Saturday, February 15, 2025
Homeसाप्ताहिककोलाजसंस्कारांचे विद्यापीठ

संस्कारांचे विद्यापीठ

स्नेहधारा – पूनम राणे

आजच्या आधुनिक काळात आपण पाहतो, काही ठिकाणी भ्रष्टाचारी माणसं तत्त्व सोडून आपल्या मर्जीने वागताना दिसतात.
अशाही वातावरणात रोजच्या जीवनात प्रामाणिक जीवन कसं जगावं, आपली तत्त्व सांभाळत भ्रष्टाचार न करता, आदर्श जीवन कसं जगावं, विपुल संपत्ती असताना साधेपणानं कसं राहावं. हा वस्तूपाठ आपल्या संस्कारक्षम आचरणातून घालून देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वाची आजची कहाणी.

‘‘माई, काहीतरी दानधर्म करावा.”
बाहेरून भिक्षेकऱ्याने आवाज दिला. आजोबांनी त्यांना तांदूळ देण्याची विनंती केली. तेही चांगल्या क्वालिटीचे.
८ वर्षांच्या चिमुरडीने आजीला विचारलं, ‘‘त्यांना चांगला तांदूळ देता आणि सेकंड क्वालिटी तांदूळ आम्हाला शिजवता, असं का करता?” आजी म्हणाली, अगं देव आपल्या घरी भिक्षुकाच्या रूपात येतो. देव घरी आल्यावर तू त्याला काय दुसऱ्या कॉलिटीचे देणार आहेस का ? नाही ना, म्हणून चांगलंच द्यायला पाहिजे. ‘‘त्यानंतर आजोबा म्हणाले,”अगं दान श्रद्धेने केलं पाहिजे. एखाद्याला द्यायचं म्हणून देऊ नये किंवा त्रासिकपणे देऊ नये. मनात ही भावना पाहिजे की, दान घेऊन तुमचंही चांगलं होऊ दे आणि दान देऊन आमचंही चांगलं होऊ दे.”

कोवळ्या वयात मुलांच्या मनावर झालेले संस्कार सहसा पुसले जात नाहीत. त्यात वडील डॉक्टर होते. त्यांचेही संस्कार त्यांच्यावर होत होते. वडील नेहमी त्यांना सांगत, ‘‘माय गॉड इज माय पेशंट’’ एखाद्या व्यक्तीसोबत भले तुमचे वैर असू दे, पण जेव्हा तो पेशंट म्हणून तुमच्याकडे येतो तेव्हा त्यांच्याकडे तुम्ही प्रेम आणि करूणेने पाहिले पाहिजे. अशा ठिकाणी जात, पैसे, भाषा पाहायची नसते. याचा खूप मोठा प्रभाव या मुलीच्या मनावर झाला. आजोबा शाळेत मास्तर असल्याने त्यांच्या लेखी, खरं धन म्हणजे पुस्तक. त्यामुळे साहजिकच वाचनाचा संस्कार या मुलीवर झाला.

आयुष्य हे एक मोठे पुस्तक आहे. आयुष्याच्या वळणावर भेटलेली प्रत्येक व्यक्तीसुद्धा मोठे पुस्तक आहे. ज्या लोकांना त्या भेटल्या, त्यांच्याशी बोलल्या ते सगळेच जण त्यांना एका पुस्तकासारखे वाटले. त्यांचे चेहरे, त्यांचे अनुभव, त्यांचे चांगले-वाईट पॉईंट्स, त्यांना पुस्तकासारखे वाटले आणि प्रत्येक अनुभव पुस्तकातले एक-एक पान वाटले. अनुभव लेखनातून अनेक पुस्तकांच्या त्या लेखिका झाल्या.

डॉलर बहु, वाईज अँड अदरवाईज, महाश्वेता, यासारख्या अनेक पुस्तकांची भाषा अत्यंत साधी आणि सोपी असून प्रेम, विश्वास, नातं हे डॉलरने विकत घेता येणार येत नाही. तसेच ग्रामीण भागातील साधेपणा, शहरी जीवनातील गुंतागुंत, आपल्या लेखणीद्वारे साकारून आयुष्य बदलणारे, प्रेरणादायी अनुभव आपण या वाचनातून घेऊ शकतो.
स्वतःवर घडलेल्या वाचन संस्कारातून एक शाळा, एक लायब्ररीची संकल्पना मांडून ७०,००० ग्रंथालयांची स्थापना त्यांनी केली.

२१ वर्षांपूर्वी एकदा सुधा मूर्ती काशीला गेल्या होत्या. तिथे त्यांना आवडणाऱ्या वस्तूंचा त्याग करायला सांगितले होते. त्यांनी कपड्यांचा अर्थात. साडी विकत घेण्याचा त्याग केला. मुलाखतीमध्ये त्यांनीच हा किस्सा सांगितला.
संयम आणि त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुधा मूर्ती.
रतन टाटा यांच्या टेल्कोमध्ये इंजिनियर पदावर त्या रुजू झालेल्या पहिल्या महिला कर्मचारी होत्या. आयुष्यात कमावतो त्यातला काही भाग समाजाला दिला पाहिजे, हे टाटा यांचे विचार कृतीतून अमलात आणत आहेत.
त्यांच्या इन्फोसिस फाऊंडेशन संस्थेमार्फत त्यांचे कार्य सुरू आहे.
मुलांनो, एका मुलाने आपल्या आईसाठी पाठवलेला मेल किती महत्त्वाचा आहे पाहा.
“प्रत्येकजण आपल्या मुलासाठी काम करतो आहे. पण माझी आई, इतरांच्या मुलांसाठी काम करत आहे.” आपल्या मुलाचा हा मेल वाचून त्यांना गर्व वाटला. मुलांवर आपण व कुटुंबाने केलेल्या संस्कारांचे हे फलित आहे. असे त्या अभिमानाने सांगतात.

त्या म्हणतात, ‘‘आपण आपल्या मुलांना दोनच गोष्टी देऊ शकतो, एक म्हणजे संस्कारांचे मजबूत मूळ आणि दुसरे
शक्तिशाली पंख, या गोष्टीमुळे हवे तिथे ते उंच भरारी घेऊ शकतात.” समाजकार्याचा हा संस्कार घरातून नकळतपणे मोठ्यांच्या कृतीतून होत असतो. त्यांची पुस्तके वाचन करून आपणही आपल्या जीवनात या संस्कारपीठाचा आदर्श घेऊ, आपणही समाजकार्यासाठी खारीचा वाटा देऊ.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -