स्नेहधारा – पूनम राणे
‘बोलणं’ ही माणसाला मिळालेली एक अनमोल देणगी आहे. एखाद्याचं बोलणं सतत ऐकावंसं वाटणं, ही तर त्या व्यक्तीला मिळालेली दैवी देणगीच म्हणावी लागेल. ही दैवी देणगी लाभलेल्या बोलक्या डोळ्यांच्या आणि हसऱ्या गालांच्या, विनम्र निवेदिका दीपाली केळकर मॅडम यांची ही कथा.
वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीचा वर्ग. वर्गात विज्ञानाचा तास सुरू होता. शिक्षकाने धडा शिकवण्यापूर्वी वर्गातील एका विद्यार्थिनीला धडा वाचून दाखवायला सांगितला. स्पष्ट उच्चार, योग्य ठिकाणी विराम घेत संथगतीने वाचन सुरू होतं. वाचन संपलं आणि शिक्षकाने तोच धडा शिकवायला घेतला. वर्गातील विद्यार्थ्यांना तो धडा पूर्णपणे समजला. बऱ्याच जणांना विज्ञान हा विषय कठीण, क्लिष्ट वाटतो; परंतु या विद्यार्थिनीच्या आवाजाची गोडी शिक्षकांसमवेत साऱ्या वर्गालाच लागली होती आणि शिकणं सोपं झालं होतं.
इयत्ता नववीमध्ये असताना त्यांचे हेच शिक्षक भडंग सर, या विद्यार्थिनीला तसेच आणखी एका विद्यार्थ्याला घेऊन आकाशवाणीवर शालेय कार्यक्रमासाठी गेले. यामुळे अर्थातच शालेय वयातच आकाशवाणीची पहिली ओळख झाली. आठवीपर्यंत कोणत्याच वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी भाग घेतला नव्हता. मात्र त्यांची मैत्रीण वक्तृत्व स्पर्धेत कायम भाग घ्यायची. तिच्या बाजूला बसून त्यांनाही वाटलं की, आपणही भाग घ्यावा. संगतीचा परिणाम चांगला आणि वाईट दोन्ही होत असतो. मैत्रिणीकडून प्रेरणा मिळाली. आईने छान निबंध लिहून दिला. निबंधाचा विषय होता ‘रक्तदान श्रेष्ठ दान’. छान पाठांतर करून वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला, पहिलाच प्रयत्न असल्यामुळे फजितीच झाली खरं तर. तरीही पुढील वर्षी पुन्हा चिकाटीने भाग घेतला आणि चक्क प्रथम क्रमांक मिळवला.
शालेय वयापासूनच पालक त्यांना विविध कार्यक्रम ऐकण्यासाठी स्वतःबरोबर घेऊन जात असत. त्यामुळे अनेक मान्यवरांची व्याख्याने त्यांनी ऐकली होती. त्यामध्ये प्रा. शिवाजीराव भोसले, मंगला खाडीलकर, बाळासाहेब ठाकरे, शैला मुकुंद, प्रमोद महाजन, व. पु. काळे यांचे कथाकथन, तसेच पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत बापट यांच्या काव्य वाचनाचे कार्यक्रम पहिल्या रांगेत बसून त्यांनी ऐकले होते. नकळत या साऱ्यांचा संस्कार त्यांच्या मनावर होत होता.
महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड इथेही दर्जेदार वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम नेहमी होत असत. मुग्ध चिटणीस यांचे कथाकथनही मुलुंडलाच ऐकले, त्याचाही परिणाम त्यांच्या मनावर झाला.
यानंतर मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. अकरावी-बारावीसाठी कॉलेजमध्ये सुहासिनी कीर्तीकर मराठी विषयाच्या प्राध्यापिका होत्या. त्यांचं शिकवणं सखोल आणि अभ्यासपूर्वक असायचं. विषयाच्या संदर्भात अनेक दाखले द्यायच्या. कॉलेजमध्ये मराठी वाङ्मय मंडळ होते. स्वरसंध्या वाद्यवृंद तसेच इतर स्पर्धा, कार्यक्रम व्हायचे. त्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळेच अनुभव, आत्मविश्वास त्यांना मिळत होता. मराठी भाषेची गोडी आपल्याला प्रा. सुहासिनी कीर्तीकर तसेच प्रा. अलका कुलकर्णी यांनी लावली असे त्या अभिमानाने सांगतात. आजही दोन्ही प्राध्यापिका त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांचे विविध कार्यक्रम ऐकण्यासाठी त्या उपस्थित असतात. कार्यक्रमाविषयी सूचना करतात.
एकदा वृत्तपत्रांमध्ये जाहिरात आली होती. सह्याद्री वाहिनीसाठी वृत्तनिवेदक पाहिजेत. त्यामध्ये दीपाली केळकर यांची निवड झाली. सन २००० पासून सह्याद्री वाहिनीवर त्या वृत्तनिवेदकाचे काम करीत आहेत. याशिवाय मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या रसिक श्रोत्यांसाठी शब्दांच्या गावा जावे, गंमत म्हणी वाक्यप्रचारांची. गाणं शब्दांचं, अभंगलावण्य, वसंतोत्सव, आला पाऊस, भारतीय संस्कृतीच जतन करत ‘स्त्रीधन’ नावाचा उखाण्याचा कार्यक्रम. धकाधकीच्या वातावरणात मनपसन्न, हास्यसंजीवनी, सुसंवादाचे १० मंत्र, पसायदान आणि व्यक्तिमत्त्व विकास यांसारख्या समाजाला उपयुक्त असणाऱ्या, चिंतन करायला लावणाऱ्या विषयांवर मुंबई, महाराष्ट्र, तसेच परदेशातही ८०० पेक्षा जास्त कार्यक्रम त्यांनी केले.
शेकडो कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आणि निवेदनही आपल्या रसाळ वाणीत त्या करत आहेत. अनेक मान्यवरांच्या मुलाखतीही त्यांनी घेतल्या आहेत.
‘मॉडेल कॉर्डिनेटर’ म्हणून दहा वर्षे त्यांनी काम केले आहे. काही जाहिरातींसाठी त्यांनी मॉडेलिंगही केले आहे. ‘खेळ मांडीयेला’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले. पुस्तकाची दुसरी आवृत्तीही निघाली आहे. निवेदन, सूत्रसंचालन, संवाद कौशल्य या विषयावर त्या स्वतंत्र कार्यशाळाही घेत आहेत.
निवेदन, वृत्तनिवेदन, एकल संवादात्मक कार्यक्रम यासाठी त्यांना स्वराभिनय पुरस्कार, व्यावसायिक सेवा पुरस्कार, शालिनी गुप्ते स्मृती कला गुणगौरव पुरस्कार, नवदुर्गा पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना लाभले आहेत.
त्यांचा हा यशाचा पतंग आकाशात गगन भरारी घेत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणही दीपाली मॅडमकडून प्रेरणा घेऊन आपले व्यक्तिमत्त्व फुलवावे.