अंगणेवाडी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा जत्रोत्सव शनिवारी होत आहे. जत्रोत्सवास येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे. गेले महिनाभर चाललेली या जत्रोत्सवासाठीची तयारी पूर्णत्वास गेली असून समस्त आंगणे कुटुंबीय आई भराडी मातेच्या जत्रोत्सवास येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतास उत्सुक झाले आहेत.
नवसाला पावणाऱ्या व भवानीचे रूप असलेल्या भराडी मातेच्या दर्शनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, विविध पक्षांचे राजकीय नेते, खासदार, आमदार, माजी महापौर येणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुमारे आठ लाख भाविक जत्रोत्सवास उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवस जत्रोत्सव
श्री देवी भराडी मातेच्या आशीर्वादाने आंगणे कुटुंबीयांनी यात्रेकरूंसाठी शनिवारी होणाऱ्या जत्रोत्सवाचा कालावधी वाढवून दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत केला आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी दिली आहे. जत्रोत्सव दोन दिवसांचा असणार आहे. जत्रोत्सवानिमित देवालयात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.