मुंबई: केंद्रीय आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार समजते की भारतातील दर पाचवा पुरुष म्हणजेच देशातील २२.४ टक्के पुरुष दारूचे शौकीन आहेत. मात्र चांगली बाब ही की दारू पिणाऱ्या पुरुषांच्या टक्केवारीत घट झाली आहे. २०१५-१६मध्ये हा आकडा २९.२ टक्के होता. ही टक्केवारी आता कमी झाली आहे. दरम्यान, काही राज्ये सरासरीच्या पुढे गेले आहेत.
दारू पिणाऱ्या पुरुषांमध्ये ५९.१ टक्क्यांसह गोवा सगळ्यात आघाडीवर आहे. यानंतर अरूणाचल प्रदेश(५६.६ टक्के), तेलंगणा(५० टक्के), झारखंड (४०.४ टक्के), सिक्कीम (३६.३ टक्के), छत्तीसगड(३५.९ टक्के), तामिळनाडू (३२.८ टक्के), उत्तराखंड (३२.१ टक्के), आंध्र प्रदेश(३१.२ टक्के), पंजाब (२७.५ टक्के), आसाम (२६.५ टक्के), केरळ(२६ टक्के) आणि पश्चिम बंगाल(२५.७ टक्के) आहे.
बिहारमध्ये २०१६मध्ये दारूबंदी लागू झाली होती मात्र आकडेवारीनुसार तेथे अद्यापही दारू प्यायली जाते. २०१५-१६मध्ये बिहारमध्ये दारू पिणाऱ्या पुरुषांची संख्या २८.९ टक्के होती. आजही १७ टक्के पुरूष दारू पितात.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५-१६च्या आकडेवारीनुसार भारतात १५ ते ४९ वर्षे वयोगटातील महिला आणि पुरुषांच्या दारू सेवनाची टक्केवारी अनुक्रमे १.२ टक्के आणि २९.२ टक्के होती. २०१९-२१ मध्ये ही टक्केवारी महिलांसाठी ०.७ ट्क्के आणि पुरुषांसाठी २२.४ टक्क्यांपर्यंत घसरली.