता जबाबदारी आम्हा नेत्यांची आहे. ज्या ज्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये प्रामाणिकपणे काम केले त्यांनाच यापुढील निवडणुकांमध्ये संधी दिली जाईल व पक्षाचे नेतृत्व हे प्रामाणिक कार्यकर्त्यांसोबतच राहील, असा विश्वास त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.
रवींद्र चव्हाण हे पालकमंत्री असताना त्यांनी पक्ष वाढीच्या दृष्टीने नेहमीच काम केले. मात्र, त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा अनेकांनी घेतला. पक्ष सोडताना त्यांच्याकडून घेतलेल्या निधीतून केलेली कामं आपणच केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे पुन्हा मागच्या चुका पुन्हा होता नये याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. अन्यथा, त्यांचा संयम राहणार नाही, असे त्यावेळी त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना सूचित केले.
आज पालकमंत्री भाजपचा आहे. त्यामुळे पहिलं प्राधान्य भाजपलाच आहे. जे महायुतीचे सरपंच नाहीत त्यांना निधी नाही. मला कोण त्याबद्दल विचारणारही नाही. पक्ष वाढवायचा अधिकार आम्हाला आहे. नवीन आर्थिक वर्षात सरपंचांची यादी मी घेऊन बसणार आहे. उबाठाला शुन्य टक्के निधी देणार हे निश्चित आहे, असा पुर्नउच्चार त्यांनी केला.