ठाणे : ठाणे, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईची सातत्याने जाणवत असतानाच, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी ठाण्याच्या मालमत्ता प्रदर्शन कार्यक्रमात बोलताना केलेल्या सुतोवाचामुळे ठाणेकरांची जलचिंता लवकरच मिटण्याची चिन्हे आहेत.
ठाणे शहराला यंदाच्या वर्षात शंभर दशलक्षलीटर तर पुढील वर्षात शंभर दशलक्षलीटर असे दोनशे दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती राव यांनी दिली आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शहराच्या पाणी आराखड्याबाबत माहिती दिली.
ठाणे शहरात सद्यस्थिती मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असले तरी भविष्याचा विचार करून २०५५ पर्यंतचा पाणी आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्यानुसार यंदाच्या वर्षात शंभर दशलक्षलीटर तर पुढील वर्षात शंभर दशलक्षलीटर असे दोनशे दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी उपलब्ध होईल. यामुळे २०२६ मध्येच ठाणे शहरात पुढील २०३५ पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असेल, असा दावा आयुक्त राव यांनी केला.