आम्ही मुले, हसरी फुले,
प्रश्नावर अमुचे, उत्तर बोले.
शाळेत येई, मजा फार,
शिकून सवरून होऊ हुशार
सुंदर बोलक्या, शाळेच्या भिंती,
चित्र सांगे, अचूक माहिती.
आनंदी लाटेवर, होऊ स्वार
शिकून सवरून होऊ हुशार
शाळेच्या बागेत, हिरवी झाडे
झाडावर किती, पक्षी दडे
पक्षी, झाडे, होई जोडीदार
शिकून सवरून होऊ हुशार
शाळेचा परिपाठ,
किती हा सुंदर
ज्ञानाची सुरुवात,
किती मनोहर
शिकताना आळस, होई पसार
शिकून सवरून होऊ हुशार
सारेच विषय, सारेच सत्र
गुरुजी होई, आमचे मित्र
कधी ना मानू, आम्ही हार
शिकून सवरून होऊ हुशार
अभ्यास करू, देऊ परीक्षा
लक्षात घेऊ, नसे ही शिक्षा
ज्ञानाचे येथे उघडते दार
शिकून सवरून होऊ हुशार
काव्यकोडी – एकनाथ आव्हाड
१) या फुलांचा गुच्छ
कधी करतात, हार-
फुलदाणी ठेवताना
यांचाच वापर फार
फुलांची राणी
समजतात हिला
सुगंधी या फुलाचे
लवकर नाव बोला?
२) पाच पाकळ्या
असतात फार तर
औषधात याचा
भरपूर वापर
वर्षभर बहरणारे
हे सुगंधित फूल
नाव सांगा याचे
जे साऱ्यांना पाडे भूल?
३) निळसर, मनमोहक
रंग या फुलांचा
चहा, काढासुद्धा
केला जातो यांचा
आरोग्याचे फायदे
ही फुलं भरपूर देतात
अपराजिता म्हणून
कोणास ओळखतात?
उत्तर –
१) शेवंती
२) सदाफुली
३) गोकर्ण