मुंबई : राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानातून वाटप करण्यात येणाऱ्या गव्हाचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गरीब लाभार्थ्यांना आता गहू कमी मिळणार असून सर्वसामान्यांच्या ताटातून चपाती कमी होऊ शकते.
शासनाने लाभार्थ्यांना तांदुळाचे वाटप मात्र वाढवून दिले आहे. सदर बदल मार्च २०२५ पासून लागू होणार असून लाभार्थ्यांना धान्याचे वाटप मोफत करण्यात येणार आहे. अंत्योदय कार्डधारकांना एका कार्डामागे १५ किलो गहू व २० किलो तांदूळ तर प्राधान्य गटातील प्रत्येक लाभार्थ्याला दोन किलो गहू व तीन किलो तांदुळाचे वाटप करण्यात येते.
परंतु त्यामध्ये आता शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने बदल केला आहे. लाभार्थ्यांच्या हिस्स्यातील गव्हाला कात्री लावण्यात आली असून त्याबदल्यात लाभार्थ्यांना तांदुळ मिळेल.