- विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील
सहलीमध्ये शिवम व त्याची मित्रमंडळी यांची चर्चा चांगलीच रंगत होती. नदी कशी बनते? या त्याच्या मित्राच्या प्रश्नावर शिवम सांगू लागला, “डोंगरावर पडलेले पावसाचे पाणी दऱ्याखोऱ्यांतून वाहते. जमिनीवर पडलेले पावसाचे पाणी जमिनीवरून वाहू लागते. त्या वाहण्यामुळेच पाण्याचे छोटे-मोठे प्रवाह बनतात. अनेक प्रवाह एकत्र आले म्हणजे ओहळ तयार होतो. अनेक ओहळ एकत्र आले म्हणजे त्याचा ओढा किंवा नाला तयार होतो. ते ओढे वाहत सपाट भागात येतात. त्यांना सपाट भागावर पडलेले पावसाचे पाणी गावशिवारातील छोट्या छोट्या नाल्यांद्वारे मिळाले, की त्यांची छोटी नदी बनते. अशा अनेक छोट्या छोट्या नद्या मिळून मोठ्या नद्या बनल्यात.” “आपण नेहमी बघतो की नद्या या सरळ कधीच नसतात? त्या नागमोडी वळणाच्याच का असतात? ”विपुलने माहिती विचारली.
“नदीच्या सपाट प्रदेशात वाहतांना प्रवाहात कुठे उंचवटे असतात, कुठे सखल भाग असतो तर कुठे खळगे असतात. कुठे चढ असतो, तर कुणीकडे उतार असतो. त्यामुळे नदीचा प्रवाह हा जरी आपणास सलग दिसत असला तरी प्रवाहातील सर्वच पाणी काही सारख्याच वेगाने वाहत नसते. कुठे पाणी खळखळाट करीत वेगाने वाहते तर कुठे संथ गतीने वाहते.
ज्या बाजूचा प्रवाह वेगाने वाहतो त्या बाजूच्या मातीची धूप व नरम खडकांची झीज जास्त होते. त्यामुळे तो भाग खोल होतो व तिकडे जास्त उतार तयार होतो. त्या बाजूच्या पाण्याला अधिक जास्त वेग येतो व प्रवाह त्या बाजूला वळतो म्हणजे प्रवाहात एक वळण तयार होते व प्रवाह पुढे वाहतो. आता ज्या विरुद्ध बाजूच्या प्रवाहाचा वेग कमी असतो.
तिकडे गाळ साचून ती बाजू उथळ होते. प्रवाह उताराकडे वळल्यानंतर त्याच्या विरुद्ध उथळ बाजूच्या पाण्याला तेवढ्याच वेळात जास्त अंतर काटावे लागते. त्यामुळे आता त्या विरुद्ध उथळ बाजूच्या पाण्याचा वेग वाढतो व त्या बाजूच्या मातीची धूप होणे सुरू होते. मातीची धूप झाली म्हणजे पुन्हा त्या विरुद्ध बाजूचा उतार जास्त होतो. पुन्हा पाण्याचा वेग वाढतो व आता प्रवाह पुढे त्या विरुद्ध दिशेकडे वळतो. म्हणजे आता प्रवाहात पुढे विरुद्ध बाजूने वळण तयार होते. अशा रीतीने नदी कधीच सरळ न वाहता नागमोडीच वाहत राहते.” शिवमने सविस्तर स्पष्टीकरण दिले.
“ ह्या नद्यांच्या प्रवाहात धबधबे कसे काय तयार होतात? ” विशालने प्रश्न केला. “नदीचा उगम हा डोंगरातून होत असतो. त्यामुळे आधी पाण्याचा वेग खूप जास्त असतो. पाणी डोंगरात कोठे उंचावरून खाली कोसळते तर कोठे सपाट पठारातून वाहते. पाणी डोंगरात जेथे उंचावरून खाली खोल कोसळते तेथे तेथे धबधबा निर्माण होतो. तेथे पाणी जोराने आदळते व उसळ्या मारून पुढे वाहते. तसेच ह्या पाण्याचा वेग अतिशय जास्त असतो.
अशा वेगवान पाण्याच्या माऱ्याने मृदू खडक फुटतात. ते झिजून तेथे खोल खड्डा पडतो. तेथेही धबधबा निर्माण होतो. या धबधब्यांतून मस्तपैकी कारंज्यासारखे तुषार चोहीकडे उडतात त्यामुळे धबधबा खूपच मनोहर दिसतो.” शिवम् म्हणाला.
“मुलांनो अशा धबधब्यात आंघोळ करायची मजा काही औरच असते.” तो यात्रेकरू म्हणाला. “पण तो धबधबा लहान, कमी उंचीचा व सौम्य प्रवाहाचा असला पाहिजे. नाही तर धबधब्यातच वाहून जायचा धोका असतो.”






