Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai News : ‘रुळावर पाणी तुंबणार नाही यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय’

Mumbai News : ‘रुळावर पाणी तुंबणार नाही यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय’

मुंबई मनपा आयुक्तांनी घेतली पालिकेसह रेल्वे अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे (Mumbai railway) थांबल्यास मुंबईचे जनजीवन ठप्प होते. त्यामुळे रेल्वे रूळांवर पावसाचे पाणी साचू नये यासाठी रेल्वे प्रशासनासमवेत सर्वोच्च स्तरावर समन्वय असणे अपेक्षित आहे. जोरदार पावसातही उपनगरीय रेल्वे सेवा विनाव्यत्यय सुरू राहिली पाहिजे. त्यासाठी नाल्यांमधून गाळ उपसा करण्यासह इतरही कामे योग्यरितीने पार पडली पाहिजेत, असे निर्देश पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी दिले.

मुंबई पालिका पर्जन्य जलवाहिन्या विभाग आणि पश्चिम व मध्य रेल्वे प्रशासन यांची पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठक पालिका मुख्यालयात १७ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडली. त्यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी निर्देश दिले. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्रीधर चौधरी यांच्यासह रेल्वे विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबईत गोदरेज टॉवरला आग

मुंबईत जोरदार पावसाप्रसंगी सखल परिसरांमध्ये रेल्वे रूळांवर पाणी साचल्याच्या घटनांमुळे रेल्वे सेवा बाधित होते. त्यामुळे प्रवाशांना असुविधेला सामोरे जावे लागते. रेल्वे स्थानक, रेल्वेच्या हद्दीत पावसाचे पाणी साचल्याच्या घटना कमी व्हाव्यात यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर, मागील काही वर्षात ज्या ठिकाणी रेल्वे रूळांवर पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत, अशा ठिकाणांचा स्थळनिहाय आढावा घेऊन कोणती कार्यवाही केली, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मध्य रेल्वे विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, माटुंगा कार्यशाळा, चुनाभट्टी, वडाळा रेल्वे स्थानक, मुख्याध्यापक कल्व्हर्ट, मिठी नदी (शीव-कुर्ला), ब्राह्मणवाडी नाला आणि टिळक नगर नाला,विद्याविहार रेल्वे स्थानक (फातिमा नगर), कर्वे नगर नाला (कांजूर मार्ग), हरियाली नाला आणि संतोषी माता नाला, मारवाडी नाला आणि मशीद नाला, भांडुप रेल्वे स्थानक (क्रॉम्प्टन नाला, दातार नाला, उषानगर, भांडुप प्लॅटफॉर्म क्रमांक १ तसेच, पश्चिम रेल्वे विभागातील अंधेरी, बोरिवली या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणा-या विविध उपाययोजनांची यावेळी विस्तृतपणे चर्चा
करण्यात आली.

मुंबई उपनगरीय रेल्वे थांबल्यास मुंबईचे जनजीवन ठप्प होते. त्यामुळे रेल्वे रूळांवर पावसाचे पाणी साचू नये यासाठी रेल्वे प्रशासनासमवेत सर्वोच्च स्तरावर समन्वय असणे अपेक्षित आहे. यासाठी फेब्रुवारी महिन्यातच पावसाळा पूर्वतयारी बैठक आयोजित केली आहे. जेणेकरून महानगरपालिका आणि रेल्वे विभागास सुसमन्वय साधून प्रत्यक्ष कार्यवाहीस साडेतीन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी मिळू शकेल. विषयाचे गांभीर्य ओळखून स्थळनिहाय कार्यवाही सुनिश्चित करावी, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी निर्देश दिले आहेत. रेल्वे परिसरातील कलव्हर्टची स्वच्छता मोहीम संयुक्तपणे पूर्ण करावी. ही कामे विहित वेळेत पूर्ण करून पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळेल, अशा तर्हेने उपाययोजना कराव्यात अशाप्रकारच्या सूचना केल्या आहेत.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर म्हणाले की, त्याठिकाणी पंप चालक आणि अभियंत्यांनी हे पंप वेळेत सुरु होतील, याची खबरदारी घ्यावी. काही ठिकाणी रेल्वे विभागामार्फत कामे सुरू असून ती विहित वेळेत पूर्ण करावीत. या कामांसाठी महानगरपालिका रेल्वे विभागास निधी उपलब्ध करून देणार असेल तर हा निधी विनाविलंब उपलब्ध करून द्यावा, अशी सूचनाही बांगर यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -