आधुनिक कालखंडात महाराष्ट्राला शिल्पकारांची मोठी देखणी परंपरा लाभलेली आहे. रावबहादूर गणपतराव काशिनाथ म्हात्रे, रघुनाथ कृष्णा फडके, विनायक पांडुरंग करमरकर, बाळाजी वसंत तालीम, वासुदेव विष्णू मांजरेकर, नारायण गणेश पाणसरे, सदाशिव साठे इ. नामवंत शिल्पकारांच्या मांदियाळीत पद्मभूषण राम वनजी सुतार यांचे नाव त्यांच्यातील वेगळेपणासाठी घ्यावे लागेल. या प्रतिभावंत शिल्पकाराने अफाट संघर्ष करीत वाढत्या वयागणिक उत्तरोत्तर भव्य शिल्पे घडवलीत, भारतीय कलेचे सुवर्णपान म्हणून त्यांची कला कारकीर्द नेहमीच महत्त्वाची ठरणार आहे.
राजेंद्र ज. महाजन : चित्रकार, कला अभ्यासक, सेवानिवृत्त प्राचार्य, ललित कला केंद्र चोपडा जि. जळगाव
आज वयाच्या शंभरीतही ते न थकता, दुपारची वामकुक्षी न घेता दररोज आठ ते दहा तास नोएडा स्थित स्टुडिओत उभे राहून शिल्पकलेत रममाण असतात. या वयात त्यांच्याकडे मुंबई जवळील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (४०० फूट उंच), मुंबईतीलच इंदू मिलमधील “स्टॅचू ऑफ इक्वॉलिटी” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (३५० फूट उंच), पिंपरी-चिंचवड-मुळशी येथील छत्रपती संभाजी शिल्प (१०० फूट उंच), अयोध्या येथील श्रीराम शिल्प (६५० फूट उंच) ही भव्य शिल्पे निर्माण अवस्थेत आहेत. यांसह अनेक लहान-मोठी शिल्पे त्यांच्या स्टुडिओत तयार होत आहेत. महानतेचा अथक प्रवासी राम सुतार यांना चार-पाच वेळा भेटण्याचा योग आला. नोएडाला स्टुडिओत १९ नोव्हेंबर २००९ व कोरोना काळात २२ ऑगस्ट २०२१ ला कलापुष्प सांगलीद्वारा कलामंथन चर्चासत्रात ऑनलाइन प्रदीर्घ मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. शंभरी गाठण्याच्या निमित्ताने त्यांच्या कला कारकिर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न म्हणजेच हा लेख होय.
शरीरयष्टीने उंच पुरे, भव्य कपाळ, पिंगट वाढत्या वयानुसार कमी झालेले पण मानेवर रुळणारे केस, अतिशय साधा पेहराव, निगर्वी संवेदनशील व्यक्तिमत्त्व पद्मभूषण राम सुतारांना बघताच क्षणी मनात ठसते. ऋषी परंपरेतील तपसाधनेतून आलेले चेहऱ्यावर तेज आपल्याला खिळवून ठेवते. हे थोर शिल्पकार खानदेशातील धुळे नजीकच्या गोंदुर या छोट्याशा खेड्यात सामान्य विश्वकर्मा सुतार कुटुंबात १९ फेब्रुवारी १९२५ ला जन्माला आले. ते आठ अपत्यांपैकी दुसरे होते. त्यांचे वडील वंजी सुतार लाकडाच्या बैलगाड्या, टांगा, नांगर व तत्सम पारंपरिक सुतारकाम हा व्यवसाय करायचे. माती कुडाचे त्यांचे घर होते. आई सीताबाई घर सारवायच्या, गोऱ्या थापायच्या, चुल्हा बनवायच्या, छोटे राम ते बघायचे. बालपणीच्या आठवणीत रमताना ते सांगायचे, “न कळत्या वयात विंचू चावला. मी तो मारला पण मुळताच कलात्मक जाण असल्याने त्यांच्या मृत आकाराने माझे लक्ष वेधले. घरात असलेल्या ५०१ साबण वडीवर मी लगोलग विंचूचा हुबहू आकार कोरला, अशा पद्धतीने माझ्या शिल्पकलेला सुरुवात झाली.” त्यांना शिक्षणाची उमेद फार होती. चौथीपर्यंत गावात शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी निमदळ व इतर गावांत अनवाणी पायपीट झाली. त्यांच्या शब्दांत सांगायचे तर, भोवऱ्याप्रमाणे शिक्षण प्रवास सुरू राहिला. वयाच्या १०व्या वर्षी मधुसूदन कुलकर्णी या शिक्षकांच्या सांगण्यावरून गणपतीची मूर्ती केली, वाहवा झाली. मॅट्रिकला असताना वडिलांचे निधन झाले त्यामुळे परीक्षेत अपयशाला सामोरे जावे लागले; परंतु गुणग्राहक कलाशिक्षक रामकृष्ण जोशींनी त्यांना शाळेत शिवाजी महाराजांना तलवार देताना भवानी माता असे चित्र पाटीवर कोरताना पाहिलेले होते. त्यांनी राम सुतारांना कलेच्या उच्च शिक्षणासाठी उद्युक्त केले व सर्वतोपरी मदतही केली. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे पाठवून दरमहा ₹.२५ ते चार वर्षे देत राहिले. ते कृतज्ञतेने म्हणतात, “जोशी गुरुजी होते म्हणून राम सुतार घडला”. उच्च कला शिक्षणाला जाण्यापूर्वी इ.स.१९४७ मध्ये याच गुरुजींच्या प्रेरणेतून त्यांनी सात फूट उंचीचे “बॉडी बिल्डर” हे सिमेंट माध्यमातील व ग्रीक प्रभावातील शिल्प घडवले. ते शिल्प आजही आपणास नेर जि.धुळे येथे बघावयास मिळते. या व्यक्तिशिल्पातील शरीरशास्त्राचा अचूक अभ्यास, एकूणच अवयवांची प्रमाणबद्धता यांतून त्यांच्यातील असामान्यत्वाची चुणूक दिसून येते.
मुंबईतील सुप्रसिद्ध सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून राम सुतार यांनी प्रथम श्रेणीत प्रथम येऊन प्रतिष्ठेचे मेयो सुवर्णपदक पटकावत जी. डी. आर्ट ही पदविका प्राप्त केली. या काळात ते एक नम्र प्रतिभावंत कला विद्यार्थी म्हणून कला वर्तुळात परिचित होते. त्यांच्या सालस स्वभावामुळे शिक्षक नेहमीच त्यांना मदत करीत असत. कला विद्यार्थी असतानाच ते रावबहादूर म्हात्रे, वि. पां.करमरकर, खानविलकर या दिग्गज शिल्पकारांच्या स्टुडिओत कॉलेज सुटल्यावर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत कामासाठी जायचे. ते कधी कधी त्यांना बक्षीसही द्यायचे. अभिजात शिल्पकला परंपरा जवळून अभ्यासता आली याबद्दल ते म्हणतात, “माझे आयुष्यच बदलून गेले” हे सांगताना ते भावुक होतात. सन १९५९ला त्यांनी टेक्निकल असिस्टंट म्हणून ऑडिओ व्हिज्युअल पब्लिसिटी इन्फॉर्मेशन अँड कास्टिंग विभागात दिल्ली येथे दीड वर्ष नोकरी केली. शासकीय नोकरीत असताना बाह्य शिल्पकामे करता येणार नाहीत असे वरिष्ठांनी बजावताच स्वाभिमानी शिल्पकार राम सुतार यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि सन १९५९ पासून “कला हेच जीवन” मानून स्वतंत्र शिल्पकार म्हणून दिल्लीतच राहून ते छोटी-मोठी कामे करू लागली. ज्या शिल्पामुळे त्यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. ते शिल्प म्हणजे प्रगती मैदानाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला असलेले काँक्रीटचे शेतकरी शिल्प व शेतकरी जोडप्याचे शिल्प होय. वास्तुविशारद जोगळेकरांमुळे संसद भवनात त्यांना पाच फूट उंचीचा लाल दगडातील अशोक स्तंभ घडवायला मिळाला. भोपाळच्या टागोर भवनातील करंजगावकर या वास्तू विशारदाच्या मदतीने त्यांनी गंगा यमुना ही शिल्पे घडविली. ते म्हणतात, “पैशांसाठी मी कधीही काम केले नाही, जे मिळत गेले ते स्वीकारत गेलो आणि झपाटल्यागत कामे केली, “मात्र हे सांगताना ते हळवे झालेले मी बघितले आहे. अशा तऱ्हेने त्यांची शिल्पकलेतील तपसाधना वाढत्या वयागणिक फळाला येत गेली.
राम सुतार सुरुवातीला सिमेंट, काँक्रीट, दगड, संगमरवर नंतर ते ब्रांझ, फायबर ग्लास या माध्यमांकडे वळले. राजस्थान मध्य प्रदेश सीमेवरील चंबळ नदीवरील गांधीसागर धरणावर ४५ फूट उंचीचे चंबळ देवतेचे भव्य प्रतिकात्मक शिल्पामुळे ते देशभर प्रसिद्ध झाले. ४५ फूट उंचीच्या सिमेंट काँक्रीटच्या ठोकळ्याला पंधरा महिने रात्रंदिवस स्वतःला झोकून देत, अजिंठा वेरूळच्या कलावंताप्रमाणे छिन्नी हातोड्याचे घाव घालत, कोरून भारतीय अभिजात परंपरेशी नाते सांगणारे हे शिल्प त्यांनी उभे केले. बंधुभाव दर्शवणारे हे शिल्प एकमेवाद्वितीय आहे. या शिल्पातील आकृत्यांची प्रमाणबद्ध मांडणी, वस्त्र, अलंकारांची योजकता, शरीर लय व दैवी भाव लावण्य महत्त्वाचे म्हणजे तंत्र कौशल्य हे रसिक मनाला मंत्रमुग्ध करून जाते. राष्ट्रपिता महात्मा गांधींवर राम सुतार यांची अपार भक्ती होती. त्यांच्या विचारसरणीचा प्रभाव त्यांनी आयुष्यभर निष्ठेने अंगीकारलेला आहे. सन १९४८ ला बनवलेला नेर जि.धुळे येथील सिमेंटचा हास्यमुख गांधी या अर्ध पुतळ्यापासून ते आजवर त्यांची विविध अवस्थेतील, विविध माध्यमातील अनेक गांधी शिल्पे बघावयास मिळतात. प्रत्येकातून गांधींचे महानत्व झळकताना दिसते. त्यांची गांधींची शिल्पे भारतासह जगभरातील १५० देशात गेलेली आहेत. दिल्ली संसद भवन आवारातील १६ फूट उंचीचे बसलेले “ध्यानस्थ गांधी” हे ब्रांझ शिल्प तर सर्वोत्तम असेच आहे. गांधी स्मृती स्थळ, दिल्ली येथील १३ उंचीचा ब्रांझ स्मारक समूह अनुभवतांना त्यावरील “मेरा जीवन ही मेरा संदेश है” हा विचार आपणांस नतमस्तक व्हायला भाग पाडतो.
या व्यतिरिक्त त्यांची संसद भावनात १५ राष्ट्रपुरुषांची भव्य ब्रांझ शिल्पे बघावयास मिळतात. १८ फूट उंचीचे पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, जयप्रकाश नारायण, शहीद भगतसिंग, २१ फूट उंचीचे अश्वारूढ शिवाजी महाराज अश्वारूढ महाराणा रणजीत सिंग, छत्रपती शाहू महाराज, पंडित गोविंद वल्लभ पंत, महात्मा फुले, संत कबीर, विवेकानंद, बाबू जगजीवन राम इ. भव्य शिल्पांतून प्रत्येकाची स्वभाव वैशिष्ट्ये, साधर्म्य चटकन नजरेला खेचून घेते. गाथा मंदिर देहू स्थित संत तुकारामांच्या सात फूट उंच ब्रांझ शिल्पात त्यांच्या बालपणीच्या हळव्या आठवणी गुंतलेल्या आहेत. ते म्हणतात, “तुकाराम हे माझे आवडते संत, लहानपणी त्यांचे अभंग कानी पडत असत तसेच इ. ५वी त असताना संत तुकाराम या नाटकात मी तुकारामाची भूमिका केली होती, तिचे शाळेने तेव्हा भरभरून कौतुक केले होते, त्याच वयात मी संत तुकाराम हा मूक चित्रपटही बघितला होता, ती प्रतिमा माझ्या हृदयात होती, या शिल्पातून मी ती उतरवण्याचा प्रयत्न केला याचेच मला मोठे समाधान आहे.”
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचे श्रीपेरुम्बदूर येथील स्मारक तर प्रतिकात्मक रूपक स्तंभासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. १५ फूट उंच व ६ फूट गोलाई असलेले ब्रांझ कॅपिटल्स हे ५० फूट उंचीच्या सात गोल स्तंभांवर उभारलेले आहे. धर्म, सत्य, न्याय, त्याग, शांती, विज्ञान व समृद्धीचा विचार सांगणारे हे प्रतिकात्मक स्तंभ सम्राट अशोक स्तंभांची आठवण करून देताना दिसतात. पुणे विमानतळावर असलेले १६×४० फूट लांबी रुंदीचे फायबर क्लास माध्यमातील “छत्रपती शिवराय-समर्थ रामदास-संत तुकाराम भेट” हे काहीसे उथळ उठावाचे भव्य म्यूरल अतिशय सौंदर्यपूर्ण आणि इतिहासाला बोलके करणारे असे आहे. खजुराहो येथील अजरामर शृंगार शिल्पे घडवणाऱ्या अनामिक शिल्पकारांना “श्रद्धांजली” हे १२ फूट उंचीचे शिल्प व त्यावर कोरलेला “खजुराहो के निडर कलाकार, अमर शिला में गान तुम्हारा” हा संदेश राम सुतारांच्या अफलातून कल्पकशक्तीला सलाम करणारा आहे. आज वरच्या पद्मभूषण राम सुतारांच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कलाकृती म्हणता येईल. “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशू कदाचन…” असा संदेश देणाऱ्या शिल्पांत चार घोड्यांच्या रथावर आरूढ कृष्ण अर्जुन संवाद घडत आहे. सारथ्य करणारा प्रसन्न श्रीकृष्ण विमनस्क अवस्थेत असलेल्या योद्धा अर्जुनाला गीता सार ऐकवत आहे. घोड्यांच्या डोळ्यातील भाव सुद्धा प्रसंगाच्या धीरगंभीरतेत भर घालतांना दिसतो. रथाचा साज, अलंकृत छत्री इ. सारे राजवैभवाला साजेसेच आहे. या भव्य शिल्पाबद्दल राम सुतार म्हणतात, “भव्य-दिव्य असे काहीतरी घडवावे हे मी आधीपासूनच ठरवलेले होते, “इच्छिले ते घडते” या उक्तीप्रमाणे पार पडत गेले, राम सुतार यांचे इ.स.२०१३ ते २०१८ दरम्यान नर्मदा सरोवर गुजराथ येथे घडवलेले “स्टॅच्यू ऑफ युनिटी”हे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे जगातील सर्वाधिक ५९७ फूट उंचीचे व्यक्तिशिल्प आज प्रचंड बहुचर्चित झालेले आहे. लाखो पर्यटक या शिल्पाला पाहण्यासाठी जगभरातून येत असतात. एकतेचे प्रतीक म्हणून या भव्य शिल्पाची निर्मिती केलेली आहे. भारतातील सहा लाख ग्रामीण लोकांकडून ५००० मेट्रिक टन लोखंड संग्रहित करून त्याचा उपयोग या शिल्पात केलेला आहे. राम सुतारांना कलेच्या अद्वितीय कार्यासाठी भारत सरकारने पद्मश्री (१९९९), पद्मभूषण (२०१६) तसेच रवींद्रनाथ टागोर सौहार्द पुरस्कार (२०१६) देऊन त्यांच्या कलेचा गौरव केलेला आहे. यांसह त्यांना मुंबई आर्ट सोसायटीचा “रुपधर जीवनगौरव”(२०१०) असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना वेळोवेळी मिळालेले आहेत. ते प्रख्यात इंडियन आर्ट अँड क्राफ्ट सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत.आज शंभरी पार करताना त्यांना मदत होते ती आर्किटेक्ट असलेल्या अनिल सुतार या प्रगल्भ सुपुत्राची.ते जन्मजात शिल्पकार व वास्तू रचनातज्ज्ञ असून १४ वर्षे अमेरिकेत आर्किटेक्चर प्रोजेक्ट डिझायनर म्हणून काम केल्यानंतर सन १९९४ पासून ते सरांच्या मदतीला असतात. त्यांच्याबद्दल राम सुतार म्हणतात, “आम्ही दोघे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत”. त्यांची भारतातील सर्वात मोठी स्टुडिओ कम फाउंड्री नोएडा परिसरात गाजियाबाद येथे आठ हजार स्क्वे.मी. आकारात आहे. तिथे रोज १००० किलोग्रॅमचे मेटल कास्टिंग होते. नोएडाला त्यांचा दोन हजार स्क्वे.मी. आकाराचा “क्ले मॉडेलिंग” स्टुडिओ आहे. अनिल सुतार सांगतात, “गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून या स्टुडिओत काही बदल केलेले आहेत. जसे सहा सीएनसी राउटर मशीन, रोबोट आणलेले आहेत ते अधिक ॲक्युरेट असते, त्यात सीडी स्कॅनिंग पार्टसचे डिझाईन अधिक सुलभतेने होते” तसेच गाजियाबाद येथे सुरज कुंड भडकल सरोवर रस्त्यावर इ.स.१९९९मध्ये पाच एकर जागेत “आनंदवन” शिल्पबगिचा व त्या शेजारीच सहा एकर जागेत सन २००९ला “सुतारकला वाटिका” राम सुतारांनी विकसित केलेली आहे. तिथे सरांनी आजवर केलेल्या सर्व लहान-मोठ्या शिल्पांच्या प्रतिकृती बघावयास मिळतात.
अनिल सुतार यांना भविष्यातील योजनांबाबत विचारले असता ते सांगतात, “महाराष्ट्रात लोणावळा वा नाशिक वा पुणे येथे पंधरा ते वीस एकर जागेवर पॅरिसच्या लूर्व दर्जाचे बाबांचे शिल्पाकृतींचे म्युझियम बनवावे, ललित कलांची एकत्र मांडणी त्यात असावी असे स्वप्न उरी बाळगले आहे. बघू या… कसे जमते ते!” शेवटी मुलाखत संपताना, स्वातंत्र्यपूर्व काळातील २२ वर्षे व स्वातंत्र्योत्तर काळातील सुमारे ७८ वर्ष अनुभवलेल्या पद्मभूषण राम सुतारांना झालेल्या बदलाबद्दल व एकंदरीतच प्रदीर्घ जीवनाबद्दल विचारले असता ते म्हणतात,
“परिस्थिती बदलली, माणसे बदलली, आधुनिक तंत्रज्ञान आले, गतिमानता आली पण तेव्हाही मेहनत होती, आताही ती आहेच. निसर्ग फार मोठा खजाना आहे, तो गुरू आहे, डोळे उघडे ठेवा,”जहाँ मिली नजर वहा दुनिया बेखबर”, चालायला लागा, सतत उद्योगी राहा, मागे बघू नका, पुढे बघू नका, नवनवीन तंत्रज्ञान स्वीकार करा, प्रामाणिकपणा जपा, चलती का नाम गाडी, कलाकाराच्या रूपाला आठवण राहावी म्हणून कलेची सेवा करा,यश, पैसा,प्रसिद्धी आपोआपच मिळत जाईल”
आम्ही एकदम स्तब्ध, नतमस्तक !!!