Sunday, June 7, 2026

IND vs AFG: पदार्पणातच मानव सुथार चमकला ! 25 वर्षानंतर असं करणारा पहिला भारतीय गोलंदाज...

IND vs AFG: पदार्पणातच मानव सुथार चमकला ! 25 वर्षानंतर असं करणारा पहिला भारतीय गोलंदाज...

न्यू चंदीगड: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात मुल्लानपूर येथे सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्या दिवशीही आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. भारताने आठ बाद 564 धावा करीत डाव घोषित केला. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात रडतखडत झाली. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस अफगाणिस्तानची अवस्था 5 बाद 113 अशी आहे. मात्र या दिवसाचा खरा हिरो ठरला तो पदार्पण करणारा डावखुरा फिरकीपटू मानव सुथार. या एकमेव कसोटी सामन्यात अनुभवी गोलंदाज रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी मानव सुथारला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. पदार्पणाच्या सामन्यात त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. फलंदाजीत 41 चेंडूत 28 धावांची उपयुक्त खेळी केल्यानंतर त्याने गोलंदाजीत अफगाणिस्तानच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. गोलंदाजीत त्याने पंधरा षटकात एकवीस धावा देत तीन बळी घेतले.

पहिल्याच षटकात विकेट, 25 वर्षांनंतर झाला इतिहास

अफगाणिस्तानच्या डावातील सहावे षटक टाकण्यासाठी आलेल्या मानव सुथारने चौथ्याच चेंडूवर सलामीवीर अब्दुल मलिकला बाद करत कसोटी करिअरची शानदार सुरुवात केली. यासह तो कसोटी पदार्पणातील पहिल्याच षटकात विकेट घेणारा भारताचा आठवा गोलंदाज ठरला. विशेष म्हणजे, तब्बल 25 वर्षांनंतर एखाद्या भारतीय गोलंदाजाने पदार्पण कसोटीत पहिल्याच षटकात विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. मानवने दुसऱ्या दिवसाअखेर 15.5 षटकांत 3 महत्त्वाचे बळी घेत भारताला सामन्यात मजबूत पकड मिळूवन दिली आहे. भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी करीत ५०० धावांचा टप्पा ओलांडला. भारताने आठ बाद 564 धावांवर डाव घोषित केला. भारताच्या 564 धावांच्या विशाल धावसंख्येत कर्णधार शुभमन गिल याने 126 धावांची खेळी करत आघाडी घेतली. केएल राहुलने शतक झळकावत 100 धावा केल्या, तर साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांनी प्रत्येकी 81 धावांचे योगदान दिले. अखेरीस वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 52 धावा करत भारताला 564 धावांपर्यंत पोहोचवले.

कसोटी पदार्पण सामन्यात पहिल्याच षटकात विकेट घेणारे भारतीय गोलंदाज

१.मोंटू बॅनर्जी: विरुद्ध वेस्ट इंडीज (1948) २.मनोहर हार्दिकर: विरुद्ध वेस्ट इंडीज (1958) ३.वामन कुमार: विरुद्ध पाकिस्तान (1961) ४.चेतन शर्मा: विरुद्ध पाकिस्तान (1984) ५.डब्ल्यू. व्ही. रमन: विरुद्ध वेस्ट इंडीज (1988) ६.मानव सुथार: विरुद्ध अफगाणिस्तान (2026)

भारतीय गोलंदाजांच्या अचूक गोलंदाजीमुळे दुसऱ्या दिवसाअखेर संघ 451 धावांनी आघाडीवर आहे. मानवच्या कामगिरीमुळे भारत आता सामन्यात मोठ्या विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >